Friday 23 April 2010

आठवणीतल्या सहली ७ : यरकॉड

ठरल्याप्रमाणें देवाची गाडी कोईंबतूरहून आणायला जायचें होतें. एप्रिल अखेर, मे सुरुवात म्हणतां म्हणतां मेची १७ तारीख मुक्रर झाली व त्याप्रमाणें कोईंबतूर एक्सप्रेसची तिकिटें काढलीं. जातांनाचे यशस्वी कलाकार. उन्हाळा असल्यामुळें वातानुकूलित कक्षाला पर्याय नव्हता. तिरुपूर गेल्यावर देवाला दूध्व केला. तो बरोबर ठरल्या वेळीं उत्साहानें आमच्या स्वागतासाठीं स्थानकावर तयार होता. बसतांनाच भटकंतीची चर्चा सुरूं झाली. मुनार, कुन्नूर - उटी आणि यरकॉड अशीं ठिकाणें ठरलीं. पैकीं उटीला कोईंबतूरहून हवें तर सकाळीं जाऊन संध्याकाळीं परत येतां येतें. वा परतीचा मुंबईकडचा प्रवास कोईंबतूर - कुन्नूर - उटी - बंगळुरू असाहि करतां येतो.



मुख्य अडचण होती ती ऐन गर्दीचा प्रवासी मोसम असल्यामुळें निवासाच्या व्यवस्थेंत आबाळ होण्याची शक्यता होती. मागील सफरींत मुन्नारला अतिवृष्टीमुळें फिरूंच शकलों नव्हतों आणि एका रात्रीनंतर आम्हीं गाशा गुंडाळला होता. त्याचें उट्टें फेडायची अप्रतिम संधि लाभली होती. फारफार तर काय होईल? पैसे जास्त पडतील एवढेंच. नाहीतरी कोईंबतूरला राहाणॅं फुकटच होतें कीं. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जायचें झालें. पण प्रथम यरकॉडला जायचें ठरलें.



कोईंबतूरहून निघायला आम्हीं आंघोळी करून तयार. सकाळीं नऊसाडेनऊची वेळ. निरभ्र आकाश. अरे गाडीवर कॅरिअर लावा. सामान वर जाईल. मेस्त्री चलाऽऽ कामाला लागाऽऽ. हा मेस्त्री मीच बरें कां. हातोडी, पान्हे वगैरे चालवण्यात आमच्यांत मीं किंचित कमी डावा. उजवा नक्कीच म्हणतां येणार नाहीं. जरी डावखुरा नसलों तरी. कॅरिअर लावलें. वीसेक मिनिटें लागलीं. स्टेशनसमोर न्याहारी केली आणि निघालों. कोइंबतूर रेलवे स्टेशनसमोर दोनचार रेस्तरॉं आहेत. उडिपी धर्तीची. अतिशय प्रशस्त हवेशीर आणि भरपूर उजेड असलेलीं. रोस्ट ऊर्फ सादा डोसा सहा रु., इडली, वडा सांबार आठ रु., पोंगल बारा रु., मसाला डोसा बारा रु., फिल्टर कॉफी आठ रु., चहा चार रु. असे दर २००३-४ सालीं होते. सांबार चटण्या कितीहि खा. उर्दूवाचनाची चंगळच होती. चव उडप्यापेक्षां बरीच वेगळी पण मस्त. खासकरून सांबारची चव वेगळी विशिष्ट आणि मस्तच. शिवाय तीन प्रकारच्या ओल्या नारळाच्या चटण्या अनलिमिटेड. समाजाच्या विविध आर्थिक स्तरांतले, विविध जातींतले, प्रांतातले विविध धर्माचे लोक एका टेबलवर गुण्यागोविंदानें योग्य ती स्वच्छता राखून खातांना दिसतात. थोड्याफार फरकानें असेच दृश्य आणि दर ‘आर्या’ चेन हॉटेलमध्यें आढळले. कामत चेन हॉटेलच्या दर्जाचें आहे आर्या. तरीहि पदार्थ चविष्ट. गावढ्या गावांत देखील कामतचें हॉटेल असलें तरी दर वाजवीपेक्षां जास्त असतात. उदा. २००८ सालीं डिसेंबरमध्यें सावंतवाडीला वा कोलाडला इडली रु. २५/- होते. शिवाय वाईट चवीचें सांबार कामतमध्येंहि मिळतें. जादा चटणी वा सांबाराचे रु. १०/- पडतात. म्हणजे सर्वत्र मुंबईचेच दर. फक्त स्वच्छता ठीक असते.



तमिळनाडूमध्यें सगळीकडे पोंगल, टोमॅटो राईस आणि लेमन राईस हे भाताचे तीन प्रकार सुरेख मिळतात. खेरीज महाराष्ट्रांत जसे मालवणी मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत तसे तमिळनाडूंत चेट्टिनाड मसालेदार पदार्थ. खासकरून मांसाहारी.



राममा ४७ पकडून मार्गस्थ झालों. आतां शेवडे मास्तरांची किलींडरच्या जागेवर आणि माझी मागच्या आसनावर पदावनति. सूर्याजीराव थोड्या वेळांतच पिसाळले. आकाश भगभगीत झालें. अर्धी पॅंट घातली असेल तर गाडीतून प्रवास करतांना टॉवेल मांडीवर वाळवतां येतो. ऊन असेल तर एकदोन तासांत वाळतो. शिवाय उन्हाचा त्रास होत नाहीं तें वेगळेंच. तसाच टॉवेल वाळवून प्लॅस्टिकच्या पिशवींत घालून मागें हाताशीं ठेवला. रस्त्यावर रणरणते ऊन. निमूटपणें कांच बंद करून वातानुकूलन चालूं केलें. वातानुकूलन चालूं केल्यावर कांहीं वेळांतच परिसर रम्य भासूं लगला. रस्त्याच्या दुतर्फा नारळी आणि विविध वृक्ष, शेतें, अधूनमधून गांवें, शहरापासून दूर आल्यावर बरें वाटलें. आमची चेकाळलेली बडबड सुरूं होती. तमिळनाडूंत एक वैशिष्ट्यपूर्ण गंमत आढळली. दादरच्या कांबळी प्रदर्शनांत आढळत तसे वा गणेशोत्सवांत प्रदर्शनार्थ मांडतात तसे मोठ्ठ्या मूर्तींनीं बनवलेले अनेक पौराणिक प्रसंगांचे देखावे ठिकठिकाणीं दिसतात. पण प्रचंड आकारांच्या मूर्ति. लार्जर दॅन लाईफ म्हणतात तशा. दोनतीन मजली इमारतीएवढी एकेक व्यक्ति उंच. बहुतेक मूर्ति राक्षसांच्या. सर्व तैलरंगांत रंगवलेल्या. देखाव्याचा अर्थ मात्र कांहीं कळत नव्हता. मुंबईला परत आल्यावर आमच्या कंपनीतल्या एका तमिळ इंजिनीयरला विचारलें. त्यानें सांगितलें कीं त्या विविध ग्रामदेवता असतात. त्यांच्या विविध आख्यायिका, दंतकथा असतात. कांहीं पौराणिक तर कांहीं ऐतिहासिक. हे देखावे त्या कथांवर आधारित. त्यांतील त्या विशिष्ट - बहुधा द्रविड वंशाचे वीरपुरुष आपल्याला राक्षसांसारखे भासतात. सहसा गांवाच्या वेशीवर हे देखावे उभारलेले असतात आणि हे वीरपुरुष विविध दुष्ट शक्तींपासून ते गांवाचें रक्षण करतात असें तिथें मानतात.



तीनसाडेतीनच्या सुमाराला आम्हीं जात होतों त्या दिशेलाच दूर क्षितिजावर काळे काळे ढग दिसूं लागले. आमचें सामान तर कॅरिअरवर होतें. आतां प्लॅस्टिक शोधायला हवें. सालेम शहर जवळ आलें. रस्त्याला लागून एक बाजारपेठ लागली. गाडी उभी करायला एका झाडाखालीं सावलीची जागा सांपडली. प्लॅस्टिकसंशोधनाचें महत्त्वाचें कार्य माझ्याकडे आलें. संशोधकाची भूमिका माझ्यासारख्या हुशार माणसाकडे नको कां? प्रथम गल्लीत घुसून दुकानें शोधूं लागलों. पांचेक मिनिटें शोधलें. हार्डवेअर, रंग, विजेच्या उपकरणांचीं दुकानें इ. इतर सर्व वस्तूंचीं दुकानें होतीं. एका सुशिक्षित दिसणार्‍या माणसाला मोजक्या शब्दांत इंग्रजीतून विचारलें. पण त्याला अजिबात इंग्रजी येत नव्हतें. माझ्या अंदाजाचें दिवाळें. वाटलें प्लॅस्टिकला तमिळमध्यें पण प्लॅस्टिकच म्हणणार. कारला कार आणि कॅरिअरला कॅरिअर. एका गिर्‍हाईक नसलेल्या दुकानांत हातवारे करून विचारलें कीं कार, कॅरिअर, बॅग्ज, (आकाशाकडे बोट दाखवून) रेऽऽन, प्लॅऽऽस्टिक? त्याला बोध झाला नाहीं. मीं दुकानातून खालीं उतरलों. पण रस्त्यावरचा एक मुंडू नेसलेला माणूस आमच्याकडे पाहात होता. त्यानें आपणहून विचारले? प्लॅस्टीऽऽक? पुढें तमिळमधला चारपांच शब्दांचा अगम्य खडखडाट. मीं मानेनें होय म्हटलें. तो चारपांच वळणें घेऊन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या चक्रव्यूहांत घेऊन गेला. मीं मोठ्या मुष्किलीनें दिशा, खुणा वा रस्ता लक्षांत ठेवायचा निष्फळ प्रयत्न करीत त्याच्यामागें. एक दुकान दाखवलें. तिथें कापडाच्या ताग्यासारखे दोनतीन प्लॅस्टिकचे तागे ठेवलेले होते. वेगवेगळ्या रुंदीचे. ते दाखवून त्या काळ्या मुंडूधारी देवदूतानें विचारलें, "धिस?" माझा आणि मागोमाग त्याचा मुखचंद्र समाधानानें उजळून गेला. मीं मान डोलावली. त्या दुकानदाराला विचारलें विड्थ? पन्हा? त्याला कळलें नाहीं. पण रुंदी दिसतच होती. सगळ्यांत मोठा एक मीटरचा. सोडवून पाहिलें. रुंदी दोन मीटर होती. दुमडून गुंडाळलेला तागा.

त्याला म्हटलें "फाईव्ह मीटर."

त्यानें विचारलें, "फाईव्ह के. जी.?"

"फाईव्ह करेक्ट. मीटर येस. के. जी. नो!"

त्याला कळेना. पण आपल्या देवदूताला कळलें. त्यानें दुकानदाराशीं काहींतरी तमिळ कडकडाट केला.

मग दुकानदारानें लोखंडी गज दाखवला आणि प्रश्नार्थक मुद्रा केली.

"येस! मीटर! फाईव्ह मीटर!"

त्यानें गणकयंत्र घेतले आणि आकडेमोड करून म्हणाला "थ्री फिफ्टी रुपीज? थ्री हंड्रेड अ... अ... कडकट्टकडकट्ट." अदमासें तीनशें साडेतीनशे रुपये.

"येस." मीं मान डोलावली.

त्यानें पांच मीटर मोजलें. गुंडाळी करून तराजूत टाकली आणि वजन पाहून गणित करून म्हणाला टू हंड्रेड सेव्हंटी एट रुपीज. किती वजन होतें आतां लक्षांत नाहीं. पैसे दिले. परत निघालों. रस्ता शोधायला लागलों. देवदूत बाजूलाच उभा होता. तो आला रस्ता दाखवायला. सुटकेचा श्वास घेतला. वाटेंत मला शोधत येणारा देवा भेटला. खूप वैतागलेला.

"अरे काय किती वेळ एवढंसं प्लास्टिक आणायला?"

"अर्धा तास दुनियाभर वणवण करून हा ऐवज मिळाला आहे बाबा."

"अर्ध्या तासात दुनियाभर वणवण करतां येते काय?"

"मग जाड्याला पाठवायचं होतं मला शोधायला!"

आतां तो खुदकन हसला. "त्या दिशाभ्रमिष्टाला? मग संपलंच! तो खादाडखाऊ ताडगोळे खात बसलाय!"

तेवढ्यांत गाडीकडे आलों. त्या देवदूताचे आभार मानले.

मीं स्थानापन्न झाल्याबरोबर जाड्यानें माझ्या हातांत एक वर्तमानपत्राच्या कागदातलें पुडकें दिलें. तीन ताडगोळे होते. कोवळे आणि अवीट गोडीचे रसाळ ताडगोळे. एवढे सुंदर ताडगोळे मीं अजूनहि कधीं खाल्ले नाहींत. शेवडेच्या मतें बहुधा ताडी न काढलेल्या ताडाचे असावेत. फक्त तीनच राहिल्याबद्दल जाड्यानें दिलगिरी व्यक्त केली.

"इतके छान होते कीं राहवले नाहीं."

"तीनतरी ठेवल्याबद्दल धन्यवाद बाबा. हेंहि नसे थोडकें"

प्लॅस्टिकची दोरी माझ्या बॅगेतून काढून गाडींत ठेवलेली होतीच.

मीं ताडगोळे खाईपर्यंत दोघांनीं प्लॅस्टिकनें सामान मस्त बांधून सुरक्षित केलें.

"आता रस्ता शोधा." देवा.

"याच राममा ४७ नें सालेम ओलांडून पुढें गेल्यावर यरकॉडचा रस्ता आहे. नंतर शोधूंया." शेवडे.

आतां ढग जवळ आले होते. सालेम शहर ओलांडल्यावर एकाला विचारलें, "यरकॉड? यरकॉड?"

"देअर ईज अ पेट्रोल पंक ऑन द राईट. बट टेक फर्स्ट लेफ्ट देन."

तमिळनाडूमध्यें पेट्रोल पंपाला ‘पेट्रोल पंक’ म्हणतात आणि इंग्रजींत लिहिलेलें होतें 'PETROL BUNK' प आणि ब ची सरमिसळ किंवा सळमिसर (धन्यवाद थालेपारट - पु.ल.). माझ्या ओळखीच्या डॉ. लक्ष्मण नावाच्या एका तमिळ सद् गृहस्थांनीं एकदां मला सांगितलें होतें कीं तमिळमध्यें ग हें व्यंजन नाहीं. ‘कंका’ लिहितात आणि ‘गंगा’ वाचतात. तें आठवलें. ग प्रमाणें ब देखील नसावें. पोपडे (बोबडे) कुठले!



