Tuesday 13 April 2010

आठवणीतल्या सहली २ : कोईंब - टूर

२७-०९-२००३.

सकाळी सातला माहीमहून निघायचें होतें. पावणेसातलाच सगळे जमले. निघालों. किलींडरच्या भूमिकेंत मी. प्रवास नेहमींप्रमणें उत्साहानें भारलेला, घाटांत निसर्ग डोळ्यांत साठवत मूक होत तर सरळ रस्त्याला लागल्यावर भंकसबाजीला मस्त ऊत आलेला. पहिला मुक्काम कणकवली. नार्‍यानें शिफारस केलेलें हॉटेल होतें तें. हॉटेलांत एका बाबांची जमिनीपासून छतापर्यंत सुमारें आठेक फूट उंच तसबीर होती. कुणाच्या भावना दुखावतील म्हणून आतां त्यांचें नांव देत नाहीं. जमिनीवर अर्धवट मांडी घालून बसलेल्या अवस्थेंतली. म्हणजे लार्जर दॅन लाईफ म्हणतो त्या आकाराची. मानवाचें एवढें ओंगळवाणें दर्शन मीं अजून पाहिलें नाहीं. कुरूप चेहरा. त्यावर भस्माचे पट्टे, हातापायांच्य काड्या, त्यावरहि भस्माचे पट्टे, मोठी ढेरी म्हणजे शालेय पुस्तकांत मुडदूस रोगाची दाखवतात तशी अंगकाठी. मुडदूस जमिनीवर बसलेला. आणि पूर्णपणें विवस्त्र. अगदीं हिडीस आणि किळसवाणें दर्शन. त्यांना निदान नीटनेटके कपडे घालायला काय हरकत होती? लोक कशांत देवत्व शोधतील त्याचा नेम नाहीं. मला बाबा आमटेंबद्दल आदर वाटला. त्यांनीं महारोग्यांतल्या अशाच एका हिडीस किळसवाण्या माणसाची सेवा केली. बाबा आमट्यांच्यात नक्कीच देवत्त्व आहे. असो, विषयांतर झालें.



खोली यथातथाच. सेवा सुमार दर्जाची. मालवणी मसाल्याचें थंड जेवण. मसाले घातलेलें जेवण थंड असेल तर फार वाईट लागते. रस्सा आहे कां चिखल आहे कळत नव्हतें. ना‍र्‍याला त्वरित दूरध्वनि करून मंत्रपुष्पंजली वाहिली. दुसरे दिवशीं सकाळीं सातच्या आधींच निघायचें ठरवलें. तेव्हां बिल मिळण्याची शक्यता दुरापास्त दिसत होती. जाणार म्हणून रात्रींच बिलाचे पैसे देऊन मोकळे झालों.



२८-०९-२००९.

सक्काळीं पावणेसातलाच शुचिर्भूत होऊन निघालों. गाडींत पेट्रोल हवापाणी ठीक केलें आणि मार्गीं लागलों. सावंतवाडीच्या किंचित पुढें गेल्यावर महामार्गाला लागूनच एक सुरेख उद्यान क्षुधा शांति केंद्र - गार्डन रेस्टॉरंट आहे. मस्त राखलेली बाग, त्यांत सुरेख आणि स्वच्छ टेबलें, समोरच खाद्यपदार्थांच्या भल्यामोठ्या अप्रतिम सुंदर तस्बिरी लावलेल्या. त्या पाहून जीभ चाळवली नाहीं तरच नवल. एका मध्यमवयीन पुरुषाची मोठ्ठी तस्बीर मध्यभागीं. तस्बिरीला चंदनाचा हार आणि नुकत्याच लावलेल्या नागचंपा अगरबत्तीचा जादुई गंध दरवळत असलेला. ते या क्षुधा शांति केंद्राचे संस्थापक होते. गल्ल्यावरचा माणूस तिशीच्या आंतबाहेरचा. त्याला विचारलें, तुमचे तीर्थरूप का? होय म्हणाला. एवढी मस्त सौंदर्यदृष्टी त्यांची का तुमची? बाग इतकी सुंदर राखलेली, झाडें मस्त कापलेलीं, ही सुबक चित्रें, स्वप्नांतलें दृश्य प्रत्यक्षांत दिसतें आहे. बाबांचेंच सगळें. उत्तर देतांना त्याचा कंठ दाटून आला आणि सोनेरी काड्यांच्या चष्म्याआडच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. नुकतेच महिन्यापूर्वीं गेले म्हणाला. सेवाहि उत्कृष्ट. मराठी माणसानें उडप्याच्या कानाखालींच वाजवलेली. बरें वाटलें. टेबलावर पदार्थ आला तोहि दृष्टिसुख देणारा. मग छायाचित्र काढायचा मोह कोण टाळूं शकेल? छायाचित्रांत पाहा खाद्यपदार्थांच्या भल्यामोठ्या तस्बिरीखालीं खाणार्‍यांच्या तोंडावर समाधान कसें ओसंडून जात आहे तें.


