Friday, 23 April 2010

आठवणीतल्या सहली ५ : बॅकवॉटर्स.

तीन वर्षांपूर्वींच्या मधुर आठवणी इथें आल्यावर जाग्या झाल्या नसत्या तरच नवल. गाडी न घेतां दोन रिक्षा करून बोट सुटते तिथें आलों. विशीतला तरुण कप्तान आमची वाटच बघत होता. सगळीकडें सामसूम दिसत होतें. सुटणार्‍या बहुतेक बोटी सुटून निघून गेल्या होत्या. दुसर्‍या एका बोटींत दहाबारा प्रवासी बसलेले होते आणि ती बोट आणखी प्रवासी मिळायची वाट पाहात होती. गाईड पाहिजे काय म्हणून आमच्या कप्तानानें विचारलें. सव्वाशें रुपये म्हणाला. हाहि वीसेक वर्षांचा तरणाबांड मुस्लिम मुलगा. तरतरीत कोवळा चेहरा, व्यवस्थित नाहीं तरी बर्‍यापैकीं इंग्रजी बोलतां येणारा. उगीच मीं तरी हिंदीचा खून पाडायला नको. मुख्य म्हणजे त्याच्या चेहर्‍यावरचें निरागस बालपण अजून न मावळलेलें. तारुण्यसुलभ उत्साह ओसंडून जात असलेला. कांहीं माणसें आपल्याला प्रथमदर्शनींच आवडून जातात. तस्साच हा मुलगा. मुख्य म्हणजे त्याचें व कप्तानाचें बरें दिसत होतें. मित्रच असावेत. घेतला त्याला पण. सव्वाशे रुपये आपल्याला कांहीं फार नाहींत. तरुणांना रोजगार मिळाला तर ते वाममार्गीं लागणार नाहींत. खरें तर अशा रोजगारावर तरुणांचाच पहिला हक्क आहे. मुंबईत मात्र बरीचशीं अनुभवी माणसें स्वतःला असलेल्या पूर्ण वेळ नोकरींत तसें बर्‍यापैकीं चालत असलें तरी आणखी एखादी फुटकळ अर्धवेळ नोकरी करतात आणि एखाद्या तरुणाचा रोजगार हिरावून घेतात. असो. भलतेंच विषयांतर झालें. चेहरा निबर, बनेल दिसत नव्हता म्हणूनच त्याला घेतलें हें खरें.



तर या तरुण मार्गदर्शकाला आम्हीं घेतलें. आम्हांला तास दोनतास मजेंत घालवायचे आहेत. एकदा आम्हीं कोट्टायमहून बॅकवॉटर्स पाहिलेलें आहे. जें आमच्यासारख्या परक्यांना सहज दिसणार नाहीं अशा गोष्टी दाखव. इथली स्थानिक ताजी मासळी, एखादा स्थानिक खाद्यपदार्थ, सहसा पाहिलें न जाणारें एखादें नयनरम्य ठिकाण वगैरे. शक्यतों गर्दी नसलेलें. गर्दींत मात्र नेऊं नकोस, ती मुंबईत भरपूर असते, नवीन कांहींतरी, असें सांगितलें. त्यानें कप्तानाबरोबर कांहींतरी गुडुगुडू केलें. म्हणाला इथें एक बेट आहे. तिथें जाऊंया. इकडे सगळीकडे आहेत तशीं हिरवीगार झाडें, फडफडता ब्लॅक फिश आणि जायंट प्रॉन्स आपल्याला आपल्यासमोर विस्तवावर भाजून देतात. जोडीला ताडी, गावठी दारू. नाहींतर विदेशीचा हवा तो ब्रॅंड जातांना इथूनच घेऊन जाऊं. ताडगोळे, शहाळीं असतातच. आम्हांला गांवठी मद्यांत वा विदेशींत रस नाहीं. ताडीची चव घेऊन पाहूं. आवडली तर घेऊं नाहींतर नाहीं. पण ताडी वा दारू फारशी महत्त्वाची नाहीं. तें सगळें मुंबईत मिळतें. महत्त्वाची गोष्ट निसर्ग, शांतता आणि वेगळें खाद्य. तर त्या बेटावरच स्वारी करायचें ठरलें.