"अरे माझी दाढ दुखायला लागली." शेवडेनें तक्रार केली. तशी दोनेक दिवस दुखत होती. पण त्याला वाटलें ठीक होईल. पण आतां वेदना वाढली. मग त्यानें भ्रमणध्वनीवरून घरीं बोलून दंतविशारदानें शिफारस केलेल्या वेदनाशामक गोळ्यांचें आणि प्रतिजैविक गोळ्यांचें नांव लिहून घेतलें.



असो. आतां आभाळ दाटून आलें होतें. डावें वळण घेतलें आणि निघालों. एके ठिकाणीं फाटा फुटला होता. आतां झिमझिम पावसाला सुरुवात झाली. जोडीला जोरदार वारा. विचारायला रस्त्यांत कोणी नाहीं. डावीकडे एक शॉपिंग सेंटर होतें. त्यांत रस्ताहि विचारूं आणि औषधहि घेऊं म्हटलें आणि छत्री घेऊन उतरलों. वारा प्रचंड होता. कसाबसा छत्री सांवरत शॉपिंग सेंटर मध्यें घुसलों. एका दुकानदाराला बाहेरूनच ओरडून विचारलें

"यरकॉड?"

पावसाच्या आवाजांत आणि घोंघावणार्‍या वार्‍यांत त्याला कांहीं ऐकूं जाईना. छत्री बंद केली. आंत घुसलों. त्याला ठाऊक नसावें. जरा पुढें गेलों. सुदैवानें एक औषधाचें दुकान होतें. म्हटले याला इंग्रजीहि येत असेल. तिथें तीं औषधें नव्हतीं. पण दुकानाचा मालक हा क्वालिफाईड फार्मासिस्ट होता. त्यानें संदर्भ सूची वापरून इक्विव्हॅलंट औषधें दिलीं.

त्यानें मस्त मार्गदर्शनहि केलें.

"राईट, देन अगेन राईट, देन लेफ्ट टर्न. दॅट रोड गोज टू यरकॉड." असें कांहींसें.

"मेनी मेनी थॅंक्स." मीं स्तोत्र पाठ करावें तसें पाठ करून घोकतच परत आलों.

पाऊस आतां मुसळधार झाला होता. गाडीकडे आलों. आतां माझ्यांत बाजी प्रभू संचारला होता. अतिशय शौर्यानें छत्री उलटी होऊं न देतां वार्‍याला तोंड देत मनांतल्या मनांत रस्त्याचें स्तोत्र घोकत स्वतःची पाठ स्वतःच थोपटत गाडीपाशीं आलों. जाड्यानें दार उघडलें. भिजूं नयेत म्हणून प्रथम औषधें दिली. थ्री फोल्ड छत्री खिशांत राहाते खरी पण जोरदार वार्‍यामुळें ती छत्री बंदच होईना. हें एक अनपेक्षित संकट. वळलें तर छत्री उलटी होणार. छत्री गेली तर गेली. पण तिघे टिंगल करतील त्याचें काय? न वळावें तर छत्री बंदच होत नाहीं. दोन क्षण काय युक्ती करावी याचा विचार करीत होतों. पावसाचें पाणी गाडींत यायला लागलें तसा देवा उखडला. "फेकून दे ती छत्री आणि आंत घूस पटकन. नाहींतर तुला इथेंच सोडून जातों. कसली छत्री घेऊन येतो! चांगली छत्री आणायला काय होतं?"

मग सुचलें. गाडीच्या विरुद्ध बाजूला गेलो. खाली वाकून वार्‍यापासून आडोसा घेतला छत्री बंद केली आणि गाडीला पुन्हां वळसा घालून आंत घुसलों. त्या पांचदहा सेकंदांत नखशिखांत भिजून गेलों. सीट भिजेल म्हणून वाकून उभा राहिलों. तेवढ्यांत जाड्यानें चपळाईनें टॉवेल ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी सीटवर अंथरली आणि टॉवेल हातांत दिला. ओली पाठ सीटला न टेकवतां बसलों. ओली छत्री गुंडाळून छत्रीच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबली. माझे (काळे, विपुल, रेशमी, मुलायम वगैरे) केंस पुसले. रस्त्याचें पाठ केलेलें स्तोत्र म्हणून दाखवलें. सुदैवानें देवाला तें एका फटक्यांत कळलें. देवाला स्तोत्र समजणारच! नाहीं कां? पुढच्या सीटच्या मागच्या खिशातली प्लॅस्टिकची पिशवी काढली. ओला शर्ट आणि बन्यान त्यांत टाकलें. केंस आणि अंगहि पुसून घेतलें व मागें रेलून नीट बसलों. तरीहि दोनतीन मिनिटांत थंडगार पडलों. वातानुकूलन बंद केलें. तरी थंडीनें दांत कडकड वाजायला लागले. बाकीच्या तिघांची मस्त करमणूक झाली. प्रत्युत्तर म्हणून मीं देवाच्या मघांच्या मुक्ताफळांचा आवेशासहित पुनरुच्चार केला. पण तोंड वाकडें करून वेडावत. मस्त हशा पिकला.



"तुमच्या थंडीवर आमच्याकडे औषध आहे." देवानें जाहीर केलें. कोणतें तें सूज्ञांच्या लक्षांत आलें असेलच.



यरकॉडचा घाट साताठ कि.मी.चा छोटासाच आहे. पण तेवढ्या अंतरांत वीसबावीस हेअरपिन वळणें आहेत. जोडीला जोरदार वादळ होतेंच. अर्ध्या तासानें आम्हीं जवळजवळ निम्मा घाट पार केला होता. आतां पाऊस वारे थांबले होते. वादळ शांत झाले होतें पण रस्त्यावर अनेक झाडें उन्मळून पडलीं होतीं. पंधरावीस मिनिटांत त्या वादळानें परिसराचे तीनतेरा वाजवले होते. पूर्ण अंधार नसला तरी उजेड कमीच. पांच साडेपांच वाजतांच सातएक वाजल्याएवढें अंधारून आलें होतें. (तुलना मुंबईची आहे) रस्ता निसरडा. वाटचाल कूर्मगतीची. मीं कुडकुडत होतोंच.



आतां शेवडेच्या दाढदुखीनें उग्र स्वरूप धारण केलें. पण औषधी उपायांनीं नंतर तासाभरानें तो ठीक झाला. वेदना आटोक्यांत आल्या होत्या. जय ऍलोपॅथी.



देवानें जाहीर केलें कीं हॉटेलसंशोधनाची जरूर पडणार नाहीं. दोनतीन आठवड्यापूर्वीं तो इथें आला होता. तेव्हां तो ज्या हॉटेलांत राहिला होता त्याच्या समोरचें हॉटेल जास्त चांगलें होतें. तिथेंच जायचें. सिल्व्हर हॉलिडे हॉटेल खरेंच झकास होतें. नॉन ए सी डबल ऑक्युपन्सी दर रु. ४००/- (हा तपशील माझ्या दगाबाज मेंदूनें पुरवलेले नाहींत तर जपून ठेवलेल्या बिलानें.) एक १२ फूट X १२ फूट चौरसाकार संगमरवरी फरशीचें अंगण. वर प्लॅस्टीकचे हिरवें छप्पर. त्या चौरसाच्या दोन संलग्न बाजूंना दोन डबल ऑक्युपन्सी खोल्या. सभोंवती आवारांत मस्त झाडोरा. आसमंतांत धुकें उतरत होतें. वातावरण स्वप्नवत. मी अजूनहि कुडकुडत होतों. म्हटलें चला प्रथम गरमागरम पाण्याची अंघोळ करूं या आणि कोरडे कपडे चढवूंया. पावसाचा जोर ओसरला होता पण रिपरिप चालू होती. बाथरूममध्यें घुसून गीझर ऑन केला. हाय रे दुर्दैवा, वादळानें वीज गेली होती. फक्त दिवे पंखे लागत होते, इन्व्हर्टरवर. अंग चिकचिकीत झालें होतें. अंघोळ न करतां राहाणें अशक्य होतें. सरळ शॉवरखाली उभा राहिलों अणि धीर एकवटून नळ फिरवला. थंडगार पाण्याने शिरशिरी आली. पण दोनेक मिनिटांत सवय झाली. मस्त आंघोळ करून अंग कोरडें करून कोरडे कपडे घातले. भिजून चिकचिकीत झाल्यावर अंघोळ करून कोरडे कपडे घालण्यासारखें दुसरें सुख नाहीं असें वाटतें. खरेंच, परिस्थितीनुसार सुखाच्या कल्पना किती बदलतात, नाहीं? हातपाय जोरजोरांत हालवून ऊब आणली - वॉर्म अप झालों. पंधरा मिनिटें व्यायाम केला. बाहेर डोकावलों. उजेड पुरेसा नसला तरी पूर्ण अंधारहि नव्हता. पाऊस थाबला होता. झकास थंडी, उतरणारे धुकें. माझा उत्साही मुखचंद्र पाहूनहि दुसराहि बाहेर डोकावून आला. दोघे दुसर्‍या रूममध्यें गेलों. आमचा उत्साह पाहून तेहि बाहेर डोकावले. प्रवासाचा थकवा, माझी थंडी, शेवडेची दाढदुखी, सऽऽगळें विसरलों. पादत्राणें चढवून सगळे लगेच पायीं फिरायला तयार.



बघतां बघतां यरकॉड गावाच्या मध्यवर्ती ठिकाणीं पोहोंचलों. मेंदूला झिणझिण्या येतील असा लाऊडस्पीकरच्या कर्ण्याचा कर्णकर्कश आवाज कानीं आला. तिथें एक देवीच्या उत्सवाची जत्रा होती. तमिळ भावगीत चालूं होतें. तिघे वैतागले. संगीत कर्णफोड असलें तरी माझ्यावर मात्र गारूड करून गेलें. अगदी मराठी भावगीत शोभेल अशी मस्त सुरावट. मराठी सिनेमांत मधुचंद्राच्या दृश्यांत शोभेल असें मेलडिअस युगुलगीत. शब्द कळत नव्हते पण शब्दांमागील भावना स्वर बरोबर पोचवीत होते. स्वरांना भाषेच्या मर्यादा नसतात हें खरें. त्या भारलेल्या वातावरणांत त्या गीतातली ती अगम्य भाषा उगीचच जन्मजन्मांतरीच्या ओळखीची भासूं लागली. असें वाटलें कीं त्या ध्वनीची तीव्रता सुखद भासेल एवढ्या अंतरावर जाऊन फक्त गाणीं ऐकावींत. स्वर्ग दोन बोटें उरला. त्या कर्णफोड स्पीकरपासून त्वरेनें दूर गेलों. पुढचें गीतहि सुंदर होतें. पण बोललों नाहीं. तमिळ गीत छान आहे म्हटलें असतें तर तिघांनीं फिरक्या घेऊन मोरू केला असता माझा.



यरकॉड हें माथेरानसारखें छोटेखानी गांव आहे. एका चौकांत पोहोंचलों. तिथें एका मोठ्या फळ्यावर विविध प्रेक्षणीय ठिकाणांचीं नावें व अंतरें लिहिलेलीं आहेत. सर्वांत दूरचें प्रेक्षणीय स्थळ वीसेक किमी पण नव्हतें. आतां स्थळांचीं नावें व अंतरें आठवत नाहींत. या दगाबाज मेंदूला खरें तर गोळीच घालायला पाहिजे. दुसर्‍या दिवशीं कोणतीं सौंदर्यस्थळें पाहायचीं तें ठरवलें आणि एका पर्यटन केंद्रांत - टूरिस्ट सेंटरवर - जाऊन फिरण्यासाठीं वाहन नक्की केले. बहुधा सहाएक रु. प्रति. किमी दर होता असें वाटतें पण नक्की आठवत नाहीं.



तासभर मस्त फिरून आलों. देवानें शब्द पाळला आणि थंडीवरचें औषध काढलें. रूम सर्व्हिसनें व्हेज ६५ नांवाचा एक अप्रतिम पदार्थ दिला. तीं फुलकोबीची भजीं होतीं. पण अतिशय कुरकुरीत. फुलकोबीवरच्या अगदीं पातळ आवरणांत तांदूळ व उडदाचें प्राबल्य होतें. ताज्या गावरान फुलकोबीची चवच न्यारी. अर्थात प्रत्येक गांवच्या पाण्याच्या गोडीचा आणि त्या त्या पाकसाधकाचा चवीत वाटा असतोच. जोडीला हॉटेलच्या किचनमध्येंच बनवलेलें अप्रतिम टोमॅटो सॉस. चिकन ६५ पण चांगलें होतें पण फुलकोबीची सर त्याला नव्हती. जेवणासाठीं मीं टोमॅटो राईस आणि सांबार मागवलें होतें. शाकाहारी देवा माझा भागीदार होताच. इतर दोघांचें चिकनहि चविष्ट होतें म्हणे.



तिथल्या सौंदर्यस्थळांबद्दल लिहीत नाहीं. तीं समक्ष पाहाण्यांतच आनंद आहे.



क्रमशः



http://www.manogat.com/node/18942

आठवणीतल्या सहली ६ : तिरूपूर

बॅकवॉटर्सच्या रम्य आठवणी मनांत जागवतच कोईंबतूरला परत आलों. दुसरे दिवशीं तिरूपूरला जायचें ठरवलें. तिरूपूर होजियरीसाठीं प्रसिद्ध आहें हें सर्वश्रुत आहेच. इंग्रजी शब्दाबाबत क्षमस्व. होजियरी आणि टी शर्टला ला इंग्रजी शब्द मला ठाऊक नाहीं. तिथें टी शर्टस् व तत्सम वस्तू फार सुरेख आणि स्वस्त मिळतात असें ऐकून होतों. दुसरे दिवशीं तिथें जायचें ठरवलें. देवा कामावर जाणार होता. त्यामुळें आम्हीं चौघांनीं प्रथम स्टेशनसमोरच्या उपाहारगृहांत भक्कम न्याहारी करून त्याला त्याच्या गाडीनें कार्यालयांत दहाच्या सुमारास सोडून तिरूपूरला जायचें असें ठरवलें. पण त्याचा एक पुणेकर मित्र थेट तिरूपूरला येऊन आम्हांला खरेदी करण्यास मदत करणार होता.



