३०-०९-२००३
आम्हांला पाहून देवा खूष. आम्हीं बाहेर गाडीकडे आलों. गाडी पाहून देवा हरखून गेला. एखादी जिवाभावाची मैत्रीण भेटल्यासारखा. शेतकरी बैलाच्या वा जॉकी घोड्याच्या अंगावर जसा प्रेमानें हात फिरवतो तसा गाडीवर हात फिरवला. चावी घेतली आणि व्हीलवर बसला. दहाएक मिनिटांत त्याच्या कॉलनींत आलों. मला एकदम इलेक्ट्रीक हाऊसजवळच्या पारसी कॉलनीची आठवण झाली. तश्शीच कॉलनी. एके ठिकाणीं गाडी उभी केली. दोघे इथेंच थांबा म्हणाला. मास्तर आणि जाड्या तिथेंच थांबले. तळमजला + ३ इमारत. इमारतीला लागून दहाएक फुटांच्या मातीच्या पट्ट्यांत झाडें. मातीच्या पट्ट्याभोंवती सिमेंटचा फूटदोनफूट उंच बांध. बहुधा मातीची धूप होऊं नये म्हणून. मग इमारतींच्या पुंजक्यांना वेढून रस्ता. रस्त्याकडेला दोन्हीं बाजूंना पार्किंग. झाडांना लागून असलेल्या आंतल्या बाजूनें तसेंच बाहेरच्या कुंपणाला भिंतीला लागून देखील. पार्किंगच्या जागांवर फ्लॅट क्रमांक लिहिलेले. पुन्हां झाडें आणि कुंपणाची भिंत. आम्हीं गाडी उभी केली ती इमारतीची मागची बाजू होती.
मी आणि देवा चालत वळसा घालून इमारतीच्या पुढच्या भागांत आलों. समोर बागेंत रक्तवर्णी चांफ्याचें झाड. हिरवींगार पानें आणि लालभडक फुलें. एवढें सुंदर चांफ्याचें झाड प्रथमच पाहात होतों. लहानपणीं आजोळीं पांढरा चांफा होता. पण त्याचे खोड मात्र कमालीचें कुरूप होतें. शिवाय त्याला जेव्हां फुलें येत तेव्हां पानें पूर्ण गळून गेलेलीं असत. त्यावर झोंके घ्यायला पण मनाई होती. हा लाल चांफा मात्र सर्वांगसुंदर होता. डौलदार हिरव्यागार गच्च पर्णसंभारांत उठून दिसणारी लालभडक फुलें. मन प्रसन्न झालें. नंतर जेव्हां जेव्हां इथें राहिलों तेव्हां जातायेतांना हा वार्यानें डौलांत सळसळणारा लाल चांफा माझें ये, मित्रा ये, म्हणून दिमाखांत लवून स्वागत करी. तिथला पारिजातक मात्र इथें नव्हता. इमारतींत शिरलों. क्षणदोनक्षण भान हरपून चांफ्याकडे बघतच बसलों. आंत गेलों. उजव्या हाताला सोसायटीचें कार्यालय. कार्यालयांत दोन दाक्षिणात्य महिला. जेमतेम पांच फूट उंच, अस्सल दाक्षिणात्य वर्ण. इंग्रजी बोलूं शकणार्या. साडी/ड्रेसवर पांढरा कोट घातलेल्या. त्यांच्याकडून चावी घेतली. तळमजल्याच्या एका फ्लॅटमध्यें गेलों. दरवाजा दिवाणखान्यांत उघडला. डाव्या हाताला भिंत. चारएक फुटांवर भिंतीशीं काटकोन करून एक दोन अडीच फूटाचें, इंचभर जाड, कांचेतच कोरलेल्या चित्रांच्या कांचेंचें देखणें वळणदार कडेचें चमचमणारें पार्टिशन. त्यापलीकडे सोफा. त्यासमोर एक साईड टेबल. दरवाजाच्या समोरच्या बाजूला सज्जा - बाल्कनी. मुंबईसारखा चिंचोळा सज्जा. पुण्यासारखा प्रशस्त सज्जा नाहीं. सज्जाला लागूनच गाडी उभी केली होती. सज्जातून सामान आंत घेतलें. आम्हांला स्थानापन्न करून देवा त्याच्या हपिसांत गेला आणि संध्याकाळीं येणार म्हणाला.
