Friday 23 April 2010

आठवणीतल्या सहली ७ : यरकॉड

ठरल्याप्रमाणें देवाची गाडी कोईंबतूरहून आणायला जायचें होतें. एप्रिल अखेर, मे सुरुवात म्हणतां म्हणतां मेची १७ तारीख मुक्रर झाली व त्याप्रमाणें कोईंबतूर एक्सप्रेसची तिकिटें काढलीं. जातांनाचे यशस्वी कलाकार. उन्हाळा असल्यामुळें वातानुकूलित कक्षाला पर्याय नव्हता. तिरुपूर गेल्यावर देवाला दूध्व केला. तो बरोबर ठरल्या वेळीं उत्साहानें आमच्या स्वागतासाठीं स्थानकावर तयार होता. बसतांनाच भटकंतीची चर्चा सुरूं झाली. मुनार, कुन्नूर - उटी आणि यरकॉड अशीं ठिकाणें ठरलीं. पैकीं उटीला कोईंबतूरहून हवें तर सकाळीं जाऊन संध्याकाळीं परत येतां येतें. वा परतीचा मुंबईकडचा प्रवास कोईंबतूर - कुन्नूर - उटी - बंगळुरू असाहि करतां येतो.



मुख्य अडचण होती ती ऐन गर्दीचा प्रवासी मोसम असल्यामुळें निवासाच्या व्यवस्थेंत आबाळ होण्याची शक्यता होती. मागील सफरींत मुन्नारला अतिवृष्टीमुळें फिरूंच शकलों नव्हतों आणि एका रात्रीनंतर आम्हीं गाशा गुंडाळला होता. त्याचें उट्टें फेडायची अप्रतिम संधि लाभली होती. फारफार तर काय होईल? पैसे जास्त पडतील एवढेंच. नाहीतरी कोईंबतूरला राहाणॅं फुकटच होतें कीं. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जायचें झालें. पण प्रथम यरकॉडला जायचें ठरलें.



कोईंबतूरहून निघायला आम्हीं आंघोळी करून तयार. सकाळीं नऊसाडेनऊची वेळ. निरभ्र आकाश. अरे गाडीवर कॅरिअर लावा. सामान वर जाईल. मेस्त्री चलाऽऽ कामाला लागाऽऽ. हा मेस्त्री मीच बरें कां. हातोडी, पान्हे वगैरे चालवण्यात आमच्यांत मीं किंचित कमी डावा. उजवा नक्कीच म्हणतां येणार नाहीं. जरी डावखुरा नसलों तरी. कॅरिअर लावलें. वीसेक मिनिटें लागलीं. स्टेशनसमोर न्याहारी केली आणि निघालों. कोइंबतूर रेलवे स्टेशनसमोर दोनचार रेस्तरॉं आहेत. उडिपी धर्तीची. अतिशय प्रशस्त हवेशीर आणि भरपूर उजेड असलेलीं. रोस्ट ऊर्फ सादा डोसा सहा रु., इडली, वडा सांबार आठ रु., पोंगल बारा रु., मसाला डोसा बारा रु., फिल्टर कॉफी आठ रु., चहा चार रु. असे दर २००३-४ सालीं होते. सांबार चटण्या कितीहि खा. उर्दूवाचनाची चंगळच होती. चव उडप्यापेक्षां बरीच वेगळी पण मस्त. खासकरून सांबारची चव वेगळी विशिष्ट आणि मस्तच. शिवाय तीन प्रकारच्या ओल्या नारळाच्या चटण्या अनलिमिटेड. समाजाच्या विविध आर्थिक स्तरांतले, विविध जातींतले, प्रांतातले विविध धर्माचे लोक एका टेबलवर गुण्यागोविंदानें योग्य ती स्वच्छता राखून खातांना दिसतात. थोड्याफार फरकानें असेच दृश्य आणि दर ‘आर्या’ चेन हॉटेलमध्यें आढळले. कामत चेन हॉटेलच्या दर्जाचें आहे आर्या. तरीहि पदार्थ चविष्ट. गावढ्या गावांत देखील कामतचें हॉटेल असलें तरी दर वाजवीपेक्षां जास्त असतात. उदा. २००८ सालीं डिसेंबरमध्यें सावंतवाडीला वा कोलाडला इडली रु. २५/- होते. शिवाय वाईट चवीचें सांबार कामतमध्येंहि मिळतें. जादा चटणी वा सांबाराचे रु. १०/- पडतात. म्हणजे सर्वत्र मुंबईचेच दर. फक्त स्वच्छता ठीक असते.