दाक्षिणात्य पदार्थहि ताजे, गरम आणि अप्रतिम स्वादिष्टच होते. बटाटेपोहे, मसाला डोसा, इडली, मेदू वडा, सारेंच अप्रतिम. तेंहि सकाळीं साडेसातच्या आसपास. ती चव आणि तें दृष्टिसुख मनांत रेंगाळत असतांनाच गाडीनें पुन्हां गति घेतली.



वाटेंत सारथ्याला विश्रांति द्यायला कुमठ्याला थांबलों. चहा घेतला आणि गाडीकडे जायला लागलों. पण हाय रे दुर्दैवा. गाडीकडून हॉटेलकडे येतांना मीं पायाखालीं पाहात आलों होतों. रस्ता साफ होता. पण नंतर आम्हीं चहा घेत असतांना केव्हांतरी तिथून जातांना एखाद्या गाईनें किंवा म्हशीनें शेणाचा पो टाकला होता. आणि आतां गाडीकडे जातां जातां तो शेणाचा पो माझ्या वाटेंत आदवा आला. सुदैवानें फक्त चपलेच्या तळालाच जरासा निसरडा स्पर्श झाला होता. गाडींत सकाळीं वाचलेलें वर्तमानपत्र होतेंच. त्वरित चप्पल साफ केली, मातींत चपलेचा तळ घोळवला, गाडींत पायाखालीं वर्तमानपत्र टाकलें आणि हॉटेलांत जाऊन हात स्वच्छ धुतले. माझें हें पवित्र कार्य चालू असतांना माझ्या सवंगड्यांची सवंग शेरेबाजी, टिक्काटिप्पणी चालू होती. सवंगडी हा शब्द अस्सा तयार झाला तर! हॉटेलातले सगळे सेवक, इतर ग्राहक, इ.चा मोठा प्रेक्षकगण हॉटेलच्या दरवाजांत माझी गम्मत बघायला माझ्या वात्रट सोबत्यांनीं उभा केला. चप्पल त्वरित साफ झाल्याबद्दल त्वरित दुःखहि व्यक्त केलें. पण हें कार्य चालूं असतांना माझी छबी कॅमेर्‍यात बद्ध करायला मात्र विसरले नाहींत. पाहा तरी.



दुसरा मुक्काम बैकमपाडी. मंगलोरपूर्वीं पांचएक कि.मी. लागतें. इथें हायवेला लागून मुंबईकडून मंगलोरला जातांना उजवीकडे हॉटेल बालाजी आहे. त्यातली कोपर्‍यावरची खोली मस्त आहे. भरपूर उजेडवारा असलेली प्रशस्त खोली. रस्त्याकडचा एक कोपरा गोलाकार. गोलाकार कोपर्‍याला तसेंच त्या गोल कोपर्‍याच्या लगतच्या दोन्हीं बाजूंना मिळून दहाएक खिडक्या. वारा आला कीं पडदा क्षितिजसमांतर होई. भपकेदार नसल्यामुळें उर्दूवाचन किफायतशीर, स्वच्छता बरी, चोवीस तास गरम पाणी, खालींच उडपी शाकाहारी रेस्टॉरंट, सकाळीं सहाला उघडणारें. तीन वर्षांपूर्वीं आम्ही अशाच दक्षिण सफरीहून येतांना याच हॉटेलांत उतरलों होतों. समोर हायवेपलीकडे एक मांसाहारी रेस्टॉरंट, तिथें गेल्या वेलप्रमाणेंच मासे ताजे आणि रुचकर होते असें आमच्यातल्या मत्स्यप्रेमींचें मत पडलें.