बोट म्हणजे मुंबईत गेटवेला लॉंचेस असतात तश्शी लाकडी लॉंच. पंधरावीस फूट लांब, आठदहा फूट रुंद. लाकडी बोटीला आकर्षक पांढरा रंग दिलेला. कप्तानानें इंजिन सुरूं केलें. शांततेवर घणाघात करीत इंजिन सुरूं झालें. या बोटींची इंजिनें खरें तर आधुनिक गाड्यांइतकीं कमींत कमी आवाज करणारीं असायला पाहिजेत. पण आर्थिक बचत आड येते ना. असो. निसर्गसुंदर बॅकवॉटर्स. ओणमच्या शर्यती जिथून सुरुं होतात तें ठिकाण त्यानें दाखवलें. तसें चित्रवाणीवर आपण पाहिलेलें आहेच. तरी प्रत्यक्ष पाहण्यांत वेगळी मजा आहे. किंचित हलके तरंग उठणारें तसें शांत, संथ पाणी, त्यांत आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचें तरल प्रतिबिंब. मन उत्साहानें ओसंडून जातें. प्रकाशचित्रांत पाहा.



आम्हीं ठरविलेल्या बोटींत येऊन बसलों अगदीं सुरेख बोट होती. प्रकाशचित्रांत दिसतेच आहे.




मार्गदर्शकानें दुरून बेट दाखवलें आणि आम्हीं हरखून गेलों. मौजमस्ती सुरुं झाली.


बोटीचें इंजिन बंद केल्यावर इतकें शांत वाटलें म्हणून सांगूं! चिमुकल्या लाटा बोटीवर आपटून चुबुक चुबुक करीत होत्या. किनार्‍यावरच्या झाडोर्‍यातून वार्‍याची सळसळ, पक्ष्यांची किलबिल ऐकूं येत होती. मधूनच दूरवरून एखाद्या गाईचें हंबरणें, दूरवरून माणसांच्या बोलण्यचे आवाज. तिथें एक गांवठी घर होतें. मार्गदर्शकानॆं तिथल्या माणसाशीं गुडुगुडू केलें. ब्लॅकफिश आणि जायंट प्रॉन्स ऊर्फ महाकोलंबी ताजे आहेत म्हणाला. १००/- रु. प्रत्येक. घासाघीस करून किंमत कमी केली नाहीं. पर्यटनाच्या ऐन मोसमांत किंमत प्रत्येकीं रु. ३००/- असते म्हणाला. तळून, करी करून, भाजून कसे पाहिजेत म्हणून विचारलें. आम्हां चौघांपैकीं दोघेजण मत्स्यप्रेमी. दोघांनीं एक ब्लॅकफिश आणि एक ऊर्फ महाकोलंबी - विस्तवावर भाजलेल्या - ची मागणी दिली. त्यांनीं विस्तव पेटवून मासळी भाजायला टाकली. आम्हीं दोघांनीं मात्र ताडगोळे, जांभळें इ. पसंत केलें. आतां हेंच जेवण होतें. तिथें जेवणाची देखील सोय होती. उकडा भात, माशांची आमटी वगैरे. केरळी माशांच्या आमटीत खोबरेल तेल वापरतात त्यामुळें आपल्या सवंगड्यांनीं न जेवणेंच पसंत केलें. तारीख होती २ ऑक्टोबर. म्हणून ताडी मिळणार नाहीं म्हणाला. बरोब्बर तीन वर्षांपूर्वीं २ ऑक्टोबरला आम्हीं मुर्डेश्वरला होतों. तिथें सतरा अटी असलेल्या आर एन शेट्टीच्या धर्मादाय वसतिगृहातहि लोक दारू पीत होते त्याची आठवण झाली. मग त्या मार्गदर्शकाची मस्त खिल्ली उडवली. काय तुझें इथें अजिबात वजन नाहीं. सरळ नाहीं म्हणून सांगतात. तुझा जन्म फुकट आहे वगैरे. आतां मात्र तो इरेला पेटला आणि थोडें अंतर जाऊन त्यानें एक प्लॅस्टिकचा मग भरून ताडी आणली. ताकासारखी लागते. सोड्यासारखे कर्बद्विप्राणिल वायूचे बुडबुडे पण येतात. पण स्वाद मात्र चांगला नाहीं. किंचित दुर्गंधीच येते. मला वाटतें कीं स्वच्छता चांगली राखली आणि शुद्ध विरजण - स्ट्रेन - वापरलें तर ताडीमाडीला चांगला स्वाद येऊं शकेल. पण संशोधन कोण करणार? असो. सुमारें पाऊण लिटरचा प्लॅस्टीकचा मग. सरकारी लोक आले तर पाण्यांत टाकून द्या म्हणाला. आम्हीं चौघांनीं घोटघोट घेऊन चव पाहिली. चौघांनाहि चव तेवढी आवडली नाहीं. कसाबसा संपवला. म्हणून दुसरा मागवणार नव्हतों. तेवढ्यांत त्यानें दुसरा मग आणला. मग तो घेतला आणि त्याला आणखी आणूं नको म्हणून सांगितलें.