देवाला सोडलें आणि अविनाशी पथ पकडून निघालों. एके ठिकाणीं पाटी पाहिली. तिरुपूर ३७ कि.मी. तरी अंतर पार करायला मात्र दीडदोन तास लागले. ऊन भलतेंच कडक होतें. गाडींत मात्र जाणवलें नाहीं. तिरूपूर एक बकाल आणि कळकट शहरडें आहे. प्रथमदर्शनीं वाटतें कीं भिवंडींतच आलों. गाडीच्या कांचा खालीं केल्यावर रेड्यालाहि वांती होईल (मीं कुठेंच न वाचलेला वा ऐकलेला जाड्याचा शब्दप्रयोग) असा एक कुबट दुर्गंधीयुक्त दर्प हवेबरोबर घुसला. कुठून इथें यायची बुद्धि झाली असें वाटलें. माझ्या मनांत अचानक मळभ दाटून आलें. या लोकांना स्वच्छता पाळायला काय होतें कोण जाणे. अखिल तिरूपूरच्या आसमंतांत हा दर्प भरून राहिला आहे. तिथें रस्त्याच्या दुतर्फा सांडपाण्याचे उघडे नाले आहेत. त्यातूनच या दर्पाचा उगम असावा असें मला वाटतें. मुंबईत घाटकोपर आणि मानखुर्द यामधल्या शिवाजीनगर झोंपडपट्टींत तसेंच विमानतळाच्या आसपास जी झोपडपट्टी आहे तिथें असा मानवी विष्ठेच्या दुर्गंधीचें प्राबल्य असलेला दर्प येतो. असो. देवाचा पुणेकर मित्र ठरल्या जागीं वेळेवर ठरल्या वेळीं आला आणि त्यानें स्वतःचे दीडदोन तास खर्चून आम्हांला खरेदीसाठीं चांगलें मार्गदर्शन केलें.



तिरूपूरला खरेदी करणें म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखें आहे. बहुतेक दुकानें घाऊक मालाचीं. कोणत्याहि दुकानांत गेलें कीं टी शर्ट, जीन्स, टॉप्स, लहान मुलांचे कपडे, साईझप्रमाणेंच ठेवलेले असतात. पण पूर्णपणें चुरगळलेले आणि अस्ताव्यस्त. तें बघूनच कांहीं घ्यावेसें वाटत नाहीं. देवाच्या मित्रानें अशाच एका ढिगातून जादू केल्याप्रमाणें दोनचार आकर्षक टी शर्ट्स काढून दाखवले. किंमती जवळपास मुंबईच्या निम्म्या. तीसचाळीस रुपयांपासून टी शर्टस मिळत होते. तिरूपूरला जाऊनहि कांहीं आणलें नाहीं असें व्हायला नको म्हणून शेवडेनें थोडीफार खरेदी केली. घासाघीस करायला जाड्या होताच. आपले पुणेकरहि घासाघिशींत उस्ताद आढळले. एक टी शर्ट मलाहि आवडला म्हणून मीहि घेतला. मुंबईत तेव्हां अडीचशेला वगैरे मिळणारा टी शर्ट शंभर रुपयांत मिळाला. मीं चि. साठीं ‘बॅगी’ आणि ‘लगेज’ विजारी शोधत होतों. एकदोन दुकानांत पाहिल्या पण पसंत आल्या नाहींत. कांहीं आधुनिक इमारतींत चकचकीत दुकानें देखील आहेत. अशाच एका दुकानांत एक शर्ट मात्र आवडला मुंबईत तीनेकशेंला मिळणारा विविधरंगी चौकडीचा सुती शर्ट सव्वाशेंला मिळाला. त्वरित घेतला आणि माझ्या तिरूपूर दौर्‍याचें सार्थक झालें. बॅगी वा लगेज मात्र हवी तशी मिळाली नाहीं. एकदोन ठिकाणीं होत्या पण मुंबईच्याच किंमतीत. डिझाईन वगैरे मुंबईत मिळणारें. मग तें ओझें इथून कशाला न्यायचें? आतां मीं आणि जाड्या उत्साहानें शेवडेला कपड्यांचे ढीग उपसायला मदत करूं लागलों. पुणेंकरांचे आस्थेवाईक आणि सक्रीय मार्गदर्शन होतेंच. शंभरेक नग उपसले कीं पांचसहा नग पसंत पडत. दीडेक तासांत खरेदी आटोपली आणि पुणेकरांचे आभार मानून कोईंबतूरला परत.



परतीच्या आदल्या दिवशीं असेच न्याहारी करून देवाला कार्यालयांत सोडून कोईंबतूरच्या बाजारांत साड्या वगैरे खरेदी करायला गेलों. शहर परिवहन बस आगारासमोर बाजाराचा मुख्य रस्ता आहे. दादरचा रानडे रोड किंवा पुण्याचा लक्ष्मी रोड शोभेल असा. पण गर्दी मात्र दिवाळींत रानडे रोडला असते अशी प्रचंड. पार्किंगची जागा आगाराच्या अगोदर एके ठिकाणीं हेरून ठेवलेली होतीच. कोईंबतूर मुक्कामीं रोज संध्याकाळीं गाडी इथें पार्क करून जेवायला याच रस्त्यावरच्या ओरायनमध्यें जात होतों. एका मोठ्ठ्या भरपूर विविधता दिसणार्‍या साड्यांच्या भल्यामोठ्ठ्या दुकानांत गेलों. दुकान प्रशस्त. आंत फारशी गर्दी नव्हती. झगझगीत प्रकाशयोजना केलेली. जाड्याला म्हटलें एकावर एक फ्री अशा सवलतीत साडीबरोबर बायको फ्री मिळते कां बघ रे भडभुंजा! इथें मराठी कोणाला कळणार असा माझा होरा होता. पण होराभूषणांची फ झाली. गल्ल्यावरचा गोरापान, सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेला खास मारवाडी चेहर्‍याचा वृद्ध गृहस्थ खो खो हसायला लागला. मला मराठी येते म्हणाला. ‘मुंबईत आमची दुकान होती’ म्हणाला. मीं सौ. साठीं दोन साड्या खरेदी केल्या. इथें एक गंमत कळली. शेवडेला कपड्यांची खरेदी अजिबात जमत नाहीं. मला म्हणाला तूंच निवड कर. तिरूपूरला त्यानें तें उघड केलें नव्हतें. मग त्यानें माझ्या पसंतीनें मास्तरणीसाठी आणि मुलीसाठीं पोषाखाचें कापड घेतलें. दुकानदारानें आमच्यासाठीं फळांचा ताजा रस मागवला. दुकानदारींत गुजराती मारवाडी लोकांचा हात कोणी धरणार नाहीं हें खरेंच. मीं बाहेर नैसर्गिक सूर्यप्रकाशांत खरेदी करायच्या वस्तूंचे रंग नीट पारखून पाहात होतों त्याचें त्यानें कौतुक केलें. फुक्कटच्या कौतुकानें हवेंत कांहीं गेलों नाहीं तरी त्याच्या व्यावसायिक स्तुतिसुमनांना मात्र मीं मनांतल्या उघडपणें दाद दिली. क्रेडिट कार्ड स्वीकारलें जात होतें. त्यामुळें खिशांतले पैसे कमी झाले नाहींत.



पार्किंग जिथें केलें होतें त्यासमोरच एक भलें मोठ्ठें मिठाईचें दुकान होतें. रोज घरीं जातांना हें दुकान दिसलें कीं अरे डेझर्ट डेझर्ट म्हणून आमच्यापैकीं कोणीतरी ओरडायचा. या दुकानांत आईसक्रीमच्या कपांतून विविध प्रकारचें ताज्या फळांचें फ्रूट सॅलड मिळत होतें. त्याचा समाचार घेत असूं. त्याच दुकानांतून खास कोईंबतूरची म्हणून मिठाई घेतली. मुंबईपुण्यांत मिळते तश्शीच मिठाई. पण कोईंबतूरची म्हणून घ्यायला हवीच. मिश्र कडधान्यांचा एक वेगळ्याच प्रकारचा चिवडा मीं घेतला. पण घरीं कोणाला पसंत आला नाहीं. तो पाव किलो चिवडा मीं एकटाच महिनाभर चणे खावे लोखंडाचे म्हणत अधूनमधून तोंडांत टाकत होतों.



दुसरे दिवशीं सकाळीं साडेपांचच्या आसपासची गाडी होती. चार वाजतां उठून शुचिर्भूत झालों. देवानें आम्हांला स्थानकावर आणलें. आपलें उपाहारगृह उघडे होतें. इतक्या सकाळीं काय खाणार? चहाकॉफी घेतली. स्टेशनांत गेलों. आरक्षणाच्या यादींत आमची नांवें होतीं. गाडी जवळपास रिकामी. त्यामुळें त्वरित उशा ब्लॅंकेट चादरी मिळाल्या. बाहेर अंधारच होता. त्यामुळें पुन्हां गुडुप झोंपून गेलों. जाग आली तेव्हां तिरूपूर स्टेशन आलें होतें. म्हणजे इथें रेलवेनेंहि येतां येतें. कोईंबतूर एक्सप्रेस गाडी मुंबईला येतांना (येतांना म्हणजे जातेहि त्याच मार्गानें) उलट दिशेनें म्हणजे दक्षिण पूर्वेला सालेमला जाते आणि मग डोंगरदर्‍यांना वळसा घालून बंगळुरूमार्गें मुंबईला येते. इथें मात्र गाडी भरली. वातानुकूलित डब्यांतहि खाद्यपेयांचे विक्रेते येतात आणि आरडाओरडा करून विक्री करतात हें खटकलेंच. पण रात्रीं बारा वाजतां कंडक्टर ड्ब्याचे दरवाजे जे बंद करतो ते थेट सकाळीं उघडतो. त्यामुळें सामानाच्या बाबतींत निर्धास्त राहूं शकतां आलें. चहाचे विक्रेते चॉऽऽय चॉऽऽय करीत फिरत होते. चहाकॉफी फारशी वाईट नसते. आम्लेट ठीक असतें. बिस्किटें, पाण्याच्या बाटल्या मिळतातच. इतर पदार्थ मात्र वाईटच दिसत होतें. कांदा भजीं मात्र मस्त गरमागरम दिसलीं म्हणून एकदां खाऊन पाहिलीं. तीं झकास निघालीं. दुपारीं जेवणाला जाड्यानें बिर्याणी मागवली होती. चव घेऊन पाहिली. फिकी दिसणारी बिर्याणी काळ्यामिर्‍यांचा सढळ वापर करून प्रचंड तिखट केली होती. रंग आणि तिखटपणा याचें प्रमाण तसें व्यस्तच होतें. स्वादबिद मात्र खास नव्हता. कर्डराईसचें - दहीभाताचें रुपडें कांहीं ठीक दिसत नव्हतें. नाहींतरी भलतीकडे दहीं खायचें म्हणजे फसवा जुगारच. दहीं वाईटच असण्याची शक्यता जास्त. उगीच कांहींतरी अस्वच्छ पदार्थ न खायचें मी आणि मास्तरांनीं ठरवलें आणि या प्रवासांत फक्त तळलेले पदार्थ आणि फळें यावर गुजराण केली. मास्तर पुण्याला उतरला आणि आम्हीं दोघे मुंबईला आलों.



क्रमश:



http://www.manogat.com/node/18827

आठवणीतल्या सहली ५ : बॅकवॉटर्स.

तीन वर्षांपूर्वींच्या मधुर आठवणी इथें आल्यावर जाग्या झाल्या नसत्या तरच नवल. गाडी न घेतां दोन रिक्षा करून बोट सुटते तिथें आलों. विशीतला तरुण कप्तान आमची वाटच बघत होता. सगळीकडें सामसूम दिसत होतें. सुटणार्‍या बहुतेक बोटी सुटून निघून गेल्या होत्या. दुसर्‍या एका बोटींत दहाबारा प्रवासी बसलेले होते आणि ती बोट आणखी प्रवासी मिळायची वाट पाहात होती. गाईड पाहिजे काय म्हणून आमच्या कप्तानानें विचारलें. सव्वाशें रुपये म्हणाला. हाहि वीसेक वर्षांचा तरणाबांड मुस्लिम मुलगा. तरतरीत कोवळा चेहरा, व्यवस्थित नाहीं तरी बर्‍यापैकीं इंग्रजी बोलतां येणारा. उगीच मीं तरी हिंदीचा खून पाडायला नको. मुख्य म्हणजे त्याच्या चेहर्‍यावरचें निरागस बालपण अजून न मावळलेलें. तारुण्यसुलभ उत्साह ओसंडून जात असलेला. कांहीं माणसें आपल्याला प्रथमदर्शनींच आवडून जातात. तस्साच हा मुलगा. मुख्य म्हणजे त्याचें व कप्तानाचें बरें दिसत होतें. मित्रच असावेत. घेतला त्याला पण. सव्वाशे रुपये आपल्याला कांहीं फार नाहींत. तरुणांना रोजगार मिळाला तर ते वाममार्गीं लागणार नाहींत. खरें तर अशा रोजगारावर तरुणांचाच पहिला हक्क आहे. मुंबईत मात्र बरीचशीं अनुभवी माणसें स्वतःला असलेल्या पूर्ण वेळ नोकरींत तसें बर्‍यापैकीं चालत असलें तरी आणखी एखादी फुटकळ अर्धवेळ नोकरी करतात आणि एखाद्या तरुणाचा रोजगार हिरावून घेतात. असो. भलतेंच विषयांतर झालें. चेहरा निबर, बनेल दिसत नव्हता म्हणूनच त्याला घेतलें हें खरें.



तर या तरुण मार्गदर्शकाला आम्हीं घेतलें. आम्हांला तास दोनतास मजेंत घालवायचे आहेत. एकदा आम्हीं कोट्टायमहून बॅकवॉटर्स पाहिलेलें आहे. जें आमच्यासारख्या परक्यांना सहज दिसणार नाहीं अशा गोष्टी दाखव. इथली स्थानिक ताजी मासळी, एखादा स्थानिक खाद्यपदार्थ, सहसा पाहिलें न जाणारें एखादें नयनरम्य ठिकाण वगैरे. शक्यतों गर्दी नसलेलें. गर्दींत मात्र नेऊं नकोस, ती मुंबईत भरपूर असते, नवीन कांहींतरी, असें सांगितलें. त्यानें कप्तानाबरोबर कांहींतरी गुडुगुडू केलें. म्हणाला इथें एक बेट आहे. तिथें जाऊंया. इकडे सगळीकडे आहेत तशीं हिरवीगार झाडें, फडफडता ब्लॅक फिश आणि जायंट प्रॉन्स आपल्याला आपल्यासमोर विस्तवावर भाजून देतात. जोडीला ताडी, गावठी दारू. नाहींतर विदेशीचा हवा तो ब्रॅंड जातांना इथूनच घेऊन जाऊं. ताडगोळे, शहाळीं असतातच. आम्हांला गांवठी मद्यांत वा विदेशींत रस नाहीं. ताडीची चव घेऊन पाहूं. आवडली तर घेऊं नाहींतर नाहीं. पण ताडी वा दारू फारशी महत्त्वाची नाहीं. तें सगळें मुंबईत मिळतें. महत्त्वाची गोष्ट निसर्ग, शांतता आणि वेगळें खाद्य. तर त्या बेटावरच स्वारी करायचें ठरलें.