२९-०९-२००३

बैकमपाडीच्या हॉटेल बालाजीखालच्या तळमजल्याच्या त्या उडिपी रेटॉरंटमध्यें मस्त न्याहारी केली आणि मंगलोरजवळ हवा, पाणी पेट्रोल वगैरे करून प्रसन्न चित्तानें निघालों. कासारगोडच्या जरा आधीं आपण रा.म.मा. १७ नें कर्नाटकातून केरळांत प्रवेश करतों. केरळांत प्रवेश केल्यावर कांहीं अंतरावर रस्ता अचानक चौपट रुंद, प्रशस्त आणि गुळगुळीत झालेला. उजवीकडे खड्डेयुक्त चिंचोळी गल्ली. मास्तरांनीं खूष होऊन वा! म्हणून उद्गार काढून ऍक्सीलरेटरवरचा पायाचा दाब वाढवला. पण रस्त्याच्या सुरवातीला असलेली SH 57 अशी पाटी माझ्या नजरेतून सुटली नव्हती. थांब! थांब!! थांब!!! म्हणून ओरडलों. सुधीर किलिंडर झिंदाबाद!

मास्तर थांबला.

अरे वा काय वा? हा SH 57 (57 नसेल तर अन्य क्रमांक पण बहुधा 57च) आहे. NH 17 म्हणजे उजवीकडची गल्ली.

काहींतरीच  काय?

अरे पाटी बघितली SH 57. हा वेगळा रस्ता - स्टेट हायवे ५७ आहे.

उतरून विचार आतां कोणाला तरी आणि खात्री करून घे.

रस्त्यांत एकहि पादचारी नाहीं. समोरच्या कडेला थोडे पुढें कांहीं मजूर खडी फोडत होते. त्यांना जाऊन विचारलें. NH 17?

त्याच्या डोक्यांत प्रकाश पडेना. चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह. मग विचारलें एर्नाकुलम? आतां त्यानें त्या मागील उजव्या वळणाकडे बोट दाखवलें. उजवें वळण नक्की झालें. पुन्हां मागें वळून त्या चिंचोळ्या गल्लींत शिरलों. केरळ सरकारनें राज्य महामार्ग छान राखला होता. पण राष्ट्रीय महामार्गाकडे मात्र केंद्र सरकारनें (लक्षपूर्वक?) दुर्लक्ष केलें होतें. रस्त्याच्या दुतर्फा बसच्या थांब्यावरच्या प्रवाशांत बुरखाधारी महिलांचें आधिक्य होतें. पुरुष मात्र मुंडूधारी. कांहीं पुरुष रंगीत लुंगी लावलेले तर कांहीं पाश्चात्य वेषभूषेंत. बहुतेक पुरुषांनीं दाढी राखलेली तर मिशीला चाट दिलेली. इथें मुस्लिम लोकांचें आधिक्य दिसत होतें. असें दृश्य पार तेल्लीचेरीपर्यंत. खड्ड्यांचा आणि वळणांचा दोनतीन कि.मी.चा पल्ला पार केल्ल्यावर मात्र रस्ता बर्‍यापैकीं रुंद आणि ठीक होता. जरा बरें वाटलें.