तोपर्यंत आमचीं जांभळें, ताडगोळे वगैरे आले आणि मासेहि भाजून झाले. महाकोलंबी एवढी प्रचंड होती कीं मला वाटलें कीं शेवंड ऊर्फ लॉबस्टर

आहे. मग जाड्यानें दोहोंतला फरक समजावून सांगितला. ब्लॅकफिश म्हणजे हाताच्या पंजाएवढा पापलेटसदृश काळा चपट मासा. चव घेतल्याबरोबर त्यांनीं आणखी एकेक ची मागणी नोंदवली. आतां ताडीची किंचित नशा जाणवायला लागली. ग्लासभर स्वीट वाईन वा पोर्ट घेतल्यासारखी. शरीर किंचित हलकें वाटलें, चित्तवृत्ति आणखी तरल झाल्या. युफोरिया म्हणतात तो जाणवला. भूमंडळ मात्र अजिबात डळमळत नव्हतें. परिसराच्या त्रिमिती अवकाशाला वक्रताहि आली नाहीं. ताडगोळे, जांभळें छानच होतीं. पण एक गंमत झाली. जाड्या ज्या कौशल्यानें परमेश्वराच्या पहिल्या अवताराचा समाचार घेत होता तें मार्गदर्शक आणि कप्तान अवाक होऊन पाहूं लागले. मी लहानपणापासून मासे खात आहे, पण असें मात्र खायला येत नाहीं असें म्हणाला. त्यांनी आणखी एकेका ब्लॅकफिश आणि जायंट प्रॉनची मागणी नोंदवली. तो मार्गदर्शक याला खातांना पाहून वेडाच झाला होता. आम्हीं नेहमींच पाहात असल्यामुळें आम्हांला कांहीं वाटत नाहीं. नवीन मासे येईपर्यंत याला खातांना बघायला आणखी पांचसहा जण जमा झाले होते.

प्रकाशचित्रांत पाहा खाणार्‍याची गंमत.



अर्ध्यापाऊण तासांत खाणें आटोपलें. मग पुन्हां बोट सुरूं करून त्यानें एक मस्त फेरफटका केला. मला मुंबईजवळच्या घारापुरीला जातांनाचा बोटीचा प्रवास आठवला. इथलें पाणी संथ होतें. घारापुरीच्या समुद्रांत वारा असला तर चांगल्या आठदहा फूट उंच लाटा येतात व बोट चांगलीच हलते. मोठ्ठी लाट आली कीं कप्तान एक घंटा वाजवतो आणि बोट वळवून आडव्या लाटेच्या ४५ अंशात दिशा ठेवतो. मग खलाशी क्लच दाबतो. बोटीचा वेग पार कमी होतो. बोट लाटेवर उचलली जाते व मग पुन्हां खालीं येते. मग कप्तान पुन्हां प्रवासाची दिशा पकडतो आणि घंटा वाजवतो. मग खलाशी पुन्हां क्लच सोडतो आणि बोट पुन्हां वेग घेते. आपलें याकडे लक्ष गेलें तर पोटांत गोळा येतो आणि त्यांतला थरार जाणवतो. असो. इथें बॅकवॉटर्समध्यें मात्र संथ शांत जलप्रवास.



त्या मस्त निसर्गरम्य परिसरांत आम्हांला आणखी तासभर फिरवलें आणि पुन्हां मूळ ठिकाणीं आणलें.



क्रमश:



http://www.manogat.com/node/18538#comment-155763

No comments:

Post a Comment