Friday 23 April 2010

आठवणीतल्या सहली ६ : तिरूपूर

बॅकवॉटर्सच्या रम्य आठवणी मनांत जागवतच कोईंबतूरला परत आलों. दुसरे दिवशीं तिरूपूरला जायचें ठरवलें. तिरूपूर होजियरीसाठीं प्रसिद्ध आहें हें सर्वश्रुत आहेच. इंग्रजी शब्दाबाबत क्षमस्व. होजियरी आणि टी शर्टला ला इंग्रजी शब्द मला ठाऊक नाहीं. तिथें टी शर्टस् व तत्सम वस्तू फार सुरेख आणि स्वस्त मिळतात असें ऐकून होतों. दुसरे दिवशीं तिथें जायचें ठरवलें. देवा कामावर जाणार होता. त्यामुळें आम्हीं चौघांनीं प्रथम स्टेशनसमोरच्या उपाहारगृहांत भक्कम न्याहारी करून त्याला त्याच्या गाडीनें कार्यालयांत दहाच्या सुमारास सोडून तिरूपूरला जायचें असें ठरवलें. पण त्याचा एक पुणेकर मित्र थेट तिरूपूरला येऊन आम्हांला खरेदी करण्यास मदत करणार होता.



देवाला सोडलें आणि अविनाशी पथ पकडून निघालों. एके ठिकाणीं पाटी पाहिली. तिरुपूर ३७ कि.मी. तरी अंतर पार करायला मात्र दीडदोन तास लागले. ऊन भलतेंच कडक होतें. गाडींत मात्र जाणवलें नाहीं. तिरूपूर एक बकाल आणि कळकट शहरडें आहे. प्रथमदर्शनीं वाटतें कीं भिवंडींतच आलों. गाडीच्या कांचा खालीं केल्यावर रेड्यालाहि वांती होईल (मीं कुठेंच न वाचलेला वा ऐकलेला जाड्याचा शब्दप्रयोग) असा एक कुबट दुर्गंधीयुक्त दर्प हवेबरोबर घुसला. कुठून इथें यायची बुद्धि झाली असें वाटलें. माझ्या मनांत अचानक मळभ दाटून आलें. या लोकांना स्वच्छता पाळायला काय होतें कोण जाणे. अखिल तिरूपूरच्या आसमंतांत हा दर्प भरून राहिला आहे. तिथें रस्त्याच्या दुतर्फा सांडपाण्याचे उघडे नाले आहेत. त्यातूनच या दर्पाचा उगम असावा असें मला वाटतें. मुंबईत घाटकोपर आणि मानखुर्द यामधल्या शिवाजीनगर झोंपडपट्टींत तसेंच विमानतळाच्या आसपास जी झोपडपट्टी आहे तिथें असा मानवी विष्ठेच्या दुर्गंधीचें प्राबल्य असलेला दर्प येतो. असो. देवाचा पुणेकर मित्र ठरल्या जागीं वेळेवर ठरल्या वेळीं आला आणि त्यानें स्वतःचे दीडदोन तास खर्चून आम्हांला खरेदीसाठीं चांगलें मार्गदर्शन केलें.