पांचदहा कि.मी. जरा बरे जातात न जातात तोंच एके ठिकाणीं खूप गर्दी उसळली होती. बॅरिकेड लवून नाकाबंदी केली होती. वीस पंचवीस खाकी वर्दीतले पोलीस. डोक्यावर खाकी हॅट्स. कांहींच्या डोक्यावर गोल टोप्या. हे बहुधा अधिकारी होते. एकानें आम्हांला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्या पोलिसानें अधिकार्‍याला कांहींतरी गुडुगुडू करून सांगितलें. एक अधिकारी जवळ आला. अतिशय नम्र स्वरांत दाक्षिणात्य इंग्रजीतून चौकशी केली. नम्र स्वर ऐकून आश्चर्यच वाटले. इतरांशीं उर्मटपणें चढ्या स्वरांत मल्याळममध्यें सुसंवाद चालू होता. ड्रायव्हिंग लायसेन्स पाहूं, दाखवले. गाडीचे कागदपत्र पाहूं, तेहि दाखवले. सगळें ठीक होते. कोणकोण आहांत, कोठून आलांत, कुठें चाललांत, इथूनच कां जाताहांत, वगैरे वगैरे. लायसेन्स परत दिलें पण गाडीचे कागदपत्र देईना. बोलतां बोलतां तो जरा पुढें जाऊन उभा राहिला. त्याच्या मागोमाग शेवडे मास्तर. आतां माझ्यांतला प्रशासकीय अधिकारी जागा झाला. मीं उतरून त्यांच्याजवळ गेलों. तो अधिकारी कारण सांगायलाच तयार होईना. तुम्हीं मुंबईचीं माणसें तुम्हांला कायदा बरोबर कळत असणार, तुम्हींच काय तें समजा समजा हें त्याचें पालुपद कायम. शेवडे नम्रपणें छान व्यावसायिक शब्दांत बाजू मांडत होता. त्यामुळें मीं फक्त बघ्याची भूमिका घेतली. दोघे मिळून त्याला कोंडीत पकडतोंय असें उगाच त्याला वाटायला नको. पांचपंधरा मिनिटें त्यानें आम्हांला चांगलेंच घुमवलें. आम्हींहि संयम सोडला नाहीं. व नम्रपणें बोलत राहिलों. शेवटीं त्यानें कारण सांगितलें. आमच्या नंबर प्लेटवर तळाला मध्यभागीं SPECTRA अशीं बारीक लाल अक्षरें होतीं. माझ्या वरच्या चप्पल साफ करतांनाच्या छायाचित्रांत पाहा. नंबर प्लेटवर कांहींहि लिहिलेलें चालत नाहीं. तुम्हांला ठाऊक नाहीं कां? ही त्या गाडी विकणार्‍या स्पेक्ट्रा मोटर्सनीं आपली जाहिरात केली होती. तशीं अक्षरें दुरून धड दिसतहि नव्हती. पण या पोलिसांनीं नियमावर बरोबर बोट ठेवलें होतें. एवढ्या वीसपंचवीस जणांत त्याला लाच देऊन सुटणें शक्य नव्हतें. मग गाडीचे कागद पाहा. सहा महिनेहि झाले नाहींत गाडी घेऊन. आतां प्रथम ही नंबर प्लेट ठीक करायचें काम करूं, कृपया सोडा. आम्हीं नोकरीधंदा करणारीं कुटुंबवत्सल माणसें आहोंत. चूक त्या गाडी विकणार्‍यानें केलेली आहे. तुम्हांला पकडायला गुन्हेगार आहेतच. वगैरे वगैरे. त्या अधिकार्‍यानें पोलिसाला बोलावून कांहींतरी गुडुगुडू केलें. मग त्या पोलिसानें नंबर खरा आणि पक्का आहे कीं नाहीं, टेप लावून खोटा नंबर लिहिला आहे कीं नाहीं याची खात्री केली. आणि रंगाचा एक पातळ पापुद्रा उचकटलाच. त्या पोलिसाच्या मतें ती टेप होती. अधिकार्‍यानें आम्हांला तसें सांगितलें. आम्हीं म्हटलें कोणत्याहि रंगाचे असे पापुद्रे निघतील. अगदीं तुमच्या पोलिसांच्या गाडीच्या नंबर प्लेटचेहि निघतील. आम्हीं काढून दाखवूं कां? तेव्हां तो अधिकारी हसला आणि त्यानें कागद परत देऊन गाडी सोडली. हुश्श ऽऽऽ! जवळजवळ अर्धा तास डोकेफोड झाली होती.