तमिळनाडूमध्यें सगळीकडे पोंगल, टोमॅटो राईस आणि लेमन राईस हे भाताचे तीन प्रकार सुरेख मिळतात. खेरीज महाराष्ट्रांत जसे मालवणी मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत तसे तमिळनाडूंत चेट्टिनाड मसालेदार पदार्थ. खासकरून मांसाहारी.



राममा ४७ पकडून मार्गस्थ झालों. आतां शेवडे मास्तरांची किलींडरच्या जागेवर आणि माझी मागच्या आसनावर पदावनति. सूर्याजीराव थोड्या वेळांतच पिसाळले. आकाश भगभगीत झालें. अर्धी पॅंट घातली असेल तर गाडीतून प्रवास करतांना टॉवेल मांडीवर वाळवतां येतो. ऊन असेल तर एकदोन तासांत वाळतो. शिवाय उन्हाचा त्रास होत नाहीं तें वेगळेंच. तसाच टॉवेल वाळवून प्लॅस्टिकच्या पिशवींत घालून मागें हाताशीं ठेवला. रस्त्यावर रणरणते ऊन. निमूटपणें कांच बंद करून वातानुकूलन चालूं केलें. वातानुकूलन चालूं केल्यावर कांहीं वेळांतच परिसर रम्य भासूं लगला. रस्त्याच्या दुतर्फा नारळी आणि विविध वृक्ष, शेतें, अधूनमधून गांवें, शहरापासून दूर आल्यावर बरें वाटलें. आमची चेकाळलेली बडबड सुरूं होती. तमिळनाडूंत एक वैशिष्ट्यपूर्ण गंमत आढळली. दादरच्या कांबळी प्रदर्शनांत आढळत तसे वा गणेशोत्सवांत प्रदर्शनार्थ मांडतात तसे मोठ्ठ्या मूर्तींनीं बनवलेले अनेक पौराणिक प्रसंगांचे देखावे ठिकठिकाणीं दिसतात. पण प्रचंड आकारांच्या मूर्ति. लार्जर दॅन लाईफ म्हणतात तशा. दोनतीन मजली इमारतीएवढी एकेक व्यक्ति उंच. बहुतेक मूर्ति राक्षसांच्या. सर्व तैलरंगांत रंगवलेल्या. देखाव्याचा अर्थ मात्र कांहीं कळत नव्हता. मुंबईला परत आल्यावर आमच्या कंपनीतल्या एका तमिळ इंजिनीयरला विचारलें. त्यानें सांगितलें कीं त्या विविध ग्रामदेवता असतात. त्यांच्या विविध आख्यायिका, दंतकथा असतात. कांहीं पौराणिक तर कांहीं ऐतिहासिक. हे देखावे त्या कथांवर आधारित. त्यांतील त्या विशिष्ट - बहुधा द्रविड वंशाचे वीरपुरुष आपल्याला राक्षसांसारखे भासतात. सहसा गांवाच्या वेशीवर हे देखावे उभारलेले असतात आणि हे वीरपुरुष विविध दुष्ट शक्तींपासून ते गांवाचें रक्षण करतात असें तिथें मानतात.