तिरूपूरला खरेदी करणें म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखें आहे. बहुतेक दुकानें घाऊक मालाचीं. कोणत्याहि दुकानांत गेलें कीं टी शर्ट, जीन्स, टॉप्स, लहान मुलांचे कपडे, साईझप्रमाणेंच ठेवलेले असतात. पण पूर्णपणें चुरगळलेले आणि अस्ताव्यस्त. तें बघूनच कांहीं घ्यावेसें वाटत नाहीं. देवाच्या मित्रानें अशाच एका ढिगातून जादू केल्याप्रमाणें दोनचार आकर्षक टी शर्ट्स काढून दाखवले. किंमती जवळपास मुंबईच्या निम्म्या. तीसचाळीस रुपयांपासून टी शर्टस मिळत होते. तिरूपूरला जाऊनहि कांहीं आणलें नाहीं असें व्हायला नको म्हणून शेवडेनें थोडीफार खरेदी केली. घासाघीस करायला जाड्या होताच. आपले पुणेकरहि घासाघिशींत उस्ताद आढळले. एक टी शर्ट मलाहि आवडला म्हणून मीहि घेतला. मुंबईत तेव्हां अडीचशेला वगैरे मिळणारा टी शर्ट शंभर रुपयांत मिळाला. मीं चि. साठीं ‘बॅगी’ आणि ‘लगेज’ विजारी शोधत होतों. एकदोन दुकानांत पाहिल्या पण पसंत आल्या नाहींत. कांहीं आधुनिक इमारतींत चकचकीत दुकानें देखील आहेत. अशाच एका दुकानांत एक शर्ट मात्र आवडला मुंबईत तीनेकशेंला मिळणारा विविधरंगी चौकडीचा सुती शर्ट सव्वाशेंला मिळाला. त्वरित घेतला आणि माझ्या तिरूपूर दौर्‍याचें सार्थक झालें. बॅगी वा लगेज मात्र हवी तशी मिळाली नाहीं. एकदोन ठिकाणीं होत्या पण मुंबईच्याच किंमतीत. डिझाईन वगैरे मुंबईत मिळणारें. मग तें ओझें इथून कशाला न्यायचें? आतां मीं आणि जाड्या उत्साहानें शेवडेला कपड्यांचे ढीग उपसायला मदत करूं लागलों. पुणेंकरांचे आस्थेवाईक आणि सक्रीय मार्गदर्शन होतेंच. शंभरेक नग उपसले कीं पांचसहा नग पसंत पडत. दीडेक तासांत खरेदी आटोपली आणि पुणेकरांचे आभार मानून कोईंबतूरला परत.



परतीच्या आदल्या दिवशीं असेच न्याहारी करून देवाला कार्यालयांत सोडून कोईंबतूरच्या बाजारांत साड्या वगैरे खरेदी करायला गेलों. शहर परिवहन बस आगारासमोर बाजाराचा मुख्य रस्ता आहे. दादरचा रानडे रोड किंवा पुण्याचा लक्ष्मी रोड शोभेल असा. पण गर्दी मात्र दिवाळींत रानडे रोडला असते अशी प्रचंड. पार्किंगची जागा आगाराच्या अगोदर एके ठिकाणीं हेरून ठेवलेली होतीच. कोईंबतूर मुक्कामीं रोज संध्याकाळीं गाडी इथें पार्क करून जेवायला याच रस्त्यावरच्या ओरायनमध्यें जात होतों. एका मोठ्ठ्या भरपूर विविधता दिसणार्‍या साड्यांच्या भल्यामोठ्ठ्या दुकानांत गेलों. दुकान प्रशस्त. आंत फारशी गर्दी नव्हती. झगझगीत प्रकाशयोजना केलेली. जाड्याला म्हटलें एकावर एक फ्री अशा सवलतीत साडीबरोबर बायको फ्री मिळते कां बघ रे भडभुंजा! इथें मराठी कोणाला कळणार असा माझा होरा होता. पण होराभूषणांची फ झाली. गल्ल्यावरचा गोरापान, सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेला खास मारवाडी चेहर्‍याचा वृद्ध गृहस्थ खो खो हसायला लागला. मला मराठी येते म्हणाला. ‘मुंबईत आमची दुकान होती’ म्हणाला. मीं सौ. साठीं दोन साड्या खरेदी केल्या. इथें एक गंमत कळली. शेवडेला कपड्यांची खरेदी अजिबात जमत नाहीं. मला म्हणाला तूंच निवड कर. तिरूपूरला त्यानें तें उघड केलें नव्हतें. मग त्यानें माझ्या पसंतीनें मास्तरणीसाठी आणि मुलीसाठीं पोषाखाचें कापड घेतलें. दुकानदारानें आमच्यासाठीं फळांचा ताजा रस मागवला. दुकानदारींत गुजराती मारवाडी लोकांचा हात कोणी धरणार नाहीं हें खरेंच. मीं बाहेर नैसर्गिक सूर्यप्रकाशांत खरेदी करायच्या वस्तूंचे रंग नीट पारखून पाहात होतों त्याचें त्यानें कौतुक केलें. फुक्कटच्या कौतुकानें हवेंत कांहीं गेलों नाहीं तरी त्याच्या व्यावसायिक स्तुतिसुमनांना मात्र मीं मनांतल्या उघडपणें दाद दिली. क्रेडिट कार्ड स्वीकारलें जात होतें. त्यामुळें खिशांतले पैसे कमी झाले नाहींत.