लागून लागून असलेल्या तेल्लीचेरी आणि माहे इथल्या भेंडीबाजार छापाच्या रहदारीतून कसेबसे निघालों. ही रहदारी आणि पुणेंनाशिकसारख्या शहरांतली रहदारी यांत एक मोठा फरक आहे. सिग्नल सुटला कीं मुंबईतलीं कोणत्याहि सिग्नलला थांबलेलीं सर्व वाहनें जवळजवळ सारख्या वेगानें सुटतात. तींहि सरळ रेषेंत. पुणेंनाशिकमध्यें मात्र प्रत्येक वाहन वेगळ्या वेगानें जातें. त्यामुळें पायीं रस्ता पार करताना गैरसोय होते. जास्त वेगाचीं वाहनें निघून दूर पोहोंचलीं तरी हळू जाणारीं वाहनें येतच राहातात आणि रस्ता पार करतां येत नाहीं. शिवाय पुणेंनाशिकला दुचाकी स्वारांची संख्या फारच असते. आणि हीं दुचाकीं वाहनें अशी तिरकी वा आडवीतिडवीं जातात कीं त्यांच्या दिशेचा कधींहि अंदाज येत नाहीं. रस्त्यानें पायीं जा वा मोटारीनें, कधीं समोरून भलत्या दिशेनें दुचाकी अंगावर येईल भरोसा नाहीं. पुणेंनाशिकची एकूण वाहतूक तशी सैरावैराच. आणखी एक गंमत आहे. मुंबईत जसे नाक्यावर, कट्ट्यावर दिसतात तसे तरूणतरूणींचे घोळके सहसा पुणेंनाशकांत दिसत नाहींत. इथें मैत्री हा प्रकारच नाहीं असें वाटतें. पण दुचाक्या रस्त्यावरून जातांना मात्र या मैत्रीला ऊत आलेला दिसतो. दोन तीन मोटारसायकली किंवा स्कूटर्स बाजूबाजूनें समांतर रेषांत संपूर्ण रस्ता अडवून संथ वेगानें जातात. मागून येऊन घाईंनें पुढें जायची सोय नसते. कितीही भोंगा वाजवा. कांहीं उपयोग नाहीं. सगळे रस्ते यांच्याच तीर्थरूपांचे.



असो. पालघाटला वा पलक्कड इथें कोक कोलाचा एक प्लांट तेव्हां चालूं होता. तिथले श्री. कृष्णकुमार नांवांचे एक गृहस्थ माझ्या दूरध्वनी आणि मेलवरून ओळखीचे होते. त्याना दूरध्वनी करून विचारलें होतें कीं या रस्त्यावर चांगलें हॉटेल कोठलें म्हणून. त्यांनीं हॉटेल अशोका म्हणून सांगितलें. दर सुमारें ४५० ते ७५०. पण पालघाटला पोहोंचण्याअगोदर संध्याकाळ झाली आणि रस्त्याला लागून असलेले चांगल्या पार्किंग सोयीचें हॉटेल शोधायला लागलों. त्यामुळें मुक्काम केरळांतल्या पेरींथलमन्ना या गावांत टाकला. तिथें हॉटेल केपीएम नांवाची शृंखला आहे. स्वच्छ आणि नीटनेटकें आहे. दर ४५० + तिसर्‍या माणसाला २५० = ६००. शृंखला हॉटेल असल्यामुळें ठरलेले दर. कमीजास्त नाहीं. तीन जणांची एक निराळीच खोली आम्हांला त्यानें दिली. कृष्णकुमारांनीं जेवणाचें, चहाचें जसें आम्हांला जमेल तसें निमंत्रण दिलें होतें. पण त्यांना नुसतें भेटायला जाणें पण झालें नाहीं.



३०-०९-२००३.