तीनसाडेतीनच्या सुमाराला आम्हीं जात होतों त्या दिशेलाच दूर क्षितिजावर काळे काळे ढग दिसूं लागले. आमचें सामान तर कॅरिअरवर होतें. आतां प्लॅस्टिक शोधायला हवें. सालेम शहर जवळ आलें. रस्त्याला लागून एक बाजारपेठ लागली. गाडी उभी करायला एका झाडाखालीं सावलीची जागा सांपडली. प्लॅस्टिकसंशोधनाचें महत्त्वाचें कार्य माझ्याकडे आलें. संशोधकाची भूमिका माझ्यासारख्या हुशार माणसाकडे नको कां? प्रथम गल्लीत घुसून दुकानें शोधूं लागलों. पांचेक मिनिटें शोधलें. हार्डवेअर, रंग, विजेच्या उपकरणांचीं दुकानें इ. इतर सर्व वस्तूंचीं दुकानें होतीं. एका सुशिक्षित दिसणार्‍या माणसाला मोजक्या शब्दांत इंग्रजीतून विचारलें. पण त्याला अजिबात इंग्रजी येत नव्हतें. माझ्या अंदाजाचें दिवाळें. वाटलें प्लॅस्टिकला तमिळमध्यें पण प्लॅस्टिकच म्हणणार. कारला कार आणि कॅरिअरला कॅरिअर. एका गिर्‍हाईक नसलेल्या दुकानांत हातवारे करून विचारलें कीं कार, कॅरिअर, बॅग्ज, (आकाशाकडे बोट दाखवून) रेऽऽन, प्लॅऽऽस्टिक? त्याला बोध झाला नाहीं. मीं दुकानातून खालीं उतरलों. पण रस्त्यावरचा एक मुंडू नेसलेला माणूस आमच्याकडे पाहात होता. त्यानें आपणहून विचारले? प्लॅस्टीऽऽक? पुढें तमिळमधला चारपांच शब्दांचा अगम्य खडखडाट. मीं मानेनें होय म्हटलें. तो चारपांच वळणें घेऊन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या चक्रव्यूहांत घेऊन गेला. मीं मोठ्या मुष्किलीनें दिशा, खुणा वा रस्ता लक्षांत ठेवायचा निष्फळ प्रयत्न करीत त्याच्यामागें. एक दुकान दाखवलें. तिथें कापडाच्या ताग्यासारखे दोनतीन प्लॅस्टिकचे तागे ठेवलेले होते. वेगवेगळ्या रुंदीचे. ते दाखवून त्या काळ्या मुंडूधारी देवदूतानें विचारलें, "धिस?" माझा आणि मागोमाग त्याचा मुखचंद्र समाधानानें उजळून गेला. मीं मान डोलावली. त्या दुकानदाराला विचारलें विड्थ? पन्हा? त्याला कळलें नाहीं. पण रुंदी दिसतच होती. सगळ्यांत मोठा एक मीटरचा. सोडवून पाहिलें. रुंदी दोन मीटर होती. दुमडून गुंडाळलेला तागा.

त्याला म्हटलें "फाईव्ह मीटर."

त्यानें विचारलें, "फाईव्ह के. जी.?"

"फाईव्ह करेक्ट. मीटर येस. के. जी. नो!"

त्याला कळेना. पण आपल्या देवदूताला कळलें. त्यानें दुकानदाराशीं काहींतरी तमिळ कडकडाट केला.

मग दुकानदारानें लोखंडी गज दाखवला आणि प्रश्नार्थक मुद्रा केली.

"येस! मीटर! फाईव्ह मीटर!"

त्यानें गणकयंत्र घेतले आणि आकडेमोड करून म्हणाला "थ्री फिफ्टी रुपीज? थ्री हंड्रेड अ... अ... कडकट्टकडकट्ट." अदमासें तीनशें साडेतीनशे रुपये.

"येस." मीं मान डोलावली.

त्यानें पांच मीटर मोजलें. गुंडाळी करून तराजूत टाकली आणि वजन पाहून गणित करून म्हणाला टू हंड्रेड सेव्हंटी एट रुपीज. किती वजन होतें आतां लक्षांत नाहीं. पैसे दिले. परत निघालों. रस्ता शोधायला लागलों. देवदूत बाजूलाच उभा होता. तो आला रस्ता दाखवायला. सुटकेचा श्वास घेतला. वाटेंत मला शोधत येणारा देवा भेटला. खूप वैतागलेला.