दिवाणखान्यांत मध्यभागीं एक मस्त झुंबर. पण छत कमी उंचीचें. हात वर केला कीं झुंबर सहज हाताला लागत होतें. वाटलें झुंबर हात लागून कधींतरी नक्कीच पडेल. उजव्या हाताला भिंतीला लागून आणि डायनिंग टेबल. नंतर साडेतीन चार फुटी पॅसेज. पॅसेजमधून गेलें कीं डाव्या हाताला एक बेडरूम. बेडरूम वातानुकूलित. ही बेडरूम रिकामी असल्याने मी आणि जाड्यानें बळकावली. दुसर्या बेडरूममध्यें देवा राहत होता त्याच्याबरोबर शेवडे. उजव्या हाताला एक बाथरूम. पुढे समोर वॉश बेसिन आणि त्याला लागून डाव्या हाताला दुसरी वातानुकूलित बेडरूम. त्या बेडरूममध्यें अटॅच्ड बाथरूम. इथें देवा राहात होता. शेवडे इथें घुसला.
बेडरूममध्यें भला मोठा वॉर्डरोब. वॉर्डरोब आम्हीं निम्मानिम्मा विभागून घेतला. बॅगा रिकाम्या केल्या. घरांत घालायचे कपडे वॉर्डरोबमध्यें नीट लावून ठेवले. संध्याकाळीं बाहेर जातांना घालायचे कपडे तिघांनींहि हॉलमध्यें साईड टेबलवर रचून ठेवले. आंघोळी आटोपल्या आणि मस्त ताणून दिली.
उठून व्यायाम करून (चहाशिवाय) ताजेतवाने झालों व कपडे घालून तयार होणार तों लक्षांत आलें कीं तिथें काम करणारी महिला येऊन कचरा वगैरे काढून साफसफाई करून गेली. आम्हीं संध्याकाळीं घालायला म्हणून साईडटेबलवर रचून ठेवलेले कपडे त्या कर्तव्यतत्पर महिलेनें धुवून वाळत टाकले होते. करमणूक झाली. दुसरे कपडे घालून निघालों. साडीवर राखाडी रंगाचा कोट घालणारी ही दाक्षिणात्य महिला काटकुळी, जेमतेम चार फूट उंच आणि मला लाजवणार्या कट्टर वर्णाची होती. गणवेष घातला तर आपल्याकडे शाळेंत सातवीआठवींत सहज प्रवेश मिळेल अशी बिट्टी.
वसाहतीच्या बाहेर आलों. पावसाचा शिडकावा झाल्यानें किंचित गारवा ल्यालेली उबदार हवा. असें वाटलें कीं मुंबईत इलेक्ट्रिक हाऊस, कुलाबा इथेंच आहोंत. हवा मात्र पुण्यासारखी कोरडी पण मुंबईसारखी गरम. फेरीवाले नव्हते. मस्त मोकळा रस्ता. फेरीवाले विरहित स्वच्छ पदपथ, पादचारी तुरळक, न थुंकणारे. मुंबईकरांनीं यांच्याकडून शिकायला पाहिजे. रस्त्यावर फारशी रहदारी नाहीं. दोनेक तास मस्त चालायला मिळालें. नंतर देवानें साताठ कि.मी. दूर बाजारांत एका चार मजली इमारतीच्या गच्चीत वसलेल्या ओरायन नांवाच्या रेस्तरॉं मध्यें जेवायला नेलें. उत्कृष्ट सामिष तसेंच निरामिष जेवण होतें. इथला कर्डराईस म्हणजे हिंगजिरेमोहरी, आलेंलसूण आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीची खमंग फोडणी दिलेला दहीभात तर वाखाणण्याजोगा. उद्यां अलेप्पीला जायचें नक्की केलें. बॅकवॉटर्स तीन वर्षांपूर्वीं पाहिलेलें होतेंच. पण कोट्टायमहून. आतां अलेप्पीहून जायचें ठरवलें. घरी आल्यावर बॅगा भरल्या.
०१-१०-२००३
नेहमींप्रमाणें सकाळीं निघालों. प्रथम न्याहारी. देवाकडे स्वैपाकाचा गॅस नव्हता. त्यामुळें घरांत कांहीहि शिजवत नव्हतो.
"एवढ्या सकाळीं एवढ्या छोट्या शहरांत कुठलें हॉटेल उघडे असायला? इकडे तिकडे शोधाशोध करण्यापेक्षां कोईंबतूर स्टेशनसमोर दोन उपाहारगृहें आहेत, दोन्हीं मस्त आहेत तिथें जाऊं." देवा.