बोट म्हणजे मुंबईत गेटवेला लॉंचेस असतात तश्शी लाकडी लॉंच. पंधरावीस फूट लांब, आठदहा फूट रुंद. लाकडी बोटीला आकर्षक पांढरा रंग दिलेला. कप्तानानें इंजिन सुरूं केलें. शांततेवर घणाघात करीत इंजिन सुरूं झालें. या बोटींची इंजिनें खरें तर आधुनिक गाड्यांइतकीं कमींत कमी आवाज करणारीं असायला पाहिजेत. पण आर्थिक बचत आड येते ना. असो. निसर्गसुंदर बॅकवॉटर्स. ओणमच्या शर्यती जिथून सुरुं होतात तें ठिकाण त्यानें दाखवलें. तसें चित्रवाणीवर आपण पाहिलेलें आहेच. तरी प्रत्यक्ष पाहण्यांत वेगळी मजा आहे. किंचित हलके तरंग उठणारें तसें शांत, संथ पाणी, त्यांत आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचें तरल प्रतिबिंब. मन उत्साहानें ओसंडून जातें. प्रकाशचित्रांत पाहा.



आम्हीं ठरविलेल्या बोटींत येऊन बसलों अगदीं सुरेख बोट होती. प्रकाशचित्रांत दिसतेच आहे.




मार्गदर्शकानें दुरून बेट दाखवलें आणि आम्हीं हरखून गेलों. मौजमस्ती सुरुं झाली.


बोटीचें इंजिन बंद केल्यावर इतकें शांत वाटलें म्हणून सांगूं! चिमुकल्या लाटा बोटीवर आपटून चुबुक चुबुक करीत होत्या. किनार्‍यावरच्या झाडोर्‍यातून वार्‍याची सळसळ, पक्ष्यांची किलबिल ऐकूं येत होती. मधूनच दूरवरून एखाद्या गाईचें हंबरणें, दूरवरून माणसांच्या बोलण्यचे आवाज. तिथें एक गांवठी घर होतें. मार्गदर्शकानॆं तिथल्या माणसाशीं गुडुगुडू केलें. ब्लॅकफिश आणि जायंट प्रॉन्स ऊर्फ महाकोलंबी ताजे आहेत म्हणाला. १००/- रु. प्रत्येक. घासाघीस करून किंमत कमी केली नाहीं. पर्यटनाच्या ऐन मोसमांत किंमत प्रत्येकीं रु. ३००/- असते म्हणाला. तळून, करी करून, भाजून कसे पाहिजेत म्हणून विचारलें. आम्हां चौघांपैकीं दोघेजण मत्स्यप्रेमी. दोघांनीं एक ब्लॅकफिश आणि एक ऊर्फ महाकोलंबी - विस्तवावर भाजलेल्या - ची मागणी दिली. त्यांनीं विस्तव पेटवून मासळी भाजायला टाकली. आम्हीं दोघांनीं मात्र ताडगोळे, जांभळें इ. पसंत केलें. आतां हेंच जेवण होतें. तिथें जेवणाची देखील सोय होती. उकडा भात, माशांची आमटी वगैरे. केरळी माशांच्या आमटीत खोबरेल तेल वापरतात त्यामुळें आपल्या सवंगड्यांनीं न जेवणेंच पसंत केलें. तारीख होती २ ऑक्टोबर. म्हणून ताडी मिळणार नाहीं म्हणाला. बरोब्बर तीन वर्षांपूर्वीं २ ऑक्टोबरला आम्हीं मुर्डेश्वरला होतों. तिथें सतरा अटी असलेल्या आर एन शेट्टीच्या धर्मादाय वसतिगृहातहि लोक दारू पीत होते त्याची आठवण झाली. मग त्या मार्गदर्शकाची मस्त खिल्ली उडवली. काय तुझें इथें अजिबात वजन नाहीं. सरळ नाहीं म्हणून सांगतात. तुझा जन्म फुकट आहे वगैरे. आतां मात्र तो इरेला पेटला आणि थोडें अंतर जाऊन त्यानें एक प्लॅस्टिकचा मग भरून ताडी आणली. ताकासारखी लागते. सोड्यासारखे कर्बद्विप्राणिल वायूचे बुडबुडे पण येतात. पण स्वाद मात्र चांगला नाहीं. किंचित दुर्गंधीच येते. मला वाटतें कीं स्वच्छता चांगली राखली आणि शुद्ध विरजण - स्ट्रेन - वापरलें तर ताडीमाडीला चांगला स्वाद येऊं शकेल. पण संशोधन कोण करणार? असो. सुमारें पाऊण लिटरचा प्लॅस्टीकचा मग. सरकारी लोक आले तर पाण्यांत टाकून द्या म्हणाला. आम्हीं चौघांनीं घोटघोट घेऊन चव पाहिली. चौघांनाहि चव तेवढी आवडली नाहीं. कसाबसा संपवला. म्हणून दुसरा मागवणार नव्हतों. तेवढ्यांत त्यानें दुसरा मग आणला. मग तो घेतला आणि त्याला आणखी आणूं नको म्हणून सांगितलें.



तोपर्यंत आमचीं जांभळें, ताडगोळे वगैरे आले आणि मासेहि भाजून झाले. महाकोलंबी एवढी प्रचंड होती कीं मला वाटलें कीं शेवंड ऊर्फ लॉबस्टर

आहे. मग जाड्यानें दोहोंतला फरक समजावून सांगितला. ब्लॅकफिश म्हणजे हाताच्या पंजाएवढा पापलेटसदृश काळा चपट मासा. चव घेतल्याबरोबर त्यांनीं आणखी एकेक ची मागणी नोंदवली. आतां ताडीची किंचित नशा जाणवायला लागली. ग्लासभर स्वीट वाईन वा पोर्ट घेतल्यासारखी. शरीर किंचित हलकें वाटलें, चित्तवृत्ति आणखी तरल झाल्या. युफोरिया म्हणतात तो जाणवला. भूमंडळ मात्र अजिबात डळमळत नव्हतें. परिसराच्या त्रिमिती अवकाशाला वक्रताहि आली नाहीं. ताडगोळे, जांभळें छानच होतीं. पण एक गंमत झाली. जाड्या ज्या कौशल्यानें परमेश्वराच्या पहिल्या अवताराचा समाचार घेत होता तें मार्गदर्शक आणि कप्तान अवाक होऊन पाहूं लागले. मी लहानपणापासून मासे खात आहे, पण असें मात्र खायला येत नाहीं असें म्हणाला. त्यांनी आणखी एकेका ब्लॅकफिश आणि जायंट प्रॉनची मागणी नोंदवली. तो मार्गदर्शक याला खातांना पाहून वेडाच झाला होता. आम्हीं नेहमींच पाहात असल्यामुळें आम्हांला कांहीं वाटत नाहीं. नवीन मासे येईपर्यंत याला खातांना बघायला आणखी पांचसहा जण जमा झाले होते.

प्रकाशचित्रांत पाहा खाणार्‍याची गंमत.



अर्ध्यापाऊण तासांत खाणें आटोपलें. मग पुन्हां बोट सुरूं करून त्यानें एक मस्त फेरफटका केला. मला मुंबईजवळच्या घारापुरीला जातांनाचा बोटीचा प्रवास आठवला. इथलें पाणी संथ होतें. घारापुरीच्या समुद्रांत वारा असला तर चांगल्या आठदहा फूट उंच लाटा येतात व बोट चांगलीच हलते. मोठ्ठी लाट आली कीं कप्तान एक घंटा वाजवतो आणि बोट वळवून आडव्या लाटेच्या ४५ अंशात दिशा ठेवतो. मग खलाशी क्लच दाबतो. बोटीचा वेग पार कमी होतो. बोट लाटेवर उचलली जाते व मग पुन्हां खालीं येते. मग कप्तान पुन्हां प्रवासाची दिशा पकडतो आणि घंटा वाजवतो. मग खलाशी पुन्हां क्लच सोडतो आणि बोट पुन्हां वेग घेते. आपलें याकडे लक्ष गेलें तर पोटांत गोळा येतो आणि त्यांतला थरार जाणवतो. असो. इथें बॅकवॉटर्समध्यें मात्र संथ शांत जलप्रवास.



त्या मस्त निसर्गरम्य परिसरांत आम्हांला आणखी तासभर फिरवलें आणि पुन्हां मूळ ठिकाणीं आणलें.



क्रमश:



http://www.manogat.com/node/18538#comment-155763

आठवणीतल्या सहली ४ : अलेप्पी - सायकल चाको, इत्यादि इत्यादि

०१-१०-२००३.

अखेर हॉटेल कमल आलें. एल आकाराची एकमजली इमारत. मस्त आयताकृती पार्किंग. रस्त्यापासून चांगलें वीसेक फूट आंतल्या बाजूला. दोन्हीं शाखांत पहिल्या मजल्यावर पांचपांच अटॅच्ड डबल रूम्स असलेल्या सामाईक सज्जा असलेली चाळवजा इमारत. तळमजल्याला कार्यालय. कार्यालयांत चहाकॉफीचें यंत्र. त्वरित गरमागरम चहा मिळाला. खोल्या बर्‍यापैकीं स्वच्छ. नवीनच हॉटेलमधल्या भिंतींना नवीन चकाचक रंग. डबल ऑक्युपन्सीचे सहाशें रुपये. सग्गळ्या खोल्या रिकाम्या. मग काय जाड्यानें घासाघीस करून चारशेंवर आणलें. व्यवस्थापक पांचसव्वापांच फुटी गहूंवर्णीय मध्यमवयीन केरळी माणूस. दाढीमिशी राखलेली, केंस वाढवलेले आणि मागें बुचडा. अतिशय नम्र, गोड, भारदस्त पुरुषी आवाज. बर्‍यापैकीं इंग्रजीत बोलूं शकणारा. बोलतांना मान हलवायची ढब. किंचित दाक्षिणात्य उच्चार. मुंडू गुढग्यापर्यंत उचलून खोंचलेलें, वर टी शर्ट. गप्पिष्ट स्वभाव. कार्यालयांतच झोंपणारा. सकाळीं पांचच्या आधीं उठणारा. म्हणजे चहाची मस्त सोय होती. बाजूलाच पाण्याच्या बाटल्या, शीतपेयें इ. मिळणारीं दुकानें होतीं. मुख्य म्हणजे भलींमोठ्ठीं केरळी केळीं. तीन रुपयाला एक केळें या तेव्हांच्या रास्त भावांत मिळणारीं. पावणेपांचलाच चहाचें मशीन चालूं करून ठेवतों म्हणाला. साडेसहाला नक्की गरम पाणी माणून देतों म्हणाला. समोरच चांगला ढाबा आहे म्हणाला. एकदम दोन खोल्या गेल्या म्हणून खूष झाला होता. रात्रीं नऊपर्यंत आणखी हॉटेलमध्यल्या आणखी तीन खोल्या मार्गीं लागल्या. आमची हॉटेल मोहीम अखेर फळाला आली होती. दुसर्‍या दिवशीं उजाडल्यावर काढलेलें प्रकाशचित्र पाहा. कसा मस्त निसर्ग आहे केरळमधला.




०२-१०-२००३

वेळेवर उठालों. त्वरित चहा बिस्किटें, भरपूर पाणी, बर्‍यापैकीं गार हवा, आभाळांत तसे ढग होतेच, पण उंच होते. पावसाची शक्यता दिसत नव्हती. हिरवागार निसर्ग. आणखी काय हवें? जाड्याला हवीं होतीं तीं भूकमारी बिस्किटें मिळालीं. मारी बिस्किटें खाऊन थोडा वेळ भूक मारतां येते म्हणून भूकमारी. आम्हीं मात्र आगामी न्याहारीवर अन्याय न करणेंच पसंत केलें. पावणेसातच्या सुमारास निघालों. साडेआठनऊच्या सुमारास रा.म.मा.ला लागून एक पेट्रोल पंप आणि बाजूला बरेंसें उपाहारगृह दिसलें. पेट्रोल भरणें आणि पोटपूजा करायला घुसलों. नेहमींचे दाक्षिणात्य पदार्थ. मस्त गरम आणि स्वादिष्ट. तेवढ्यांत देवाला भ्रमणध्वनीवर निरोप आला आणि बोलावें लागलें. वीसेक मिनिटें बोलल्यावर त्याची बॅटरी उतरली. नेमकें तें हातयंत्र देवाच्याच पूर्वींच्या कंपनीचें - सीमेन्सचें होतें. चांगलें साडेबारा हजार रुपयांचें. अशा फालतू कंपनीचें यंत्र असल्यावर आणखी काय होणार. हीं असलीं सगळीं फालतू माणसें कामाला ठेवतात मग दर्जा कसा सुधारेल, चोरहि चोरून नेणार नाहीं, भिकार्‍याला दिलें तर तो सुद्धां अपमान समजून यंत्र देणार्‍याच्या कानफटांत मारेल वगैरेवगैरे शेरेबाजी करून आम्हीं त्याला छळलें. निघालों. रा.म.मा.वर जाऊन कांहीं मीटर पुढें जाणार तोंच देवाच्या लक्षांत आलें कीं भ्रमणध्वनि उपाहारगृहांत राहिला. देवानें गाडी उलट्या दिशेनें मागें मागें चालवत पुन्हां उपाहारगृहांत आणली. ताबडतोब एक वेटर आमच्या दिशेनें तें हातयंत्र घेऊन धांवत आला. आणि आमच्या गाडींत एकच हास्यकल्लोळ झाला. देवानें त्या वेटरला १०० रु. बक्षिसी देऊं केली पण त्यानें घेतली नाहीं. हातयंत्र देवानें परत घेतलें हेंच त्याचें बक्षीस म्हणून कोणीतरी शेरा मारलाच.



ताजेतवाने होऊन निघालों. रस्ता मोकळा आणि मस्त. रहदारी फारशी नाहीं. ऊनसावलीचा खेळ सुरू होता. पाऊस नाहीं. सरासरी ८० - ९० किमी. चा वेग कायम राहिला. अकराच्या सुमारास अलेप्पी आलें. प्रथम हॉटेलशोधन. सहलीच्या ठिकाणीं साधारणपणें विविध हॉटेलचे दलाल आपल्या मागें लागतात. रस्ता विचारत एका दगडी पुलापशीं आलों. इथून आपल्याला बॅकवॉटर्सची सफर करायला बोटी मिळतात. तस्साच एक दलाल इथें मागें लागला. अलेप्पीला एका विशिष्ट प्रकारचे दलाल आहेत, निदान तेव्हां २००३ सालीं होते. सायकल चाको म्हणतात त्यांना. सायकलवरून फिरतात म्हणून सायकल चाको. दाक्षिणात्य इंग्रजीत बोलत होता. इंग्रजी शब्द आला नाहीं किं हिंदी आणि हिंदीहि सुचला नाहीं तर मल्यालम. असें हॉटेल देतों, तसें हॉटेल देतों म्हणायला लागला. आम्हांला गांवांतले घर पाहिजे बाबा. पॉश शहरी हॉटेल नको. आणि शहराच्या रहदारीपासून दूर, शांत ठिकाणीं. महाग नको. स्वस्त पाहिजे. पैसे संपत आलेत वगैरे. थोडें दूर चालेल कां म्हणाला. किती दूर? तर दीडदोन किमी. तुम्हांला नक्की पसंत पडेल. टेरिफ काय? तर म्हणाला चारशें रुपये. घासाघीस करतां येईल म्हणाला. म्हटलें पाहून तर घेऊं. आज फिरायचें असेल तर बोटीचें तिकीटहि काढा म्हणाला. आम्हीं म्हटलें कीं आम्हांला तिकीट नको, अख्खी बोट पाहिजे. साधारण दर काय असतात. तो म्हणाला बाराशें, साडेबाराशें असतात. एका बोटीपाशीं नेलें. घासाघीस करून साडेआठशेला जाड्यानें पटवला. पण एक तासानें निघणार म्हणून सांगितलें. तोपर्यंत थांबतां आलें तर थांबा नाहींतर आम्हीं दुसरी बोट घेऊं.