"अरे काय किती वेळ एवढंसं प्लास्टिक आणायला?"

"अर्धा तास दुनियाभर वणवण करून हा ऐवज मिळाला आहे बाबा."

"अर्ध्या तासात दुनियाभर वणवण करतां येते काय?"

"मग जाड्याला पाठवायचं होतं मला शोधायला!"

आतां तो खुदकन हसला. "त्या दिशाभ्रमिष्टाला? मग संपलंच! तो खादाडखाऊ ताडगोळे खात बसलाय!"

तेवढ्यांत गाडीकडे आलों. त्या देवदूताचे आभार मानले.

मीं स्थानापन्न झाल्याबरोबर जाड्यानें माझ्या हातांत एक वर्तमानपत्राच्या कागदातलें पुडकें दिलें. तीन ताडगोळे होते. कोवळे आणि अवीट गोडीचे रसाळ ताडगोळे. एवढे सुंदर ताडगोळे मीं अजूनहि कधीं खाल्ले नाहींत. शेवडेच्या मतें बहुधा ताडी न काढलेल्या ताडाचे असावेत. फक्त तीनच राहिल्याबद्दल जाड्यानें दिलगिरी व्यक्त केली.

"इतके छान होते कीं राहवले नाहीं."

"तीनतरी ठेवल्याबद्दल धन्यवाद बाबा. हेंहि नसे थोडकें"

प्लॅस्टिकची दोरी माझ्या बॅगेतून काढून गाडींत ठेवलेली होतीच.

मीं ताडगोळे खाईपर्यंत दोघांनीं प्लॅस्टिकनें सामान मस्त बांधून सुरक्षित केलें.

"आता रस्ता शोधा." देवा.

"याच राममा ४७ नें सालेम ओलांडून पुढें गेल्यावर यरकॉडचा रस्ता आहे. नंतर शोधूंया." शेवडे.

आतां ढग जवळ आले होते. सालेम शहर ओलांडल्यावर एकाला विचारलें, "यरकॉड? यरकॉड?"

"देअर ईज अ पेट्रोल पंक ऑन द राईट. बट टेक फर्स्ट लेफ्ट देन."

तमिळनाडूमध्यें पेट्रोल पंपाला ‘पेट्रोल पंक’ म्हणतात आणि इंग्रजींत लिहिलेलें होतें 'PETROL BUNK' प आणि ब ची सरमिसळ किंवा सळमिसर (धन्यवाद थालेपारट - पु.ल.). माझ्या ओळखीच्या डॉ. लक्ष्मण नावाच्या एका तमिळ सद् गृहस्थांनीं एकदां मला सांगितलें होतें कीं तमिळमध्यें ग हें व्यंजन नाहीं. ‘कंका’ लिहितात आणि ‘गंगा’ वाचतात. तें आठवलें. ग प्रमाणें ब देखील नसावें. पोपडे (बोबडे) कुठले!



"अरे माझी दाढ दुखायला लागली." शेवडेनें तक्रार केली. तशी दोनेक दिवस दुखत होती. पण त्याला वाटलें ठीक होईल. पण आतां वेदना वाढली. मग त्यानें भ्रमणध्वनीवरून घरीं बोलून दंतविशारदानें शिफारस केलेल्या वेदनाशामक गोळ्यांचें आणि प्रतिजैविक गोळ्यांचें नांव लिहून घेतलें.



असो. आतां आभाळ दाटून आलें होतें. डावें वळण घेतलें आणि निघालों. एके ठिकाणीं फाटा फुटला होता. आतां झिमझिम पावसाला सुरुवात झाली. जोडीला जोरदार वारा. विचारायला रस्त्यांत कोणी नाहीं. डावीकडे एक शॉपिंग सेंटर होतें. त्यांत रस्ताहि विचारूं आणि औषधहि घेऊं म्हटलें आणि छत्री घेऊन उतरलों. वारा प्रचंड होता. कसाबसा छत्री सांवरत शॉपिंग सेंटर मध्यें घुसलों. एका दुकानदाराला बाहेरूनच ओरडून विचारलें

"यरकॉड?"