गेलों त्यापैकीं एकात. मुंबईला सोडा, पुण्यालाहि मीं कधीं पाहिलें नाहीं एवढें प्रशस्त उपाहारगृह. स्टेशनसमोर असल्यामुळें माणसांनीं गजबजलेलें. सकाळीं साडेसहासातला जसें दादरसमोरचें दरबार हॉटेल गजबजलेलें असतें तसें. सांबार, डोसा चहाचा संमिश्र गंध दरवळत होता. जीभ चाळवली नसती तरच नवल. दहापंधरा बाकें भरूनहि निम्म्यापेक्षां जास्त जागा रिकाम्या होत्या. आपल्याकडे उडिपी हॉटेलात असते तश्शीच निरंतर स्वच्छता, तत्परता चालू. जमीनीच्या स्वच्छतेसाठीं खाकी कोटातली मुलें, खाल्लेलीं भांडीं न्यायला आणि टेबल साफ करायला राखाडी कोटातलीं मुलें, पाण्याचे ग्लास द्यायला पांढर्या कोटातली मुलें आणि ऑर्डर घ्यायला आणि खाद्यपदार्थ आणून द्यायला बदामी गणवेषांतले वेटर्स. वेटर्सच्या खिशावर हॉटेलचें नांव भरतकाम केलेलें गडद निळ्या रंगांत झळकत होतें. जमिनीवर कोटा लादी आणि उडपी डिझाईनचीं, फिक्या बदामी रंगाचीं सनमायका पृष्ठभागाचीं टेबलें व बांकें. एक टेबलाशीं तीन + तीन माणसें बसूं शकतील अशीं. एका रांगेंत एकामागें एक आठदहा टेबलें. अशा साताठ रांगा. प्रशस्त प्रवेशद्वाराला लागून रोखपाल. त्याच्याहि टेबलाला फिका बदामी सनमायका. त्यानंतर टेबलांच्या रांगा. नंतर डाव्या बाजूला तसेंच उजव्या बाजूला हात धुवायची सोय. बेसिन्सहि बर्यापैकीं स्वच्छ. त्यानंतर शेवटीं पूर्ण रुंदी भरून खाद्यपदार्थांचा काउंटर. त्यापलीकडे भटारखाना. लोकांच्या बोलण्याचा भरपूर गलका. सगळें यट्टखट्ट. ओ का ठो कळत नव्हतें. अधूनमधून हिंदी इंग्रजीहि. प्रवासी येतात ना.
प्रत्येक प्रदेशांत कांहीं शब्द विशिष्ट अर्थानें वापरले जातात. रोस्ट म्हणजे साधा डोसा हें कळलें. किंमत रु. ६/-. मसाला डोसा दहा, पोंगल आठ, इडली, मेदुवडा सांबार आठ रुपये. दोन प्रकारच्या चटण्या, सांबार भरपूर. चहा चार आणि फिल्टर कॉफी आठ रुपये. उर्दूवाचनाची चंगळच. चौघांनीं प्रथम चार पदार्थ एकेक प्लेट मागवून चवी पाहिल्या. कुरकुरीत हलका रोस्ट आम्हांला सर्वांना फारच आवडला. उपमा, मेदुवडा, इडल्या, पोंगल सगळेंच रुचकर. फार तिखट नाहीं वा सपकहि नाहीं. अगदीं आम्हां मुंबईकरांना आवडतील तस्से. चहा मात्र उडप्याच्या दर्जाचा नव्हता. पण तसा बर्यापैकीं. मास्तरला फिल्टर कॉफी आवडते. छानच होती म्हणे. हा मास्तर आय आय टी चा टेक्स्टाईल अभियंता. एके काळीं बॉंबे डाईंग मिलमध्यें होता. तिथें कामगार बंधू त्याला मास्तर बोलायचे. म्हणून हा मास्तर आणि त्याची सौ. मास्तरीण. पूर्वीं एकदां आम्हीं सिनेमाच्या तिकीटाच्या रांगेत उभें होतों. मागें कोणीतरी कोणाला तरी ‘मास्टर टाईम क्या हुआ?’ म्हणून विचारलें. यानें उगीचच मागें वळून अनाहूतपणें किती वाजले तें सांगितलें. तेव्हां मात्र मास्तर हें नांव पक्कें झालें. नंतर मात्र त्यानें नोकरी सोडून बंगलोरला आय आय एम मध्यें प्रवेश घेतला. तेव्हां बाबांना पत्र लिहिलें कीं त्याला ते पैसे पाठवत. म्हणून तो पत्रलेखन करून पैसे मिळवतो असें आम्हीं त्याला चिडवत असूं. असो. देवगांवकर ऊर्फ देवा माझ्याबरोबर बहुधा चहा प्याला. हा मास्तरीणबाईंचा बंधू, म्हणून आमच्या ओळखीचा. हा दहाबारा वर्षांपूर्वीं आमच्या कंपूंत दाखल झाला. जाड्या सकाळीं एकदांच चारपांच कप चहाच पितो. चहा पिणारा उंट लेकाचा. पोंगल, इडली वडा सांबार आणि रोस्ट. बेट्याची चंगळच झाली होती.