सायकल चाकोचें दर्शन या प्रकाशचित्रांत मिळेल.



त्यानें हॉटेल गौरी दाखवलें. सुमारें अडीच किमी.वर होतें. प्रशस्त अस्सल केरळी संस्कृतीचें दर्शन होईल असें घर. अंगणाला लागून ओटीवर जाण्यचा रस्ता. ओटीवरच कार्यालय थाटलेलें. कार्यालयाचें पार्टिशन म्हणून मत्स्यालय. अंदाजें सहा फूट लांब, तीन फूट उंच आणि दोनेक फूट रुंद अशा एकावर एक दोन कांचेच्या सुबक देखण्या टांक्या. अश्शाच आणखी दोन टांक्या त्याच दोन टांक्याना लागून काटकोनांत. कार्यालयाच्या आंत गेलें कीं समोर काउंटर. उजव्या हाताला बसण्यासाठीं एक सोफा, सोफ्यासमोर दोन वेताच्या खुर्च्या. मध्यें आयताकृति चारपाई - टी पॉय. वेताच्या खुर्चीत कापसाच्या गाद्या, गद्यांवर स्वच्छ परीटघडीचे अभ्रे. काउंटरवर पांच सव्वापांचफुटी जाडगेला गृहस्थ. रंग सांवळा. आम्हीं आलेलों पाहून उठून उभा राहिला. गुड मॉर्निंग केलें. प्रथम हॉटेल दाखवा म्हणून आम्हीं विनंति केली. ओटीवरच्या कार्यालयांतून प्रशस्त माजघरांत उघडणारा शिसवी (काळें पॉलिश केलेला सागाचा पण असूं शकतो.) दरवाजा. अतिशय प्रशस्त, चांगलें वीस फूट X पंधरा फूट असावें. जमिनीवर हिरवट काळसर कोबा. दक्षिणेंत लालभडक, तपकिरी, हिरवा, निळा अशा विविध आकर्षक रंगांत कोबा घालतात, म्हणून रंग लिहिला.) मध्यभागीं अदमासें पांच फूट X दहा फूट एवढा चार खुंटाभोंवती जाड दोरखंडानें बनवलेला आयत. या आयतांत विविध आकाराचे मोठ्ठे हंडे, कळशा, पातेली, तपेल्या, समया वगैरे तांब्यापितळेचीं लखलखीत भांडी शोभेसाठीं मांडून ठेवलेलीं. माजघराच्या चार कोपर्‍यांत चार दरवाजे. डबल ऑक्युपन्सी अटॅच्ड सिंगल रूम्समध्यें उघडणारे. बाथरूम्समध्यें रंगीत लखलखीत सॅनिटरी लाद्या. कमोड, शॉवर, बेसिन लखलखीत. गरम पाणी फक्त सकाळीं एकदां. सामान ठेवायला चक्क पॉलिश केलेलीं लाकडी फडताळें. खोलीला उभ्या मध्य अक्षांत फिरणार्‍या उभ्या आयताकृति अशा भरपूर खिडक्या. खालीं गुळगुळीत लादी. फक्त एक वातानुकूलित अणि एक साधी खोली अशा दोन खोल्या शिल्लक होत्या. वातानुकूलित खोलींत जमिनीवर जाजम. प्रकाशचित्रांत पाहा साध्या खोलींत विशिष्ट खिडक्या कशा शोभून दिसताहेत.



वातानुकूलित खोलींत पाहा कसें सुंदर फडताळ आणि जाजम कसें शोभून दिसतें आहे.



माजघरांत समोरच्या बाजूला आणखी एक सहावा दरवाजा. त्या दरवाजातून गेल्यावर डावीकडे प्रथम सामानाची खोली. त्यापुढें स्वैंपाकघर. उजव्या बाजूला आणखी कांहीं खोल्या. समोर मस्त परसूंवजा बाग.



हॉटेलच्या दर्शनानें आम्हीं सगळे खूष. साधी खोली रु. साडेतीनशें व वातानुकूलित साडेसातशेंला जाड्यानें घासाघीस करून ठरवली. अगदीं सांस्कृतिक वारसा - हॅरिटेज म्हणतां येईल अशा खोल्या फारच स्वस्तांत मिळाल्या होत्या. एखादा व्यासंगी वास्तुशास्त्रज्ञ या हॉटेलवर अर्ध्या तासाचा मस्त चलत्चित्र माहितीपट बनवूं शकला असता. मीं करंट्यानें स्थिरचित्रें पण काढलीं नाहींत. अजून हॉटेल गौरी तिथें आहे कीं नाहीं ठाऊक नाहीं. कदाचित तिथें एखादी अत्याधुनिक इमारतहि उभी राहिली असेल. निदान तेव्हां मला तरी सुचलें नाहीं हें खरेच. असो. बारा वाजत आले होते. खोल्या दोन दिवसांसाठीं घेतों म्हटल्यावर मालक खूष झाले. थंड पाण्याचा शॉवर घेऊन ताजेतवाने झालों आणि निघालों बॅकवॉटर्स बघायला.



क्रमशः



http://www.manogat.com/node/18377



Tuesday 13 April 2010

आठवणीतल्या सहली 3 : कोईंब - टूर

३०-०९-२००३

आम्हांला पाहून देवा खूष. आम्हीं बाहेर गाडीकडे आलों. गाडी पाहून देवा हरखून गेला. एखादी जिवाभावाची मैत्रीण भेटल्यासारखा. शेतकरी बैलाच्या वा जॉकी घोड्याच्या अंगावर जसा प्रेमानें हात फिरवतो तसा गाडीवर हात फिरवला. चावी घेतली आणि व्हीलवर बसला. दहाएक मिनिटांत त्याच्या कॉलनींत आलों. मला एकदम इलेक्ट्रीक हाऊसजवळच्या पारसी कॉलनीची आठवण झाली. तश्शीच कॉलनी. एके ठिकाणीं गाडी उभी केली. दोघे इथेंच थांबा म्हणाला. मास्तर आणि जाड्या तिथेंच थांबले. तळमजला + ३ इमारत. इमारतीला लागून दहाएक फुटांच्या मातीच्या पट्ट्यांत झाडें. मातीच्या पट्ट्याभोंवती सिमेंटचा फूटदोनफूट उंच बांध. बहुधा मातीची धूप होऊं नये म्हणून. मग इमारतींच्या पुंजक्यांना वेढून रस्ता. रस्त्याकडेला दोन्हीं बाजूंना पार्किंग. झाडांना लागून असलेल्या आंतल्या बाजूनें तसेंच बाहेरच्या कुंपणाला भिंतीला लागून देखील. पार्किंगच्या जागांवर फ्लॅट क्रमांक लिहिलेले. पुन्हां झाडें आणि कुंपणाची भिंत. आम्हीं गाडी उभी केली ती इमारतीची मागची बाजू होती.



मी आणि देवा चालत वळसा घालून इमारतीच्या पुढच्या भागांत आलों. समोर बागेंत रक्तवर्णी चांफ्याचें झाड. हिरवींगार पानें आणि लालभडक फुलें. एवढें सुंदर चांफ्याचें झाड प्रथमच पाहात होतों. लहानपणीं आजोळीं पांढरा चांफा होता. पण त्याचे खोड मात्र कमालीचें कुरूप होतें. शिवाय त्याला जेव्हां फुलें येत तेव्हां पानें पूर्ण गळून गेलेलीं असत. त्यावर झोंके घ्यायला पण मनाई होती. हा लाल चांफा मात्र सर्वांगसुंदर होता. डौलदार हिरव्यागार गच्च पर्णसंभारांत उठून दिसणारी लालभडक फुलें. मन प्रसन्न झालें. नंतर जेव्हां जेव्हां इथें राहिलों तेव्हां जातायेतांना हा वार्‍यानें डौलांत सळसळणारा लाल चांफा माझें ये, मित्रा ये, म्हणून दिमाखांत लवून स्वागत करी. तिथला पारिजातक मात्र इथें नव्हता. इमारतींत शिरलों. क्षणदोनक्षण भान हरपून चांफ्याकडे बघतच बसलों. आंत गेलों. उजव्या हाताला सोसायटीचें कार्यालय. कार्यालयांत दोन दाक्षिणात्य महिला. जेमतेम पांच फूट उंच, अस्सल दाक्षिणात्य वर्ण. इंग्रजी बोलूं शकणार्‍या. साडी/ड्रेसवर पांढरा कोट घातलेल्या. त्यांच्याकडून चावी घेतली. तळमजल्याच्या एका फ्लॅटमध्यें गेलों. दरवाजा दिवाणखान्यांत उघडला. डाव्या हाताला भिंत. चारएक फुटांवर भिंतीशीं काटकोन करून एक दोन अडीच फूटाचें, इंचभर जाड, कांचेतच कोरलेल्या चित्रांच्या कांचेंचें देखणें वळणदार कडेचें चमचमणारें पार्टिशन. त्यापलीकडे सोफा. त्यासमोर एक साईड टेबल. दरवाजाच्या समोरच्या बाजूला सज्जा - बाल्कनी. मुंबईसारखा चिंचोळा सज्जा. पुण्यासारखा प्रशस्त सज्जा नाहीं. सज्जाला लागूनच गाडी उभी केली होती. सज्जातून सामान आंत घेतलें. आम्हांला स्थानापन्न करून देवा त्याच्या हपिसांत गेला आणि संध्याकाळीं येणार म्हणाला.



दिवाणखान्यांत मध्यभागीं एक मस्त झुंबर. पण छत कमी उंचीचें. हात वर केला कीं झुंबर सहज हाताला लागत होतें. वाटलें झुंबर हात लागून कधींतरी नक्कीच पडेल. उजव्या हाताला भिंतीला लागून आणि डायनिंग टेबल. नंतर साडेतीन चार फुटी पॅसेज. पॅसेजमधून गेलें कीं डाव्या हाताला एक बेडरूम. बेडरूम वातानुकूलित. ही बेडरूम रिकामी असल्याने मी आणि जाड्यानें बळकावली. दुसर्‍या बेडरूममध्यें देवा राहत होता त्याच्याबरोबर शेवडे. उजव्या हाताला एक बाथरूम. पुढे समोर वॉश बेसिन आणि त्याला लागून डाव्या हाताला दुसरी वातानुकूलित बेडरूम. त्या बेडरूममध्यें अटॅच्ड बाथरूम. इथें देवा राहात होता. शेवडे इथें घुसला.



बेडरूममध्यें भला मोठा वॉर्डरोब. वॉर्डरोब आम्हीं निम्मानिम्मा विभागून घेतला. बॅगा रिकाम्या केल्या. घरांत घालायचे कपडे वॉर्डरोबमध्यें नीट लावून ठेवले. संध्याकाळीं बाहेर जातांना घालायचे कपडे तिघांनींहि हॉलमध्यें साईड टेबलवर रचून ठेवले. आंघोळी आटोपल्या आणि मस्त ताणून दिली.



उठून व्यायाम करून (चहाशिवाय) ताजेतवाने झालों व कपडे घालून तयार होणार तों लक्षांत आलें कीं तिथें काम करणारी महिला येऊन कचरा वगैरे काढून साफसफाई करून गेली. आम्हीं संध्याकाळीं घालायला म्हणून साईडटेबलवर रचून ठेवलेले कपडे त्या कर्तव्यतत्पर महिलेनें धुवून वाळत टाकले होते. करमणूक झाली. दुसरे कपडे घालून निघालों. साडीवर राखाडी रंगाचा कोट घालणारी ही दाक्षिणात्य महिला काटकुळी, जेमतेम चार फूट उंच आणि मला लाजवणार्‍या कट्टर वर्णाची होती. गणवेष घातला तर आपल्याकडे शाळेंत सातवीआठवींत सहज प्रवेश मिळेल अशी बिट्टी.



वसाहतीच्या बाहेर आलों. पावसाचा शिडकावा झाल्यानें किंचित गारवा ल्यालेली उबदार हवा. असें वाटलें कीं मुंबईत इलेक्ट्रिक हाऊस, कुलाबा इथेंच आहोंत. हवा मात्र पुण्यासारखी कोरडी पण मुंबईसारखी गरम. फेरीवाले नव्हते. मस्त मोकळा रस्ता. फेरीवाले विरहित स्वच्छ पदपथ, पादचारी तुरळक, न थुंकणारे. मुंबईकरांनीं यांच्याकडून शिकायला पाहिजे. रस्त्यावर फारशी रहदारी नाहीं. दोनेक तास मस्त चालायला मिळालें. नंतर देवानें साताठ कि.मी. दूर बाजारांत एका चार मजली इमारतीच्या गच्चीत वसलेल्या ओरायन नांवाच्या रेस्तरॉं मध्यें जेवायला नेलें. उत्कृष्ट सामिष तसेंच निरामिष जेवण होतें. इथला कर्डराईस म्हणजे हिंगजिरेमोहरी, आलेंलसूण आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीची खमंग फोडणी दिलेला दहीभात तर वाखाणण्याजोगा. उद्यां अलेप्पीला जायचें नक्की केलें. बॅकवॉटर्स तीन वर्षांपूर्वीं पाहिलेलें होतेंच. पण कोट्टायमहून. आतां अलेप्पीहून जायचें ठरवलें. घरी आल्यावर बॅगा भरल्या.



०१-१०-२००३

नेहमींप्रमाणें सकाळीं निघालों. प्रथम न्याहारी. देवाकडे स्वैपाकाचा गॅस नव्हता. त्यामुळें घरांत कांहीहि शिजवत नव्हतो.

"एवढ्या सकाळीं एवढ्या छोट्या शहरांत कुठलें हॉटेल उघडे असायला? इकडे तिकडे शोधाशोध करण्यापेक्षां कोईंबतूर स्टेशनसमोर दोन उपाहारगृहें आहेत, दोन्हीं मस्त आहेत तिथें जाऊं." देवा.