पावसाच्या आवाजांत आणि घोंघावणार्‍या वार्‍यांत त्याला कांहीं ऐकूं जाईना. छत्री बंद केली. आंत घुसलों. त्याला ठाऊक नसावें. जरा पुढें गेलों. सुदैवानें एक औषधाचें दुकान होतें. म्हटले याला इंग्रजीहि येत असेल. तिथें तीं औषधें नव्हतीं. पण दुकानाचा मालक हा क्वालिफाईड फार्मासिस्ट होता. त्यानें संदर्भ सूची वापरून इक्विव्हॅलंट औषधें दिलीं.

त्यानें मस्त मार्गदर्शनहि केलें.

"राईट, देन अगेन राईट, देन लेफ्ट टर्न. दॅट रोड गोज टू यरकॉड." असें कांहींसें.

"मेनी मेनी थॅंक्स." मीं स्तोत्र पाठ करावें तसें पाठ करून घोकतच परत आलों.

पाऊस आतां मुसळधार झाला होता. गाडीकडे आलों. आतां माझ्यांत बाजी प्रभू संचारला होता. अतिशय शौर्यानें छत्री उलटी होऊं न देतां वार्‍याला तोंड देत मनांतल्या मनांत रस्त्याचें स्तोत्र घोकत स्वतःची पाठ स्वतःच थोपटत गाडीपाशीं आलों. जाड्यानें दार उघडलें. भिजूं नयेत म्हणून प्रथम औषधें दिली. थ्री फोल्ड छत्री खिशांत राहाते खरी पण जोरदार वार्‍यामुळें ती छत्री बंदच होईना. हें एक अनपेक्षित संकट. वळलें तर छत्री उलटी होणार. छत्री गेली तर गेली. पण तिघे टिंगल करतील त्याचें काय? न वळावें तर छत्री बंदच होत नाहीं. दोन क्षण काय युक्ती करावी याचा विचार करीत होतों. पावसाचें पाणी गाडींत यायला लागलें तसा देवा उखडला. "फेकून दे ती छत्री आणि आंत घूस पटकन. नाहींतर तुला इथेंच सोडून जातों. कसली छत्री घेऊन येतो! चांगली छत्री आणायला काय होतं?"

मग सुचलें. गाडीच्या विरुद्ध बाजूला गेलो. खाली वाकून वार्‍यापासून आडोसा घेतला छत्री बंद केली आणि गाडीला पुन्हां वळसा घालून आंत घुसलों. त्या पांचदहा सेकंदांत नखशिखांत भिजून गेलों. सीट भिजेल म्हणून वाकून उभा राहिलों. तेवढ्यांत जाड्यानें चपळाईनें टॉवेल ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी सीटवर अंथरली आणि टॉवेल हातांत दिला. ओली पाठ सीटला न टेकवतां बसलों. ओली छत्री गुंडाळून छत्रीच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबली. माझे (काळे, विपुल, रेशमी, मुलायम वगैरे) केंस पुसले. रस्त्याचें पाठ केलेलें स्तोत्र म्हणून दाखवलें. सुदैवानें देवाला तें एका फटक्यांत कळलें. देवाला स्तोत्र समजणारच! नाहीं कां? पुढच्या सीटच्या मागच्या खिशातली प्लॅस्टिकची पिशवी काढली. ओला शर्ट आणि बन्यान त्यांत टाकलें. केंस आणि अंगहि पुसून घेतलें व मागें रेलून नीट बसलों. तरीहि दोनतीन मिनिटांत थंडगार पडलों. वातानुकूलन बंद केलें. तरी थंडीनें दांत कडकड वाजायला लागले. बाकीच्या तिघांची मस्त करमणूक झाली. प्रत्युत्तर म्हणून मीं देवाच्या मघांच्या मुक्ताफळांचा आवेशासहित पुनरुच्चार केला. पण तोंड वाकडें करून वेडावत. मस्त हशा पिकला.



"तुमच्या थंडीवर आमच्याकडे औषध आहे." देवानें जाहीर केलें. कोणतें तें सूज्ञांच्या लक्षांत आलें असेलच.