आज हॉटेल व ट्रान्सपोर्ट कर्मचार्‍यांचा संप आहे. केरळांत संपाना तोटा नाहीं. केरळी लोक केरळबाहेर भरपूर काम करतात. पण केरळमध्यें मात्र संप जास्त काम कमी. संपावर होते तरी आम्हांला चोरून खोलीवर न्याहारी दिली. गरमागरम अप्पम आणि चटणी. चहा कॉफी. चव पण उत्कृष्ट. खरें तर केरळमध्यें जेवणखाण थंड आणि बेचव असा आमचा अनुभव. पण हा सुखद धक्का होता. संप असल्यामुळें कर्मचार्‍यांचेंच अन्न आम्हाला दिलें होतें. संपामुळें त्याचे पैसे घेतले पण बिल दिलें नाहीं. पण आठपूर्वीं आम्हीं न्याहारी करून उठायच्या आधीं बिल तयार. म्हणजे सेवाहि उत्कृष्ट. ट्रान्सपोर्ट कर्मचार्‍यांचाहि संप असल्यमुळें रहादारी नगण्य. हा संप आमच्या पथ्थ्यावर पडला. केरळ तमिळनाडूच्या सीमेपर्यंत रहदारी जवळजवळ नव्हतीच. रस्त्यावर तुरळक खाजगी कार्स. केरळचा प्रसन्न हिरवागार झाडोरा सतत सोबतीला होताच.



निसर्गरम्य मृदुमलाई अभयारण्यांत केरळमधून तमिळनाडूंत प्रवेश केल्याबरोबर रस्त्याला लागून डावीकडे एक अत्यंत साधें उडिपी हॉटेल आहे. सकाळची न्याहारी खाऊन पोटांतले कावळे पुन्हां ताजेतवाने होऊन कावकाव करीत होते. तिथें कांहींतरी हलकें खायचें ठरलें. गाडीतून उतरायच्या आंतच मेनू ठरला.

"वडासांबार" मी.

"मी उपमा किंवा ओनियन उत्तप्पा." शेवडे.

"जाड्या पोंगलशिवाय काय खाणार?" मी.

"ते माझं मी पाहीन. ठरवणारा तूं कोण ?"

हॉटेलांत शिरलों. बसल्याबरोबर एका वेटरनें गोल ताट पुढ्यांत ठेवलें. त्यांत दुसर्‍यानें केळीचें पान ठेवलें. आपण मराठी लोक केळीचे पान जेवतांना उभें ठेवतों. इथें आडवें. दोन छोट्या बाजू मस्त अर्धगोलाकार कापून दीर्घवर्तुळ किंवा लंबगोल केलेलीं पानें. तिसर्‍यानें परातीतून भात आणला आणि घमेल्यातून फावड्यानें सिमेंट रस्त्यावर टाकावें तसा परातीतून वेळणीनें ताटांत टाकला व वेळणीनेंच त्यांत खड्डा केला. चौथ्यानें त्यावर बालदीतलें सांबार ओगराळ्यानें त्या खड्ड्यांत भस्सकन ओतलें. सिमेंटमध्यें पाणी ओतायला नको? चौथ्यानें पंचपात्रातून दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, लोणचें वगैरे आणून चमच्यानें भसाभसा वाढलें. हे सगळें प्रचंड वेगानें आणि धसमुसळेपणानें कांहीं सेकंदांतच केलें. आमचा गाडींत ठरलेला मेनू आणि त्या दोघांचे वजन आटोक्यांत ठेवायचे प्लान पार उद्ध्वस्त. असें वाटलें कीं अल्लाउद्दीनच्या राक्षसानें क्षणार्धांत जेवण निर्माण केलें. वाढपी हीं जानवीं घातलेलीं तरुण ब्राम्हण मुलें होतीं. अल्लाउद्दीनचा राक्षस जानवें घालायचा कीं नाहीं, ठाऊक नाहीं. भाताच्या ढिगावर सांबाराच्या थारोळ्यावर चारपांच बेबी कॉर्नएवढीं छोटेखानी पण अख्खी शिराळीं. नीट पाहिल्यावर लक्षांत आलें कीं तीं शिराळीं नसून भलीमोठ्ठी भेंडी होतीं. दोनतीन बोटें जाड आणि साताठ इंच लांब. मला भेंडी फारशी आवडत नाहीं. सगळींच्या सगळीं उचलून बाजूच्या सर्वभक्षी मित्राच्या ताटांत टाकलीं. दोन मिनिटांनीं सगळे वाढपी पुन्हां फेरी टाकून गेले. सांबारवाल्याला वाटलें कीं मला भेंडी खूप आवडली आणि म्हणून ताबडतोब खाल्ली. म्हणून त्यानें आणखी चारपांच भेंडी न बोलतां न विचारतां भस्सकन ओतलीं. विचारायची बातच नाहीं. जय अल्लाउद्दीनचा राक्षस. आलिया भेंडीशीं असावें सादर. म्हणून खाल्लीं. पण भेंडी कोवळी आणि स्वादिष्ट होती. बुळबुळीतपणा अजिबात नाहीं. सांबारांत इवलाले स्वादिष्ट कोईमतुरी कांदे, छोट्या बोराएवढे पिटुकले लालबुंद स्वादिष्ट टमाटे, फुलकोबीच्या ढब्बाड्या फोडी, लाल भोपळ्याचे सालासकट ढेपशे, इ. होतेंच. त्यामुळें जेवण अंमळ जास्तच झालें. मी तर नेहमीच्या तिप्पट जेवलों. तरी ताटांत कोणी आणखी कांहीं वाढूं नये म्हणून आम्हीं सावध होतों. इतर खाणार्‍या लोकांचे हात सांबारभातानें बरबटलेले. खास दाक्षिणात्य पद्धतीनें भाताचे लाडू करून तोंडांत टाकत भराभर खात असलेले. प्रत्येकीं फक्त वीस रुपयांत पोटभर जेवण. २००३ सालीं. पण जेवण बरें आणि चविष्ट होतें. फार तिखटहि नाहीं आणि सपकहि नाहीं. आणि मुख्य म्हणजे इतकें हलकें होतें कीं आडमाप खाऊनहि अंगावर आलें नाहीं.



