Wednesday 3 March 2010

आठवणीतल्या सहली १ : प्रास्ताविक.

रोजच्या कामधंद्याच्या धबडग्याला आपण कधींतरी कंटाळतों. नको ती नोकरी किंवा नको तें काम वा नको तो व्यवसाय वा धंदा असे विचार मनांत येतात. मग आपण चार मित्रमैत्रिणी जमा करतों आणि सहलीवर निघतो. रोजच्या दिनचर्येपासून - रूटीनपासून मुक्ती हाच उद्देश असतो. बरोबर नवीन रम्य ठिकाणहि पाहतां येतें. मनावर जमलेली कामाच्या यांत्रिकतेच्या गंजाचीं पुटें अलगद निघतात आणि मनाची पाटी घासूनपुसून एकदम लखलखीत होऊन जाते. घराला नवीन रंग काढला आणि घरांतल्या वस्तूंची रचना बदलली कीं जसें कांहींतरी चकचकीत, जास्त प्रसन्न वाटतें तसें त्या प्रवासाच्या, त्या रम्य ठिकाणाच्या मधुर आठवणी मनांत, शरीरांत नवीन वीज भरतात आणि मरगळलेली तीच दिनचर्या पुन्हां प्रसन्न, चमकदार बनवतात.


अशा या जीवनांतलें सौंदर्य नव्यानें दाखवणार्‍या मधुर आठवणींच्या सहली. सहलीचीं स्थळें बहुतेकांनीं पाहिलेलीं असतात. प्रत्येकाची दृष्टि वेगळी, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. एकाचा अनुभव दुसर्‍याला आवडेल असेंहि नाहीं. पण सहलींतला प्रवास मात्र उत्कंठेनें, उत्साहानें भरलेला असतो. जवळजवळ प्रत्येक कंपूत किमान एकतरी विनोदी नग असतोच. हेच नग सर्वांच्या मनांत ऊर्जा भरतात आणि मग प्रत्येकजण अनोख्या उत्साहानें भारून जाऊन सहलीचा आनंद शतगुणित होतो. कांहीं शेरेबाजी, घडलेले विनोद, कायम स्मरणांत राहातात. कधीं अचानक कोसळणार्‍या अडचणींमुळें साहसपूर्ण आणि थरारकहि होतो. यांतला आनंद वाचकांसमवेत द्विगुणित होईल असें वाटतें.


सहलीचे सदस्य एकाच घरांत राहणारे नसल्यास एकमेकांना ठाऊक नसलेले एकेकाचे स्वभावविशेष ठाऊक होतात. त्यातून विनोदहि निर्माण होतात. अशा सहवासाचे क्षण देखील आनंदाचा प्रसन्न शिडकावा करून जातात. असाच आमचा एक मित्र शिवाजी कोर्डे. १९७५ सालच्या १५ ऑगस्टच्या महाबळेश्वरच्या सहलींत हा पंचविशीतला तरूण केसांना लावायला खोबरेल तेल घेऊन आला. त्या थंडीत तें तेल गोठलें. अरुंद तोंडाच्या कांचेच्या छोट्या बाटलीतून तें गोठलेलें तेल त्याला काढतांच आलें नाहीं आणि दोन दिवस त्याचे केस अस्ताव्यस्त भुरभुरत होते. कुठेंहि केश तेलाची जाहिरात दिसली कीं आम्हांला भुरभुरणार्‍या केसांचा शिवाजी कोर्डॆ आठवतोच. मग त्या केश तेलाचें आम्हीं ‘शिवाजी कोर्डे केश तैल’ असें नामकरण करतों. आमच्यापैकीं एक नातेवाईक सदस्य फार जलद घाईघाईनें बोलतात. त्यांना त्यांच्या अपरोक्ष बोबडा म्हणतात. एकदां सहलीला ते असतांना आम्हीं फिरायला भाड्याची स्थानिक गाडी केली होती. नेमका चालकहि बोबडा होता. आणि या बोबड्या चालकाला फक्त कन्नड आणि कोंकणी येत होतें. मला कोंकणी नीट येत नाहीं. मग हा चालक आणि मीं एकमेकांशीं बोलतांना काय धमाल उडाली असेल आणि इतरांची किती करमणूक झाली असेल?


कुणाला संगीताचा छंद असतो तर कुणाला वाचनाचा. कुणी स्टॅंप, नाणीं जमवतात तर कुणी छंद म्हणून चक्क समाजसेवा करतात. मला संगीत, वाचनाबरोबर प्रवासाचाहि छंद आहे. अशा सहलींतले सहसहली कांहीं वर्षांनीं भेटले कीं त्या आठवणी नव्यानें जाग्या होतात आणि त्या जादुई क्षणांत मिळालेल्या आनंदाचा पुनरानुभव मिळतो. हल्लीं असे सहसहलीं कांहीं निमित्तानें अचानक भेटले आणि आठवणी जाग्या झाल्या. मग त्या तत्परतेनें टंकित केल्या. आणि त्यांची प्रसंगवार मांडणी केली. काळानुसर बरेच तपशील अस्पष्ट झालेत. पण एखाद्या दिवशीं काहींतरी आठवतें. मग बडवतों संगणकाचा कळफलक. कुठेंतरी तपशिलाचें घोडें अडतेंच. पण दूरध्वनीवरून इतरांना विचारून तपशील घेतों. कधीं अचानक धूसर तपशील लख्ख दिसायला लागतात. पुन्हां कळफलक. संगतवार मांडणी वगैरे. तर अशा आठवणींतल्या कांहीं सहलीच्या आठवणींतला आनंद मीं आपणा सर्वांबरोबर वाटून घेणार आहे. काल अचानक बाळ्या नाईक नांवाचा माझा एक मित्र बर्‍याच वर्षांनीं दूरध्वनीवर भेटला. तो आणि मीं मिळून १९७६ नंतर एकत्र सहलीला गेलेलों नाहीं. मागील सहलींच्या रम्य आठवणींची उजळणी झाली. माझ्या आठवणीतून निसटलेले कांहीं तपशील त्यानें सांगितले. त्याच्या स्मरणांतून हरवलेले तपशील मला आठवले. त्यामुळे त्याच्याबरोबरच्या बर्‍याच वर्षांपूर्वींच्या कर्नाळा सहलीली आठवण आली.