यरकॉडचा घाट साताठ कि.मी.चा छोटासाच आहे. पण तेवढ्या अंतरांत वीसबावीस हेअरपिन वळणें आहेत. जोडीला जोरदार वादळ होतेंच. अर्ध्या तासानें आम्हीं जवळजवळ निम्मा घाट पार केला होता. आतां पाऊस वारे थांबले होते. वादळ शांत झाले होतें पण रस्त्यावर अनेक झाडें उन्मळून पडलीं होतीं. पंधरावीस मिनिटांत त्या वादळानें परिसराचे तीनतेरा वाजवले होते. पूर्ण अंधार नसला तरी उजेड कमीच. पांच साडेपांच वाजतांच सातएक वाजल्याएवढें अंधारून आलें होतें. (तुलना मुंबईची आहे) रस्ता निसरडा. वाटचाल कूर्मगतीची. मीं कुडकुडत होतोंच.



आतां शेवडेच्या दाढदुखीनें उग्र स्वरूप धारण केलें. पण औषधी उपायांनीं नंतर तासाभरानें तो ठीक झाला. वेदना आटोक्यांत आल्या होत्या. जय ऍलोपॅथी.



देवानें जाहीर केलें कीं हॉटेलसंशोधनाची जरूर पडणार नाहीं. दोनतीन आठवड्यापूर्वीं तो इथें आला होता. तेव्हां तो ज्या हॉटेलांत राहिला होता त्याच्या समोरचें हॉटेल जास्त चांगलें होतें. तिथेंच जायचें. सिल्व्हर हॉलिडे हॉटेल खरेंच झकास होतें. नॉन ए सी डबल ऑक्युपन्सी दर रु. ४००/- (हा तपशील माझ्या दगाबाज मेंदूनें पुरवलेले नाहींत तर जपून ठेवलेल्या बिलानें.) एक १२ फूट X १२ फूट चौरसाकार संगमरवरी फरशीचें अंगण. वर प्लॅस्टीकचे हिरवें छप्पर. त्या चौरसाच्या दोन संलग्न बाजूंना दोन डबल ऑक्युपन्सी खोल्या. सभोंवती आवारांत मस्त झाडोरा. आसमंतांत धुकें उतरत होतें. वातावरण स्वप्नवत. मी अजूनहि कुडकुडत होतों. म्हटलें चला प्रथम गरमागरम पाण्याची अंघोळ करूं या आणि कोरडे कपडे चढवूंया. पावसाचा जोर ओसरला होता पण रिपरिप चालू होती. बाथरूममध्यें घुसून गीझर ऑन केला. हाय रे दुर्दैवा, वादळानें वीज गेली होती. फक्त दिवे पंखे लागत होते, इन्व्हर्टरवर. अंग चिकचिकीत झालें होतें. अंघोळ न करतां राहाणें अशक्य होतें. सरळ शॉवरखाली उभा राहिलों अणि धीर एकवटून नळ फिरवला. थंडगार पाण्याने शिरशिरी आली. पण दोनेक मिनिटांत सवय झाली. मस्त आंघोळ करून अंग कोरडें करून कोरडे कपडे घातले. भिजून चिकचिकीत झाल्यावर अंघोळ करून कोरडे कपडे घालण्यासारखें दुसरें सुख नाहीं असें वाटतें. खरेंच, परिस्थितीनुसार सुखाच्या कल्पना किती बदलतात, नाहीं? हातपाय जोरजोरांत हालवून ऊब आणली - वॉर्म अप झालों. पंधरा मिनिटें व्यायाम केला. बाहेर डोकावलों. उजेड पुरेसा नसला तरी पूर्ण अंधारहि नव्हता. पाऊस थाबला होता. झकास थंडी, उतरणारे धुकें. माझा उत्साही मुखचंद्र पाहूनहि दुसराहि बाहेर डोकावून आला. दोघे दुसर्‍या रूममध्यें गेलों. आमचा उत्साह पाहून तेहि बाहेर डोकावले. प्रवासाचा थकवा, माझी थंडी, शेवडेची दाढदुखी, सऽऽगळें विसरलों. पादत्राणें चढवून सगळे लगेच पायीं फिरायला तयार.