एकदीडच्या दरम्यान कोईंबतूरला पोहोंचलों. कुठेंतरी पाटी पाहिल्याचें आठवतें - बहुधा कोईंबतूर १४२. (मेंदूंत घोटाळा होऊं शकतो. चू. भू. द्या. घ्या. ) म्हणजे बहुधा दूरच्या उपनगरांत पोहोंचलों असणार. कोइंबतूरमधला रस्ता उद्योगप्रधान वस्तीतून जाणारा होता. रस्त्याच्या दोन्हीं बाजूंना छोटे वा मध्यम आकाराचे कारखाने. कारखान्यांच्या इमारती अनाकर्षक. इमारतींच्या भिंतीवर एनॅमलमध्यें रंगवलेल्या जाहिराती. जवळजवळ सर्व जाहिरातींत तमिळ नक्षी. अधूनमधून फिरंगी भाषेंत. वसईला मुंबई अहमदाबाद - पश्चिम महामार्गावर लागून उद्योग आहेत तसें दृश्य. फक्त मराठी हिंदी फिरंगीऐवजीं तमिळ नक्षी आणि फिरंगी. पण झाडें गायब. रस्त्यावर अधूनमधून खड्डे आणि घाणकचरा. कोईंबतूरचे प्रथमदर्शन फारसें चांगलें नव्हतें. देवाला दूरध्वनि केला. तो म्हणाला अविनाशी रोड पकडा आणि निलगिरी मॉलमध्यें या. तिथें भेटतो. वाटेंतल्या कांहीं खुणा सांगितल्या. अविनाशी रोड शोधत निघालों. कोइंबतूरचा पिन कोड हळूं हळूं कमी होत गेला. एके ठिकाणीं पुलावर आलों. पाहातों तर पुलापलीकडे दोन फाटे. टळटळीत दुपार. पुलावरून सुसाट वाहनें जात होतीं. बाजूनें जाणार्‍या वाहनांत विचारायचें नांवच नको. आजूबाजूला एकहि माणूस दिसेना. गाडी पुलावरच थांबवली. रस्ता बघण्यचें काम अर्थातच किलींडरचें. मीं बाहेर आलों. वातानुकूलित गाडीतून बाहेर आल्यावर चटके देणार्‍या उन्हाचा कडाका जाणवला. एक माणूस पुलाखालीं उभा होता. त्याला मीं वरूनच विचारलें, "अविनाशी रोड?"