गेलों त्यापैकीं एकात. मुंबईला सोडा, पुण्यालाहि मीं कधीं पाहिलें नाहीं एवढें प्रशस्त उपाहारगृह. स्टेशनसमोर असल्यामुळें माणसांनीं गजबजलेलें. सकाळीं साडेसहासातला जसें दादरसमोरचें दरबार हॉटेल गजबजलेलें असतें तसें. सांबार, डोसा चहाचा संमिश्र गंध दरवळत होता. जीभ चाळवली नसती तरच नवल. दहापंधरा बाकें भरूनहि निम्म्यापेक्षां जास्त जागा रिकाम्या होत्या. आपल्याकडे उडिपी हॉटेलात असते तश्शीच निरंतर स्वच्छता, तत्परता चालू. जमीनीच्या स्वच्छतेसाठीं खाकी कोटातली मुलें, खाल्लेलीं भांडीं न्यायला आणि टेबल साफ करायला राखाडी कोटातलीं मुलें, पाण्याचे ग्लास द्यायला पांढर्‍या कोटातली मुलें आणि ऑर्डर घ्यायला आणि खाद्यपदार्थ आणून द्यायला बदामी गणवेषांतले वेटर्स. वेटर्सच्या खिशावर हॉटेलचें नांव भरतकाम केलेलें गडद निळ्या रंगांत झळकत होतें. जमिनीवर कोटा लादी आणि उडपी डिझाईनचीं, फिक्या बदामी रंगाचीं सनमायका पृष्ठभागाचीं टेबलें व बांकें. एक टेबलाशीं तीन + तीन माणसें बसूं शकतील अशीं. एका रांगेंत एकामागें एक आठदहा टेबलें. अशा साताठ रांगा. प्रशस्त प्रवेशद्वाराला लागून रोखपाल. त्याच्याहि टेबलाला फिका बदामी सनमायका. त्यानंतर टेबलांच्या रांगा. नंतर डाव्या बाजूला तसेंच उजव्या बाजूला हात धुवायची सोय. बेसिन्सहि बर्‍यापैकीं स्वच्छ. त्यानंतर शेवटीं पूर्ण रुंदी भरून खाद्यपदार्थांचा काउंटर. त्यापलीकडे भटारखाना. लोकांच्या बोलण्याचा भरपूर गलका. सगळें यट्टखट्ट. ओ का ठो कळत नव्हतें. अधूनमधून हिंदी इंग्रजीहि. प्रवासी येतात ना.



प्रत्येक प्रदेशांत कांहीं शब्द विशिष्ट अर्थानें वापरले जातात. रोस्ट म्हणजे साधा डोसा हें कळलें. किंमत रु. ६/-. मसाला डोसा दहा, पोंगल आठ, इडली, मेदुवडा सांबार आठ रुपये. दोन प्रकारच्या चटण्या, सांबार भरपूर. चहा चार आणि फिल्टर कॉफी आठ रुपये. उर्दूवाचनाची चंगळच. चौघांनीं प्रथम चार पदार्थ एकेक प्लेट मागवून चवी पाहिल्या. कुरकुरीत हलका रोस्ट आम्हांला सर्वांना फारच आवडला. उपमा, मेदुवडा, इडल्या, पोंगल सगळेंच रुचकर. फार तिखट नाहीं वा सपकहि नाहीं. अगदीं आम्हां मुंबईकरांना आवडतील तस्से. चहा मात्र उडप्याच्या दर्जाचा नव्हता. पण तसा बर्‍यापैकीं. मास्तरला फिल्टर कॉफी आवडते. छानच होती म्हणे. हा मास्तर आय आय टी चा टेक्स्टाईल अभियंता. एके काळीं बॉंबे डाईंग मिलमध्यें होता. तिथें कामगार बंधू त्याला मास्तर बोलायचे. म्हणून हा मास्तर आणि त्याची सौ. मास्तरीण. पूर्वीं एकदां आम्हीं सिनेमाच्या तिकीटाच्या रांगेत उभें होतों. मागें कोणीतरी कोणाला तरी ‘मास्टर टाईम क्या हुआ?’ म्हणून विचारलें. यानें उगीचच मागें वळून अनाहूतपणें किती वाजले तें सांगितलें. तेव्हां मात्र मास्तर हें नांव पक्कें झालें. नंतर मात्र त्यानें नोकरी सोडून बंगलोरला आय आय एम मध्यें प्रवेश घेतला. तेव्हां बाबांना पत्र लिहिलें कीं त्याला ते पैसे पाठवत. म्हणून तो पत्रलेखन करून पैसे मिळवतो असें आम्हीं त्याला चिडवत असूं. असो. देवगांवकर ऊर्फ देवा माझ्याबरोबर बहुधा चहा प्याला. हा मास्तरीणबाईंचा बंधू, म्हणून आमच्या ओळखीचा. हा दहाबारा वर्षांपूर्वीं आमच्या कंपूंत दाखल झाला. जाड्या सकाळीं एकदांच चारपांच कप चहाच पितो. चहा पिणारा उंट लेकाचा. पोंगल, इडली वडा सांबार आणि रोस्ट. बेट्याची चंगळच झाली होती.



तृप्त होऊन परत आलों, शुचिर्भूत होऊन अर्ध्या तासांत निघालों. साडेआठ नऊचा सुमार असावा. सामान गाडींत टाकलें. तळमजल्याचा फायदा झाला. मीं आणि देवा बाहेरून मागें गाडीपाशीं गेलों. दहा फुटांवर आमची बाल्कनी होती. सामान एकेक बॅग करून जाड्यानें मला बाल्कनीबाहेर दिलें आणि मीं सरळ तिथून झाडांखालून गाडींत नेलें. देवानें तें व्यवस्थित गाडींत रचून ठेवलें. धुवायचे कपडे त्या तत्पर महिलेला समोर दिसतील असे काढून ठेवले.



आतां दोनदोन चक्रधारी असल्यामुळें माझी किलींडरपदावरून पदावनति होऊन मीं मागच्या आसनावर गेलों. प्रथम पेट्रोल पंपावर. पंपावर महिलाच. सगळ्या जणींचा रंग आणि चण एकजात समान. चारसाडेचार फूट उंची आणि अस्सल दाक्षिणात्य. साडी वा पंजाबी पोषाखावर राखाडी कोट. पेट्रोलहि त्याच भरणार, बिलहि त्याच देणार, हवाहि त्याच भरणार. पण अतिशय सौजन्यशील आणि तत्पर सेवा. हल्लीं तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळें पाणी फारसें भरावें लागत नाहीं. मला आठवतें पंचवीसएक वर्षांपूर्वीं आम्हीं असेच सहलीला जात होतों. मुंबई ते माळशेज. साल बहुधा १९९०-९१. एक पद्मिनी गाडी आणि एक येझ्दी मोटरसायकल असा आमचा चमू होता. सकाळीं प्रीमिअर पद्मिनीच्या रेडिएटरचें बूच पाणी भरल्यावर चुकून सैल लागलें होतें. तें वाटेंत कुठेंतरी धक्क्यानें पडलें, सगळें पाणी सांडून आणि वाफ होऊन गेलें इंजिन तापलें आणि उल्हासनगरच्या आसपास फियाट गाडी बंद पडली होती. मग इंजिनावर पाणी ओत ओत ओतून थंड केलें, रेटिएटरला नवें बूच बसवलें तेव्हां अर्ध्याएक तासानें गाडी सुरु झाली होती. सुदैव किती थोर पाहा कीं तें उल्हासनगरलाच घडलें. पुढें गेलेल्या येझ्दीच्या चाकाला माळशेज तीनेक कि.मी.वर असतांना भोक पडलें. येझ्दी तिथेंच उभी करून दोघे पायीं निघाले. सुदैवानें त्यांना लिफ्ट मिळाली. तर तें चाक दुरुस्त करायला पद्मिनीवर घालून दुसरे दिवशीं सरळगांवपर्यंत ४२ किमी दूर न्यावें लागलें होतें. सरळगांव ते माळशेज मध्यें कांहींहीं नव्हतें. आणि आतां पाहा. कित्येक दिवस पाण्याची पातळी जशीच्या तशी असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा विजय असो.



असो. पेट्रोल पंपावरून निघालों तेव्हां ऊन्हाचा कडाका जाणवायला लागला होता. पण मुंबईच्या मानानें हवा कोरडी असल्यानें घाम मात्र येत नव्हता. आतां पालघाटमार्गें, त्रिचूरला बायपासनें बगल देऊन ईडपल्ली गांठायचें होतें. मुंबईवरून आलेला राममा १७ ईडपल्लीपाशीं राममा ४७ला मिळतो. सालेमवरून आलेला रा.म.मा. ४७ कोंबतूरपासून जवळूनच जात ईडपल्लीला जातो. तिथें तो दक्षिणेकडे वळतो तो थेट कन्याकुमारीपर्यंत जातो. ईडपल्लीवरून राममा ४७ नें अलेप्पी गांठायचें होतें. संध्याकाळपर्यंत कोचीनला पोहोंचूं. वेळ असेल तसें कोचीनच्या अगोदर किंवा पुढें शहरापासून किंचित दूर एखाद्या हॉटेलांत मुक्काम ठोकायचा असा विचार होता.



कोईंबतूरला कोवई - KOWAI असेंहि म्हणतात बरें का. शहर मागें पडलें तसा झाडोरा वाढूं लागला आणि आम्हीं उत्तेजित झालों. स्वगृहीं आल्यासारखें वाटलें. फारसा प्रशस्त नसला, गुळगुळीत नसला, तरी मस्त चौपदरी रस्ता. डोक्यावर सतत झाडांची मेघडंबरी. अधूनमधून मराठी/हिंदी गाण्यांचे पार्श्वसंगीत आणि भरपूर गप्पागोष्टी. रस्त्यावर दिसणार्‍या गंमतीजमती, मागील सहलींच्या आठवणी, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या यांत जोरदार करमणूक चालू होती. पालघाटगोदरच्या नाक्यापर्यंत आलेल्या रस्त्यानें परत पश्चिमेला चाललों होतों. येतांना देवा नव्हता. येतांनाच्या गंमतीजमती त्याला थोडें तिखटमीठ लावून सांगितल्या. थोडा पार्श्वाग्नि व्हावा म्हणून. खासकरून दुपारच्या धसमुसळ्या जेवणाची. तिथेंच कांहीं खाऊंया कां म्हणून विचारलें तर नको म्हणाला.



आम्हीं आलों तो कालिकत ऊर्फ कोझीकोडे ऊर्फ कोषीकोडे कडून येणार्‍या रस्त्याचा फाटा उजवीकडे ठेवून आम्हीं डावें वळण घेतलें. आतां कोचीनची पाटी दिसायला लागली. राममा ४७ तसा बरा राखला होता. त्या भागांतलें पावसाचें प्रमाण लक्षांत घेतलें तर नक्कीच. त्यामुळें वेगानें मार्गक्रमणा झाली. कोचीन ३०-४० किमीवर असतांना हॉटेल कमल अमुक अमुक किमी अशा पाट्या दिसायला लागल्या. वाटेंत दोनतीन हॉटेलें पाहिलीं. हॉटेल पसंत करायचें काम मी व जाड्या दोघांनीं मिळून करायचें. कमींत कमी दहा हॉटेलें नापसंत. कधीं महाग, कधीं पार्किंग नाहीं तर कधीं हॉटेलचें रूपच न आवडलेलें. दोनतीन ठिकाणी मला पसंत आलें पण जाड्यानें मला न जाणवलेल्या कांहीं गोष्टी दाखवल्या. उदा. एका हॉटेलच्या मागें पांचदहा किमी. कांहींहि नव्हतें. लुटले गेलों तर? इ.इ. आतां फक्त हॉटेल कमलचाच आधार. सूर्याजीराव पण बुडी मारायच्या तयारींत. हॉटेल कमल फाईव्ह स्टार किं थ्री स्टार कीं आणखी कसें, जाहिरातीच्या पाटीवरून कांऽऽहीं कळत नव्हतें. बरें असूंदेत, फार महाग नसूंदेत आणि पार्किंग चांगलें असूं देत अशी आशा व्यक्त केली. आखूडशीम्गी बहुदुधी. जेवण नसलें तर पाव खायची तयारी ठेवली. दूध मिळालें तर दुधांत नाहींतर रममध्यें बुडवून. एकदां मीं महाबळेश्वरला पायीं भटकतांना रस्ता चुकल्यावर भुकेपोटीं रम आणि पाण्याच्या मिश्रणांत पाव बुडवून खाल्लेला आहे. फार कांहीं वाईट लागत नाहीं.



क्रमशः

- X - X - X -

पूर्वप्रकाशन: http://www.manogat.com/node/18366



आठवणीतल्या सहली २ : कोईंब - टूर

२७-०९-२००३.

सकाळी सातला माहीमहून निघायचें होतें. पावणेसातलाच सगळे जमले. निघालों. किलींडरच्या भूमिकेंत मी. प्रवास नेहमींप्रमणें उत्साहानें भारलेला, घाटांत निसर्ग डोळ्यांत साठवत मूक होत तर सरळ रस्त्याला लागल्यावर भंकसबाजीला मस्त ऊत आलेला. पहिला मुक्काम कणकवली. नार्‍यानें शिफारस केलेलें हॉटेल होतें तें. हॉटेलांत एका बाबांची जमिनीपासून छतापर्यंत सुमारें आठेक फूट उंच तसबीर होती. कुणाच्या भावना दुखावतील म्हणून आतां त्यांचें नांव देत नाहीं. जमिनीवर अर्धवट मांडी घालून बसलेल्या अवस्थेंतली. म्हणजे लार्जर दॅन लाईफ म्हणतो त्या आकाराची. मानवाचें एवढें ओंगळवाणें दर्शन मीं अजून पाहिलें नाहीं. कुरूप चेहरा. त्यावर भस्माचे पट्टे, हातापायांच्य काड्या, त्यावरहि भस्माचे पट्टे, मोठी ढेरी म्हणजे शालेय पुस्तकांत मुडदूस रोगाची दाखवतात तशी अंगकाठी. मुडदूस जमिनीवर बसलेला. आणि पूर्णपणें विवस्त्र. अगदीं हिडीस आणि किळसवाणें दर्शन. त्यांना निदान नीटनेटके कपडे घालायला काय हरकत होती? लोक कशांत देवत्व शोधतील त्याचा नेम नाहीं. मला बाबा आमटेंबद्दल आदर वाटला. त्यांनीं महारोग्यांतल्या अशाच एका हिडीस किळसवाण्या माणसाची सेवा केली. बाबा आमट्यांच्यात नक्कीच देवत्त्व आहे. असो, विषयांतर झालें.