बघतां बघतां यरकॉड गावाच्या मध्यवर्ती ठिकाणीं पोहोंचलों. मेंदूला झिणझिण्या येतील असा लाऊडस्पीकरच्या कर्ण्याचा कर्णकर्कश आवाज कानीं आला. तिथें एक देवीच्या उत्सवाची जत्रा होती. तमिळ भावगीत चालूं होतें. तिघे वैतागले. संगीत कर्णफोड असलें तरी माझ्यावर मात्र गारूड करून गेलें. अगदी मराठी भावगीत शोभेल अशी मस्त सुरावट. मराठी सिनेमांत मधुचंद्राच्या दृश्यांत शोभेल असें मेलडिअस युगुलगीत. शब्द कळत नव्हते पण शब्दांमागील भावना स्वर बरोबर पोचवीत होते. स्वरांना भाषेच्या मर्यादा नसतात हें खरें. त्या भारलेल्या वातावरणांत त्या गीतातली ती अगम्य भाषा उगीचच जन्मजन्मांतरीच्या ओळखीची भासूं लागली. असें वाटलें कीं त्या ध्वनीची तीव्रता सुखद भासेल एवढ्या अंतरावर जाऊन फक्त गाणीं ऐकावींत. स्वर्ग दोन बोटें उरला. त्या कर्णफोड स्पीकरपासून त्वरेनें दूर गेलों. पुढचें गीतहि सुंदर होतें. पण बोललों नाहीं. तमिळ गीत छान आहे म्हटलें असतें तर तिघांनीं फिरक्या घेऊन मोरू केला असता माझा.



यरकॉड हें माथेरानसारखें छोटेखानी गांव आहे. एका चौकांत पोहोंचलों. तिथें एका मोठ्या फळ्यावर विविध प्रेक्षणीय ठिकाणांचीं नावें व अंतरें लिहिलेलीं आहेत. सर्वांत दूरचें प्रेक्षणीय स्थळ वीसेक किमी पण नव्हतें. आतां स्थळांचीं नावें व अंतरें आठवत नाहींत. या दगाबाज मेंदूला खरें तर गोळीच घालायला पाहिजे. दुसर्‍या दिवशीं कोणतीं सौंदर्यस्थळें पाहायचीं तें ठरवलें आणि एका पर्यटन केंद्रांत - टूरिस्ट सेंटरवर - जाऊन फिरण्यासाठीं वाहन नक्की केले. बहुधा सहाएक रु. प्रति. किमी दर होता असें वाटतें पण नक्की आठवत नाहीं.



तासभर मस्त फिरून आलों. देवानें शब्द पाळला आणि थंडीवरचें औषध काढलें. रूम सर्व्हिसनें व्हेज ६५ नांवाचा एक अप्रतिम पदार्थ दिला. तीं फुलकोबीची भजीं होतीं. पण अतिशय कुरकुरीत. फुलकोबीवरच्या अगदीं पातळ आवरणांत तांदूळ व उडदाचें प्राबल्य होतें. ताज्या गावरान फुलकोबीची चवच न्यारी. अर्थात प्रत्येक गांवच्या पाण्याच्या गोडीचा आणि त्या त्या पाकसाधकाचा चवीत वाटा असतोच. जोडीला हॉटेलच्या किचनमध्येंच बनवलेलें अप्रतिम टोमॅटो सॉस. चिकन ६५ पण चांगलें होतें पण फुलकोबीची सर त्याला नव्हती. जेवणासाठीं मीं टोमॅटो राईस आणि सांबार मागवलें होतें. शाकाहारी देवा माझा भागीदार होताच. इतर दोघांचें चिकनहि चविष्ट होतें म्हणे.



तिथल्या सौंदर्यस्थळांबद्दल लिहीत नाहीं. तीं समक्ष पाहाण्यांतच आनंद आहे.



क्रमशः



http://www.manogat.com/node/18942

No comments:

Post a Comment