त्यांत मुख्यत्त्वानें प्रवासातल्या गंमतीच्याच असतील कारण बहुतेक स्थळीं फार मोठे बदल झालेले आहेत आणि स्थळांच्या तपशिलांत बरेच फरक जाणवतील. कांहीं ठिकाणीं आश्चर्याचे सुखद धक्के बसतात. उदा. मुर्डेश्वरला मीं पूर्वीं २००० सालीं गेलों होतों. त्यानंतर २००८ सालीं पुन्हां भेंट दिली तर हें ठिकाण कात टाकून बदललेलें आढळलें. तेंच ठिकाण आणि त्याच मूर्ती, तेंच दृश्य पण किती जास्त भव्य, चमकदार आणि आधुनिक झालें छायाचित्रांत पाहा.
जुनें
आणि नवें
जोडीला एक गोपुरहि आलें आहे. पाहातांना टोपी पडेल असें एखाद्या मनोर्‍याएवढें उंच. तिथल्या त्या भव्य शंकरमूर्तीइतकेंच उंच. त्यांत दोन सुंदर रंगीत हत्ती पण आले आहेत. प्रत्यक्षांतल्या आकाराचे.



पाहा


तसेंच कांहीं ठिकाणीं पदरीं निराशा येते. गोव्याच्या दोना पावलाला एक सुंदर फुलांची नयनरम्य बाग होती. बहुतेकांनीं पहिलेली असेलच. ती नष्ट करून तिथें आतां फरशी बसवल्यामुळें त्या परिसराला पाहा एखाद्या बंदराच्या धक्क्याची बकाल अवकळा आलेली आहे. तें पाहूनच माझें मन विषण्ण झालें होतें. पाहा

आतां हा लेख प्रसिद्ध करतांना एक प्रवासवर्णन शनिवार दि. ०७ ऑक्टो. २००९ च्या लोकसत्तेत वाचला. आपण अभयारण्यांत जातांना काय खबरदारी घ्यावी हें त्यांत वर्णन केलें आहे. अत्तरें वापरूं नये, साबणाचा वास येऊं नये म्हणून शक्यतों आंघोळ करूं नये आणि केल्यास साबण वापरूं नये, कचरा टाकूं नये, खाद्यपदार्थ जवळ बाळगूं नये, हळूं बोलावें, ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण टाळायला जीप वगैरे वाहन टाळून शक्यतों हत्तीवरून वनदर्शन घ्यावें हें ठाऊक होतें. एकदां मीं दांडेलीला वाटाड्याला एक मूर्ख प्रश्न विचारला. हत्तीऐवजीं उंट किंवा घोडा कां नाहीं वापरत म्हणून. तो म्हणाला कीं घोडा वा उंट हें जंगलांतल्या मांसाहारी प्राण्यांचें आवडतें भक्ष्य आहे. तळलेले खमंग रुचकर पदार्थ पाहिले वा त्यांचा वास जरी आला तर आपल्या जिभेला पाणी सुटतें तस्सेंच शिकारी प्राणांच्या तोंडाला घोडा वा उंट पाहून पाणी सुटतें व ते हल्ला करण्याची जास्त शक्यता असते. तसेंच घोडा उंट इ. शाकाहारी प्राणी शिकारी प्राण्यांना पाहून - वाघसिंह सोडाच, तरस लांडगे यांना देखील घाबरून जातात व ते उधळण्याची शक्यता असते म्हणून हत्तीखेरीज कोणतेंहि वाहन वर्ज्य. अगदीं गव्यासारख्या शाकाहारी प्राण्यांना देखील नवीन अपरिचित प्राणी आपल्या हद्दींत आलेला आवडत नाहीं. व ते लगेच घोड्यावर वा उंटावर हल्ला चढवण्याची दाट शक्यता असते. म्हणून फक्त हत्ती वा जीप हीं दोनच वाहनें वापरावींत. त्या माहितींत या लेखानें आणखी भर पडली. या लेखाचा जालावरचा पत्ता आहे
सहलीनंतर कालांतरानें स्मृतीतले बरेचसे तपशील धूसर, अस्पष्ट होतात. मग चुकीच्या तपशिलांचें वर्णन देणें अप्रामाणिकपणाचॆं होईल. त्यामुळें अशा कांहीं ठिकाणीं आपण स्थळमहात्म्य गाळूनच त्या सहलींचा आनंद घेऊंया. या सहलींचें आयोजन करतांना आपल्या भेटीगांठीं, बैठकी (मीटींग्ज) होतात. त्या बैठकींच्याहि आठवणी मनोरंजक असतात. त्यांचाहि आनंद घेऊं. वाचकांना आवडेल अशी आशा आहे.