खोली यथातथाच. सेवा सुमार दर्जाची. मालवणी मसाल्याचें थंड जेवण. मसाले घातलेलें जेवण थंड असेल तर फार वाईट लागते. रस्सा आहे कां चिखल आहे कळत नव्हतें. ना‍र्‍याला त्वरित दूरध्वनि करून मंत्रपुष्पंजली वाहिली. दुसरे दिवशीं सकाळीं सातच्या आधींच निघायचें ठरवलें. तेव्हां बिल मिळण्याची शक्यता दुरापास्त दिसत होती. जाणार म्हणून रात्रींच बिलाचे पैसे देऊन मोकळे झालों.



२८-०९-२००९.

सक्काळीं पावणेसातलाच शुचिर्भूत होऊन निघालों. गाडींत पेट्रोल हवापाणी ठीक केलें आणि मार्गीं लागलों. सावंतवाडीच्या किंचित पुढें गेल्यावर महामार्गाला लागूनच एक सुरेख उद्यान क्षुधा शांति केंद्र - गार्डन रेस्टॉरंट आहे. मस्त राखलेली बाग, त्यांत सुरेख आणि स्वच्छ टेबलें, समोरच खाद्यपदार्थांच्या भल्यामोठ्या अप्रतिम सुंदर तस्बिरी लावलेल्या. त्या पाहून जीभ चाळवली नाहीं तरच नवल. एका मध्यमवयीन पुरुषाची मोठ्ठी तस्बीर मध्यभागीं. तस्बिरीला चंदनाचा हार आणि नुकत्याच लावलेल्या नागचंपा अगरबत्तीचा जादुई गंध दरवळत असलेला. ते या क्षुधा शांति केंद्राचे संस्थापक होते. गल्ल्यावरचा माणूस तिशीच्या आंतबाहेरचा. त्याला विचारलें, तुमचे तीर्थरूप का? होय म्हणाला. एवढी मस्त सौंदर्यदृष्टी त्यांची का तुमची? बाग इतकी सुंदर राखलेली, झाडें मस्त कापलेलीं, ही सुबक चित्रें, स्वप्नांतलें दृश्य प्रत्यक्षांत दिसतें आहे. बाबांचेंच सगळें. उत्तर देतांना त्याचा कंठ दाटून आला आणि सोनेरी काड्यांच्या चष्म्याआडच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. नुकतेच महिन्यापूर्वीं गेले म्हणाला. सेवाहि उत्कृष्ट. मराठी माणसानें उडप्याच्या कानाखालींच वाजवलेली. बरें वाटलें. टेबलावर पदार्थ आला तोहि दृष्टिसुख देणारा. मग छायाचित्र काढायचा मोह कोण टाळूं शकेल? छायाचित्रांत पाहा खाद्यपदार्थांच्या भल्यामोठ्या तस्बिरीखालीं खाणार्‍यांच्या तोंडावर समाधान कसें ओसंडून जात आहे तें.


दाक्षिणात्य पदार्थहि ताजे, गरम आणि अप्रतिम स्वादिष्टच होते. बटाटेपोहे, मसाला डोसा, इडली, मेदू वडा, सारेंच अप्रतिम. तेंहि सकाळीं साडेसातच्या आसपास. ती चव आणि तें दृष्टिसुख मनांत रेंगाळत असतांनाच गाडीनें पुन्हां गति घेतली.



वाटेंत सारथ्याला विश्रांति द्यायला कुमठ्याला थांबलों. चहा घेतला आणि गाडीकडे जायला लागलों. पण हाय रे दुर्दैवा. गाडीकडून हॉटेलकडे येतांना मीं पायाखालीं पाहात आलों होतों. रस्ता साफ होता. पण नंतर आम्हीं चहा घेत असतांना केव्हांतरी तिथून जातांना एखाद्या गाईनें किंवा म्हशीनें शेणाचा पो टाकला होता. आणि आतां गाडीकडे जातां जातां तो शेणाचा पो माझ्या वाटेंत आदवा आला. सुदैवानें फक्त चपलेच्या तळालाच जरासा निसरडा स्पर्श झाला होता. गाडींत सकाळीं वाचलेलें वर्तमानपत्र होतेंच. त्वरित चप्पल साफ केली, मातींत चपलेचा तळ घोळवला, गाडींत पायाखालीं वर्तमानपत्र टाकलें आणि हॉटेलांत जाऊन हात स्वच्छ धुतले. माझें हें पवित्र कार्य चालू असतांना माझ्या सवंगड्यांची सवंग शेरेबाजी, टिक्काटिप्पणी चालू होती. सवंगडी हा शब्द अस्सा तयार झाला तर! हॉटेलातले सगळे सेवक, इतर ग्राहक, इ.चा मोठा प्रेक्षकगण हॉटेलच्या दरवाजांत माझी गम्मत बघायला माझ्या वात्रट सोबत्यांनीं उभा केला. चप्पल त्वरित साफ झाल्याबद्दल त्वरित दुःखहि व्यक्त केलें. पण हें कार्य चालूं असतांना माझी छबी कॅमेर्‍यात बद्ध करायला मात्र विसरले नाहींत. पाहा तरी.



दुसरा मुक्काम बैकमपाडी. मंगलोरपूर्वीं पांचएक कि.मी. लागतें. इथें हायवेला लागून मुंबईकडून मंगलोरला जातांना उजवीकडे हॉटेल बालाजी आहे. त्यातली कोपर्‍यावरची खोली मस्त आहे. भरपूर उजेडवारा असलेली प्रशस्त खोली. रस्त्याकडचा एक कोपरा गोलाकार. गोलाकार कोपर्‍याला तसेंच त्या गोल कोपर्‍याच्या लगतच्या दोन्हीं बाजूंना मिळून दहाएक खिडक्या. वारा आला कीं पडदा क्षितिजसमांतर होई. भपकेदार नसल्यामुळें उर्दूवाचन किफायतशीर, स्वच्छता बरी, चोवीस तास गरम पाणी, खालींच उडपी शाकाहारी रेस्टॉरंट, सकाळीं सहाला उघडणारें. तीन वर्षांपूर्वीं आम्ही अशाच दक्षिण सफरीहून येतांना याच हॉटेलांत उतरलों होतों. समोर हायवेपलीकडे एक मांसाहारी रेस्टॉरंट, तिथें गेल्या वेलप्रमाणेंच मासे ताजे आणि रुचकर होते असें आमच्यातल्या मत्स्यप्रेमींचें मत पडलें.



२९-०९-२००३

बैकमपाडीच्या हॉटेल बालाजीखालच्या तळमजल्याच्या त्या उडिपी रेटॉरंटमध्यें मस्त न्याहारी केली आणि मंगलोरजवळ हवा, पाणी पेट्रोल वगैरे करून प्रसन्न चित्तानें निघालों. कासारगोडच्या जरा आधीं आपण रा.म.मा. १७ नें कर्नाटकातून केरळांत प्रवेश करतों. केरळांत प्रवेश केल्यावर कांहीं अंतरावर रस्ता अचानक चौपट रुंद, प्रशस्त आणि गुळगुळीत झालेला. उजवीकडे खड्डेयुक्त चिंचोळी गल्ली. मास्तरांनीं खूष होऊन वा! म्हणून उद्गार काढून ऍक्सीलरेटरवरचा पायाचा दाब वाढवला. पण रस्त्याच्या सुरवातीला असलेली SH 57 अशी पाटी माझ्या नजरेतून सुटली नव्हती. थांब! थांब!! थांब!!! म्हणून ओरडलों. सुधीर किलिंडर झिंदाबाद!

मास्तर थांबला.

अरे वा काय वा? हा SH 57 (57 नसेल तर अन्य क्रमांक पण बहुधा 57च) आहे. NH 17 म्हणजे उजवीकडची गल्ली.

काहींतरीच  काय?

अरे पाटी बघितली SH 57. हा वेगळा रस्ता - स्टेट हायवे ५७ आहे.

उतरून विचार आतां कोणाला तरी आणि खात्री करून घे.

रस्त्यांत एकहि पादचारी नाहीं. समोरच्या कडेला थोडे पुढें कांहीं मजूर खडी फोडत होते. त्यांना जाऊन विचारलें. NH 17?

त्याच्या डोक्यांत प्रकाश पडेना. चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह. मग विचारलें एर्नाकुलम? आतां त्यानें त्या मागील उजव्या वळणाकडे बोट दाखवलें. उजवें वळण नक्की झालें. पुन्हां मागें वळून त्या चिंचोळ्या गल्लींत शिरलों. केरळ सरकारनें राज्य महामार्ग छान राखला होता. पण राष्ट्रीय महामार्गाकडे मात्र केंद्र सरकारनें (लक्षपूर्वक?) दुर्लक्ष केलें होतें. रस्त्याच्या दुतर्फा बसच्या थांब्यावरच्या प्रवाशांत बुरखाधारी महिलांचें आधिक्य होतें. पुरुष मात्र मुंडूधारी. कांहीं पुरुष रंगीत लुंगी लावलेले तर कांहीं पाश्चात्य वेषभूषेंत. बहुतेक पुरुषांनीं दाढी राखलेली तर मिशीला चाट दिलेली. इथें मुस्लिम लोकांचें आधिक्य दिसत होतें. असें दृश्य पार तेल्लीचेरीपर्यंत. खड्ड्यांचा आणि वळणांचा दोनतीन कि.मी.चा पल्ला पार केल्ल्यावर मात्र रस्ता बर्‍यापैकीं रुंद आणि ठीक होता. जरा बरें वाटलें.



पांचदहा कि.मी. जरा बरे जातात न जातात तोंच एके ठिकाणीं खूप गर्दी उसळली होती. बॅरिकेड लवून नाकाबंदी केली होती. वीस पंचवीस खाकी वर्दीतले पोलीस. डोक्यावर खाकी हॅट्स. कांहींच्या डोक्यावर गोल टोप्या. हे बहुधा अधिकारी होते. एकानें आम्हांला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्या पोलिसानें अधिकार्‍याला कांहींतरी गुडुगुडू करून सांगितलें. एक अधिकारी जवळ आला. अतिशय नम्र स्वरांत दाक्षिणात्य इंग्रजीतून चौकशी केली. नम्र स्वर ऐकून आश्चर्यच वाटले. इतरांशीं उर्मटपणें चढ्या स्वरांत मल्याळममध्यें सुसंवाद चालू होता. ड्रायव्हिंग लायसेन्स पाहूं, दाखवले. गाडीचे कागदपत्र पाहूं, तेहि दाखवले. सगळें ठीक होते. कोणकोण आहांत, कोठून आलांत, कुठें चाललांत, इथूनच कां जाताहांत, वगैरे वगैरे. लायसेन्स परत दिलें पण गाडीचे कागदपत्र देईना. बोलतां बोलतां तो जरा पुढें जाऊन उभा राहिला. त्याच्या मागोमाग शेवडे मास्तर. आतां माझ्यांतला प्रशासकीय अधिकारी जागा झाला. मीं उतरून त्यांच्याजवळ गेलों. तो अधिकारी कारण सांगायलाच तयार होईना. तुम्हीं मुंबईचीं माणसें तुम्हांला कायदा बरोबर कळत असणार, तुम्हींच काय तें समजा समजा हें त्याचें पालुपद कायम. शेवडे नम्रपणें छान व्यावसायिक शब्दांत बाजू मांडत होता. त्यामुळें मीं फक्त बघ्याची भूमिका घेतली. दोघे मिळून त्याला कोंडीत पकडतोंय असें उगाच त्याला वाटायला नको. पांचपंधरा मिनिटें त्यानें आम्हांला चांगलेंच घुमवलें. आम्हींहि संयम सोडला नाहीं. व नम्रपणें बोलत राहिलों. शेवटीं त्यानें कारण सांगितलें. आमच्या नंबर प्लेटवर तळाला मध्यभागीं SPECTRA अशीं बारीक लाल अक्षरें होतीं. माझ्या वरच्या चप्पल साफ करतांनाच्या छायाचित्रांत पाहा. नंबर प्लेटवर कांहींहि लिहिलेलें चालत नाहीं. तुम्हांला ठाऊक नाहीं कां? ही त्या गाडी विकणार्‍या स्पेक्ट्रा मोटर्सनीं आपली जाहिरात केली होती. तशीं अक्षरें दुरून धड दिसतहि नव्हती. पण या पोलिसांनीं नियमावर बरोबर बोट ठेवलें होतें. एवढ्या वीसपंचवीस जणांत त्याला लाच देऊन सुटणें शक्य नव्हतें. मग गाडीचे कागद पाहा. सहा महिनेहि झाले नाहींत गाडी घेऊन. आतां प्रथम ही नंबर प्लेट ठीक करायचें काम करूं, कृपया सोडा. आम्हीं नोकरीधंदा करणारीं कुटुंबवत्सल माणसें आहोंत. चूक त्या गाडी विकणार्‍यानें केलेली आहे. तुम्हांला पकडायला गुन्हेगार आहेतच. वगैरे वगैरे. त्या अधिकार्‍यानें पोलिसाला बोलावून कांहींतरी गुडुगुडू केलें. मग त्या पोलिसानें नंबर खरा आणि पक्का आहे कीं नाहीं, टेप लावून खोटा नंबर लिहिला आहे कीं नाहीं याची खात्री केली. आणि रंगाचा एक पातळ पापुद्रा उचकटलाच. त्या पोलिसाच्या मतें ती टेप होती. अधिकार्‍यानें आम्हांला तसें सांगितलें. आम्हीं म्हटलें कोणत्याहि रंगाचे असे पापुद्रे निघतील. अगदीं तुमच्या पोलिसांच्या गाडीच्या नंबर प्लेटचेहि निघतील. आम्हीं काढून दाखवूं कां? तेव्हां तो अधिकारी हसला आणि त्यानें कागद परत देऊन गाडी सोडली. हुश्श ऽऽऽ! जवळजवळ अर्धा तास डोकेफोड झाली होती.



लागून लागून असलेल्या तेल्लीचेरी आणि माहे इथल्या भेंडीबाजार छापाच्या रहदारीतून कसेबसे निघालों. ही रहदारी आणि पुणेंनाशिकसारख्या शहरांतली रहदारी यांत एक मोठा फरक आहे. सिग्नल सुटला कीं मुंबईतलीं कोणत्याहि सिग्नलला थांबलेलीं सर्व वाहनें जवळजवळ सारख्या वेगानें सुटतात. तींहि सरळ रेषेंत. पुणेंनाशिकमध्यें मात्र प्रत्येक वाहन वेगळ्या वेगानें जातें. त्यामुळें पायीं रस्ता पार करताना गैरसोय होते. जास्त वेगाचीं वाहनें निघून दूर पोहोंचलीं तरी हळू जाणारीं वाहनें येतच राहातात आणि रस्ता पार करतां येत नाहीं. शिवाय पुणेंनाशिकला दुचाकी स्वारांची संख्या फारच असते. आणि हीं दुचाकीं वाहनें अशी तिरकी वा आडवीतिडवीं जातात कीं त्यांच्या दिशेचा कधींहि अंदाज येत नाहीं. रस्त्यानें पायीं जा वा मोटारीनें, कधीं समोरून भलत्या दिशेनें दुचाकी अंगावर येईल भरोसा नाहीं. पुणेंनाशिकची एकूण वाहतूक तशी सैरावैराच. आणखी एक गंमत आहे. मुंबईत जसे नाक्यावर, कट्ट्यावर दिसतात तसे तरूणतरूणींचे घोळके सहसा पुणेंनाशकांत दिसत नाहींत. इथें मैत्री हा प्रकारच नाहीं असें वाटतें. पण दुचाक्या रस्त्यावरून जातांना मात्र या मैत्रीला ऊत आलेला दिसतो. दोन तीन मोटारसायकली किंवा स्कूटर्स बाजूबाजूनें समांतर रेषांत संपूर्ण रस्ता अडवून संथ वेगानें जातात. मागून येऊन घाईंनें पुढें जायची सोय नसते. कितीही भोंगा वाजवा. कांहीं उपयोग नाहीं. सगळे रस्ते यांच्याच तीर्थरूपांचे.