तृप्त होऊन परत आलों, शुचिर्भूत होऊन अर्ध्या तासांत निघालों. साडेआठ नऊचा सुमार असावा. सामान गाडींत टाकलें. तळमजल्याचा फायदा झाला. मीं आणि देवा बाहेरून मागें गाडीपाशीं गेलों. दहा फुटांवर आमची बाल्कनी होती. सामान एकेक बॅग करून जाड्यानें मला बाल्कनीबाहेर दिलें आणि मीं सरळ तिथून झाडांखालून गाडींत नेलें. देवानें तें व्यवस्थित गाडींत रचून ठेवलें. धुवायचे कपडे त्या तत्पर महिलेला समोर दिसतील असे काढून ठेवले.
आतां दोनदोन चक्रधारी असल्यामुळें माझी किलींडरपदावरून पदावनति होऊन मीं मागच्या आसनावर गेलों. प्रथम पेट्रोल पंपावर. पंपावर महिलाच. सगळ्या जणींचा रंग आणि चण एकजात समान. चारसाडेचार फूट उंची आणि अस्सल दाक्षिणात्य. साडी वा पंजाबी पोषाखावर राखाडी कोट. पेट्रोलहि त्याच भरणार, बिलहि त्याच देणार, हवाहि त्याच भरणार. पण अतिशय सौजन्यशील आणि तत्पर सेवा. हल्लीं तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळें पाणी फारसें भरावें लागत नाहीं. मला आठवतें पंचवीसएक वर्षांपूर्वीं आम्हीं असेच सहलीला जात होतों. मुंबई ते माळशेज. साल बहुधा १९९०-९१. एक पद्मिनी गाडी आणि एक येझ्दी मोटरसायकल असा आमचा चमू होता. सकाळीं प्रीमिअर पद्मिनीच्या रेडिएटरचें बूच पाणी भरल्यावर चुकून सैल लागलें होतें. तें वाटेंत कुठेंतरी धक्क्यानें पडलें, सगळें पाणी सांडून आणि वाफ होऊन गेलें इंजिन तापलें आणि उल्हासनगरच्या आसपास फियाट गाडी बंद पडली होती. मग इंजिनावर पाणी ओत ओत ओतून थंड केलें, रेटिएटरला नवें बूच बसवलें तेव्हां अर्ध्याएक तासानें गाडी सुरु झाली होती. सुदैव किती थोर पाहा कीं तें उल्हासनगरलाच घडलें. पुढें गेलेल्या येझ्दीच्या चाकाला माळशेज तीनेक कि.मी.वर असतांना भोक पडलें. येझ्दी तिथेंच उभी करून दोघे पायीं निघाले. सुदैवानें त्यांना लिफ्ट मिळाली. तर तें चाक दुरुस्त करायला पद्मिनीवर घालून दुसरे दिवशीं सरळगांवपर्यंत ४२ किमी दूर न्यावें लागलें होतें. सरळगांव ते माळशेज मध्यें कांहींहीं नव्हतें. आणि आतां पाहा. कित्येक दिवस पाण्याची पातळी जशीच्या तशी असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा विजय असो.