त्यानें अंगुलिनिर्देश करून तत्परतेनें रस्ता दाखवला. त्याच्या सौजन्यानें बरें वाटलें. माझ्या पक्क्या वर्णामुळें मीं त्याला त्यांच्यातलाच वाटलों म्हणून ही आपुलकी बरें, इति इतर दोघे. चांगला प्रशस्त रस्ता. सतत वर काटकोनी कमानी, कमानीखालीं स्थळांच्या नावांच्या हिरव्या पाट्या व दिशादर्शक बाण. त्यांत अविनाशी हें नांव होतेंच. शिवाय देवानें रस्त्यावरच्या खाणाखुणा - लॅंडमार्क्स सांगितले होतेच त्यामुळें विशेष समस्या आली नाहीं. निलगिरी मॉल सहज सांपडलें.



निलगिरी मॉल चकाचक होतें. तिथल्या रेस्तरॉं मध्यें बसायचें होतें. लाऊंजवजा रेस्तरॉं वातानुकूलित होतेंच. जवळजवळ अडीच वाजले होते. सेल्फ सर्व्हिस होती. समोरच बेकरी विभाग होता. त्या मस्त वासानें जीभ चाळवली. मी उठलों. एक गरमागरम व्हेज पफ आणि एक चहा घेऊन आलों. जाड्या सकाळीं एकावेळीं चारपांच कप चहा प्याल्यानंतर तो दिवसभर पुन्हां चहा घेत नाहीं. इतर कोणी घेतलाच तर त्याला कारकुंडा म्हणतो. गेला उडत. विचारतो कोण? आम्हीं चहा घेतों तेव्हां तो कांहींतरी खातो. विद्वान लोक बुद्धीची कामें करीत असल्यामुळें बुद्धीला चालना द्यायला चहा घेतात. कामगार लोक अंगमेहनतीनें झालेली शरीराची झीज भरून काढायला वेड्यासारखें फालतू पदार्थ खातात. असें माझें साधें सरळ तर्कशास्त्र आहे. पफ कसा उच्च अभिरुचीचा पदार्थ आहे. त्यानें पफ खाऊं नये म्हणून बोललों. तरी त्यानें पफची चव घेतलीच. मग मास्तरांनींहि घेतली. उत्कृष्ट. किंमत रु. ५/- कागदाच्या बशींत टोमॅटो सॉस आणि कागदाच्या रुमालासह. रुमाल आणि कागदाची बशी मात्र खातां येत नाहीं. जाड्यानें थंडगार बदाम मिल्क घेतलें. रु. १२/- उर्दूनें गोड धक्का दिला. शेवडेमास्तर दक्षिणेंत फिल्टर कॉफी जास्त पसंत करतो. लोकांचें निरीक्षण करीत होतों. बरेच लोक मुंडू लावून असतात. सायकल, स्कूटर आणि मोटरसायकलवर देखील मुंडूधारी होते. मुंडूधारी लोकसुद्धां पेडलवर पाय ठेवून उभें राहून सायकलला गति देऊन शिताफीनें टांग टाकून सायकलवर बसूं शकतात. पण वात्रट मुंबईकरांच्या चेहर्‍यावर स्मित उमटूं न देतां मात्र नाहीं. मॉलमध्यें पांढरपेशे दिसत होते. बाहेरच्या मानानें Ignore warning मुंडू कमी. स्त्रिया साडीधारी. बहुतेक स्त्रियांच्या उजव्या नाकांत दगिने. बहुतेकांचा वर्ण माझ्यापेक्षां सरस. त्यामुळें माझी वर्णाची ऐट जिरली. एखाद्या ठार काळ्या माणसावर माझी नजर पडली कीं दोघेजण गालांतल्या गालांत हसत. वेळ सहज भुर्रकन उडून गेला. अर्ध्याएक तासाच्या प्रतीक्षेनंतर देवा आला.



क्रमशः

पूर्वप्रकाशन: http://www.manogat.com/node/18334

No comments:

Post a Comment