असो. पालघाटला वा पलक्कड इथें कोक कोलाचा एक प्लांट तेव्हां चालूं होता. तिथले श्री. कृष्णकुमार नांवांचे एक गृहस्थ माझ्या दूरध्वनी आणि मेलवरून ओळखीचे होते. त्याना दूरध्वनी करून विचारलें होतें कीं या रस्त्यावर चांगलें हॉटेल कोठलें म्हणून. त्यांनीं हॉटेल अशोका म्हणून सांगितलें. दर सुमारें ४५० ते ७५०. पण पालघाटला पोहोंचण्याअगोदर संध्याकाळ झाली आणि रस्त्याला लागून असलेले चांगल्या पार्किंग सोयीचें हॉटेल शोधायला लागलों. त्यामुळें मुक्काम केरळांतल्या पेरींथलमन्ना या गावांत टाकला. तिथें हॉटेल केपीएम नांवाची शृंखला आहे. स्वच्छ आणि नीटनेटकें आहे. दर ४५० + तिसर्‍या माणसाला २५० = ६००. शृंखला हॉटेल असल्यामुळें ठरलेले दर. कमीजास्त नाहीं. तीन जणांची एक निराळीच खोली आम्हांला त्यानें दिली. कृष्णकुमारांनीं जेवणाचें, चहाचें जसें आम्हांला जमेल तसें निमंत्रण दिलें होतें. पण त्यांना नुसतें भेटायला जाणें पण झालें नाहीं.



३०-०९-२००३.

आज हॉटेल व ट्रान्सपोर्ट कर्मचार्‍यांचा संप आहे. केरळांत संपाना तोटा नाहीं. केरळी लोक केरळबाहेर भरपूर काम करतात. पण केरळमध्यें मात्र संप जास्त काम कमी. संपावर होते तरी आम्हांला चोरून खोलीवर न्याहारी दिली. गरमागरम अप्पम आणि चटणी. चहा कॉफी. चव पण उत्कृष्ट. खरें तर केरळमध्यें जेवणखाण थंड आणि बेचव असा आमचा अनुभव. पण हा सुखद धक्का होता. संप असल्यामुळें कर्मचार्‍यांचेंच अन्न आम्हाला दिलें होतें. संपामुळें त्याचे पैसे घेतले पण बिल दिलें नाहीं. पण आठपूर्वीं आम्हीं न्याहारी करून उठायच्या आधीं बिल तयार. म्हणजे सेवाहि उत्कृष्ट. ट्रान्सपोर्ट कर्मचार्‍यांचाहि संप असल्यमुळें रहादारी नगण्य. हा संप आमच्या पथ्थ्यावर पडला. केरळ तमिळनाडूच्या सीमेपर्यंत रहदारी जवळजवळ नव्हतीच. रस्त्यावर तुरळक खाजगी कार्स. केरळचा प्रसन्न हिरवागार झाडोरा सतत सोबतीला होताच.



निसर्गरम्य मृदुमलाई अभयारण्यांत केरळमधून तमिळनाडूंत प्रवेश केल्याबरोबर रस्त्याला लागून डावीकडे एक अत्यंत साधें उडिपी हॉटेल आहे. सकाळची न्याहारी खाऊन पोटांतले कावळे पुन्हां ताजेतवाने होऊन कावकाव करीत होते. तिथें कांहींतरी हलकें खायचें ठरलें. गाडीतून उतरायच्या आंतच मेनू ठरला.

"वडासांबार" मी.

"मी उपमा किंवा ओनियन उत्तप्पा." शेवडे.

"जाड्या पोंगलशिवाय काय खाणार?" मी.

"ते माझं मी पाहीन. ठरवणारा तूं कोण ?"

हॉटेलांत शिरलों. बसल्याबरोबर एका वेटरनें गोल ताट पुढ्यांत ठेवलें. त्यांत दुसर्‍यानें केळीचें पान ठेवलें. आपण मराठी लोक केळीचे पान जेवतांना उभें ठेवतों. इथें आडवें. दोन छोट्या बाजू मस्त अर्धगोलाकार कापून दीर्घवर्तुळ किंवा लंबगोल केलेलीं पानें. तिसर्‍यानें परातीतून भात आणला आणि घमेल्यातून फावड्यानें सिमेंट रस्त्यावर टाकावें तसा परातीतून वेळणीनें ताटांत टाकला व वेळणीनेंच त्यांत खड्डा केला. चौथ्यानें त्यावर बालदीतलें सांबार ओगराळ्यानें त्या खड्ड्यांत भस्सकन ओतलें. सिमेंटमध्यें पाणी ओतायला नको? चौथ्यानें पंचपात्रातून दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, लोणचें वगैरे आणून चमच्यानें भसाभसा वाढलें. हे सगळें प्रचंड वेगानें आणि धसमुसळेपणानें कांहीं सेकंदांतच केलें. आमचा गाडींत ठरलेला मेनू आणि त्या दोघांचे वजन आटोक्यांत ठेवायचे प्लान पार उद्ध्वस्त. असें वाटलें कीं अल्लाउद्दीनच्या राक्षसानें क्षणार्धांत जेवण निर्माण केलें. वाढपी हीं जानवीं घातलेलीं तरुण ब्राम्हण मुलें होतीं. अल्लाउद्दीनचा राक्षस जानवें घालायचा कीं नाहीं, ठाऊक नाहीं. भाताच्या ढिगावर सांबाराच्या थारोळ्यावर चारपांच बेबी कॉर्नएवढीं छोटेखानी पण अख्खी शिराळीं. नीट पाहिल्यावर लक्षांत आलें कीं तीं शिराळीं नसून भलीमोठ्ठी भेंडी होतीं. दोनतीन बोटें जाड आणि साताठ इंच लांब. मला भेंडी फारशी आवडत नाहीं. सगळींच्या सगळीं उचलून बाजूच्या सर्वभक्षी मित्राच्या ताटांत टाकलीं. दोन मिनिटांनीं सगळे वाढपी पुन्हां फेरी टाकून गेले. सांबारवाल्याला वाटलें कीं मला भेंडी खूप आवडली आणि म्हणून ताबडतोब खाल्ली. म्हणून त्यानें आणखी चारपांच भेंडी न बोलतां न विचारतां भस्सकन ओतलीं. विचारायची बातच नाहीं. जय अल्लाउद्दीनचा राक्षस. आलिया भेंडीशीं असावें सादर. म्हणून खाल्लीं. पण भेंडी कोवळी आणि स्वादिष्ट होती. बुळबुळीतपणा अजिबात नाहीं. सांबारांत इवलाले स्वादिष्ट कोईमतुरी कांदे, छोट्या बोराएवढे पिटुकले लालबुंद स्वादिष्ट टमाटे, फुलकोबीच्या ढब्बाड्या फोडी, लाल भोपळ्याचे सालासकट ढेपशे, इ. होतेंच. त्यामुळें जेवण अंमळ जास्तच झालें. मी तर नेहमीच्या तिप्पट जेवलों. तरी ताटांत कोणी आणखी कांहीं वाढूं नये म्हणून आम्हीं सावध होतों. इतर खाणार्‍या लोकांचे हात सांबारभातानें बरबटलेले. खास दाक्षिणात्य पद्धतीनें भाताचे लाडू करून तोंडांत टाकत भराभर खात असलेले. प्रत्येकीं फक्त वीस रुपयांत पोटभर जेवण. २००३ सालीं. पण जेवण बरें आणि चविष्ट होतें. फार तिखटहि नाहीं आणि सपकहि नाहीं. आणि मुख्य म्हणजे इतकें हलकें होतें कीं आडमाप खाऊनहि अंगावर आलें नाहीं.



एकदीडच्या दरम्यान कोईंबतूरला पोहोंचलों. कुठेंतरी पाटी पाहिल्याचें आठवतें - बहुधा कोईंबतूर १४२. (मेंदूंत घोटाळा होऊं शकतो. चू. भू. द्या. घ्या. ) म्हणजे बहुधा दूरच्या उपनगरांत पोहोंचलों असणार. कोइंबतूरमधला रस्ता उद्योगप्रधान वस्तीतून जाणारा होता. रस्त्याच्या दोन्हीं बाजूंना छोटे वा मध्यम आकाराचे कारखाने. कारखान्यांच्या इमारती अनाकर्षक. इमारतींच्या भिंतीवर एनॅमलमध्यें रंगवलेल्या जाहिराती. जवळजवळ सर्व जाहिरातींत तमिळ नक्षी. अधूनमधून फिरंगी भाषेंत. वसईला मुंबई अहमदाबाद - पश्चिम महामार्गावर लागून उद्योग आहेत तसें दृश्य. फक्त मराठी हिंदी फिरंगीऐवजीं तमिळ नक्षी आणि फिरंगी. पण झाडें गायब. रस्त्यावर अधूनमधून खड्डे आणि घाणकचरा. कोईंबतूरचे प्रथमदर्शन फारसें चांगलें नव्हतें. देवाला दूरध्वनि केला. तो म्हणाला अविनाशी रोड पकडा आणि निलगिरी मॉलमध्यें या. तिथें भेटतो. वाटेंतल्या कांहीं खुणा सांगितल्या. अविनाशी रोड शोधत निघालों. कोइंबतूरचा पिन कोड हळूं हळूं कमी होत गेला. एके ठिकाणीं पुलावर आलों. पाहातों तर पुलापलीकडे दोन फाटे. टळटळीत दुपार. पुलावरून सुसाट वाहनें जात होतीं. बाजूनें जाणार्‍या वाहनांत विचारायचें नांवच नको. आजूबाजूला एकहि माणूस दिसेना. गाडी पुलावरच थांबवली. रस्ता बघण्यचें काम अर्थातच किलींडरचें. मीं बाहेर आलों. वातानुकूलित गाडीतून बाहेर आल्यावर चटके देणार्‍या उन्हाचा कडाका जाणवला. एक माणूस पुलाखालीं उभा होता. त्याला मीं वरूनच विचारलें, "अविनाशी रोड?"



त्यानें अंगुलिनिर्देश करून तत्परतेनें रस्ता दाखवला. त्याच्या सौजन्यानें बरें वाटलें. माझ्या पक्क्या वर्णामुळें मीं त्याला त्यांच्यातलाच वाटलों म्हणून ही आपुलकी बरें, इति इतर दोघे. चांगला प्रशस्त रस्ता. सतत वर काटकोनी कमानी, कमानीखालीं स्थळांच्या नावांच्या हिरव्या पाट्या व दिशादर्शक बाण. त्यांत अविनाशी हें नांव होतेंच. शिवाय देवानें रस्त्यावरच्या खाणाखुणा - लॅंडमार्क्स सांगितले होतेच त्यामुळें विशेष समस्या आली नाहीं. निलगिरी मॉल सहज सांपडलें.



निलगिरी मॉल चकाचक होतें. तिथल्या रेस्तरॉं मध्यें बसायचें होतें. लाऊंजवजा रेस्तरॉं वातानुकूलित होतेंच. जवळजवळ अडीच वाजले होते. सेल्फ सर्व्हिस होती. समोरच बेकरी विभाग होता. त्या मस्त वासानें जीभ चाळवली. मी उठलों. एक गरमागरम व्हेज पफ आणि एक चहा घेऊन आलों. जाड्या सकाळीं एकावेळीं चारपांच कप चहा प्याल्यानंतर तो दिवसभर पुन्हां चहा घेत नाहीं. इतर कोणी घेतलाच तर त्याला कारकुंडा म्हणतो. गेला उडत. विचारतो कोण? आम्हीं चहा घेतों तेव्हां तो कांहींतरी खातो. विद्वान लोक बुद्धीची कामें करीत असल्यामुळें बुद्धीला चालना द्यायला चहा घेतात. कामगार लोक अंगमेहनतीनें झालेली शरीराची झीज भरून काढायला वेड्यासारखें फालतू पदार्थ खातात. असें माझें साधें सरळ तर्कशास्त्र आहे. पफ कसा उच्च अभिरुचीचा पदार्थ आहे. त्यानें पफ खाऊं नये म्हणून बोललों. तरी त्यानें पफची चव घेतलीच. मग मास्तरांनींहि घेतली. उत्कृष्ट. किंमत रु. ५/- कागदाच्या बशींत टोमॅटो सॉस आणि कागदाच्या रुमालासह. रुमाल आणि कागदाची बशी मात्र खातां येत नाहीं. जाड्यानें थंडगार बदाम मिल्क घेतलें. रु. १२/- उर्दूनें गोड धक्का दिला. शेवडेमास्तर दक्षिणेंत फिल्टर कॉफी जास्त पसंत करतो. लोकांचें निरीक्षण करीत होतों. बरेच लोक मुंडू लावून असतात. सायकल, स्कूटर आणि मोटरसायकलवर देखील मुंडूधारी होते. मुंडूधारी लोकसुद्धां पेडलवर पाय ठेवून उभें राहून सायकलला गति देऊन शिताफीनें टांग टाकून सायकलवर बसूं शकतात. पण वात्रट मुंबईकरांच्या चेहर्‍यावर स्मित उमटूं न देतां मात्र नाहीं. मॉलमध्यें पांढरपेशे दिसत होते. बाहेरच्या मानानें Ignore warning मुंडू कमी. स्त्रिया साडीधारी. बहुतेक स्त्रियांच्या उजव्या नाकांत दगिने. बहुतेकांचा वर्ण माझ्यापेक्षां सरस. त्यामुळें माझी वर्णाची ऐट जिरली. एखाद्या ठार काळ्या माणसावर माझी नजर पडली कीं दोघेजण गालांतल्या गालांत हसत. वेळ सहज भुर्रकन उडून गेला. अर्ध्याएक तासाच्या प्रतीक्षेनंतर देवा आला.



क्रमशः

पूर्वप्रकाशन: http://www.manogat.com/node/18334