असो. पेट्रोल पंपावरून निघालों तेव्हां ऊन्हाचा कडाका जाणवायला लागला होता. पण मुंबईच्या मानानें हवा कोरडी असल्यानें घाम मात्र येत नव्हता. आतां पालघाटमार्गें, त्रिचूरला बायपासनें बगल देऊन ईडपल्ली गांठायचें होतें. मुंबईवरून आलेला राममा १७ ईडपल्लीपाशीं राममा ४७ला मिळतो. सालेमवरून आलेला रा.म.मा. ४७ कोंबतूरपासून जवळूनच जात ईडपल्लीला जातो. तिथें तो दक्षिणेकडे वळतो तो थेट कन्याकुमारीपर्यंत जातो. ईडपल्लीवरून राममा ४७ नें अलेप्पी गांठायचें होतें. संध्याकाळपर्यंत कोचीनला पोहोंचूं. वेळ असेल तसें कोचीनच्या अगोदर किंवा पुढें शहरापासून किंचित दूर एखाद्या हॉटेलांत मुक्काम ठोकायचा असा विचार होता.
कोईंबतूरला कोवई - KOWAI असेंहि म्हणतात बरें का. शहर मागें पडलें तसा झाडोरा वाढूं लागला आणि आम्हीं उत्तेजित झालों. स्वगृहीं आल्यासारखें वाटलें. फारसा प्रशस्त नसला, गुळगुळीत नसला, तरी मस्त चौपदरी रस्ता. डोक्यावर सतत झाडांची मेघडंबरी. अधूनमधून मराठी/हिंदी गाण्यांचे पार्श्वसंगीत आणि भरपूर गप्पागोष्टी. रस्त्यावर दिसणार्या गंमतीजमती, मागील सहलींच्या आठवणी, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या यांत जोरदार करमणूक चालू होती. पालघाटगोदरच्या नाक्यापर्यंत आलेल्या रस्त्यानें परत पश्चिमेला चाललों होतों. येतांना देवा नव्हता. येतांनाच्या गंमतीजमती त्याला थोडें तिखटमीठ लावून सांगितल्या. थोडा पार्श्वाग्नि व्हावा म्हणून. खासकरून दुपारच्या धसमुसळ्या जेवणाची. तिथेंच कांहीं खाऊंया कां म्हणून विचारलें तर नको म्हणाला.
आम्हीं आलों तो कालिकत ऊर्फ कोझीकोडे ऊर्फ कोषीकोडे कडून येणार्या रस्त्याचा फाटा उजवीकडे ठेवून आम्हीं डावें वळण घेतलें. आतां कोचीनची पाटी दिसायला लागली. राममा ४७ तसा बरा राखला होता. त्या भागांतलें पावसाचें प्रमाण लक्षांत घेतलें तर नक्कीच. त्यामुळें वेगानें मार्गक्रमणा झाली. कोचीन ३०-४० किमीवर असतांना हॉटेल कमल अमुक अमुक किमी अशा पाट्या दिसायला लागल्या. वाटेंत दोनतीन हॉटेलें पाहिलीं. हॉटेल पसंत करायचें काम मी व जाड्या दोघांनीं मिळून करायचें. कमींत कमी दहा हॉटेलें नापसंत. कधीं महाग, कधीं पार्किंग नाहीं तर कधीं हॉटेलचें रूपच न आवडलेलें. दोनतीन ठिकाणी मला पसंत आलें पण जाड्यानें मला न जाणवलेल्या कांहीं गोष्टी दाखवल्या. उदा. एका हॉटेलच्या मागें पांचदहा किमी. कांहींहि नव्हतें. लुटले गेलों तर? इ.इ. आतां फक्त हॉटेल कमलचाच आधार. सूर्याजीराव पण बुडी मारायच्या तयारींत. हॉटेल कमल फाईव्ह स्टार किं थ्री स्टार कीं आणखी कसें, जाहिरातीच्या पाटीवरून कांऽऽहीं कळत नव्हतें. बरें असूंदेत, फार महाग नसूंदेत आणि पार्किंग चांगलें असूं देत अशी आशा व्यक्त केली. आखूडशीम्गी बहुदुधी. जेवण नसलें तर पाव खायची तयारी ठेवली. दूध मिळालें तर दुधांत नाहींतर रममध्यें बुडवून. एकदां मीं महाबळेश्वरला पायीं भटकतांना रस्ता चुकल्यावर भुकेपोटीं रम आणि पाण्याच्या मिश्रणांत पाव बुडवून खाल्लेला आहे. फार कांहीं वाईट लागत नाहीं.
क्रमशः
- X - X - X -
पूर्वप्रकाशन: http://www.manogat.com/node/18366
No comments:
Post a Comment