पार्किंग जिथें केलें होतें त्यासमोरच एक भलें मोठ्ठें मिठाईचें दुकान होतें. रोज घरीं जातांना हें दुकान दिसलें कीं अरे डेझर्ट डेझर्ट म्हणून आमच्यापैकीं कोणीतरी ओरडायचा. या दुकानांत आईसक्रीमच्या कपांतून विविध प्रकारचें ताज्या फळांचें फ्रूट सॅलड मिळत होतें. त्याचा समाचार घेत असूं. त्याच दुकानांतून खास कोईंबतूरची म्हणून मिठाई घेतली. मुंबईपुण्यांत मिळते तश्शीच मिठाई. पण कोईंबतूरची म्हणून घ्यायला हवीच. मिश्र कडधान्यांचा एक वेगळ्याच प्रकारचा चिवडा मीं घेतला. पण घरीं कोणाला पसंत आला नाहीं. तो पाव किलो चिवडा मीं एकटाच महिनाभर चणे खावे लोखंडाचे म्हणत अधूनमधून तोंडांत टाकत होतों.



दुसरे दिवशीं सकाळीं साडेपांचच्या आसपासची गाडी होती. चार वाजतां उठून शुचिर्भूत झालों. देवानें आम्हांला स्थानकावर आणलें. आपलें उपाहारगृह उघडे होतें. इतक्या सकाळीं काय खाणार? चहाकॉफी घेतली. स्टेशनांत गेलों. आरक्षणाच्या यादींत आमची नांवें होतीं. गाडी जवळपास रिकामी. त्यामुळें त्वरित उशा ब्लॅंकेट चादरी मिळाल्या. बाहेर अंधारच होता. त्यामुळें पुन्हां गुडुप झोंपून गेलों. जाग आली तेव्हां तिरूपूर स्टेशन आलें होतें. म्हणजे इथें रेलवेनेंहि येतां येतें. कोईंबतूर एक्सप्रेस गाडी मुंबईला येतांना (येतांना म्हणजे जातेहि त्याच मार्गानें) उलट दिशेनें म्हणजे दक्षिण पूर्वेला सालेमला जाते आणि मग डोंगरदर्‍यांना वळसा घालून बंगळुरूमार्गें मुंबईला येते. इथें मात्र गाडी भरली. वातानुकूलित डब्यांतहि खाद्यपेयांचे विक्रेते येतात आणि आरडाओरडा करून विक्री करतात हें खटकलेंच. पण रात्रीं बारा वाजतां कंडक्टर ड्ब्याचे दरवाजे जे बंद करतो ते थेट सकाळीं उघडतो. त्यामुळें सामानाच्या बाबतींत निर्धास्त राहूं शकतां आलें. चहाचे विक्रेते चॉऽऽय चॉऽऽय करीत फिरत होते. चहाकॉफी फारशी वाईट नसते. आम्लेट ठीक असतें. बिस्किटें, पाण्याच्या बाटल्या मिळतातच. इतर पदार्थ मात्र वाईटच दिसत होतें. कांदा भजीं मात्र मस्त गरमागरम दिसलीं म्हणून एकदां खाऊन पाहिलीं. तीं झकास निघालीं. दुपारीं जेवणाला जाड्यानें बिर्याणी मागवली होती. चव घेऊन पाहिली. फिकी दिसणारी बिर्याणी काळ्यामिर्‍यांचा सढळ वापर करून प्रचंड तिखट केली होती. रंग आणि तिखटपणा याचें प्रमाण तसें व्यस्तच होतें. स्वादबिद मात्र खास नव्हता. कर्डराईसचें - दहीभाताचें रुपडें कांहीं ठीक दिसत नव्हतें. नाहींतरी भलतीकडे दहीं खायचें म्हणजे फसवा जुगारच. दहीं वाईटच असण्याची शक्यता जास्त. उगीच कांहींतरी अस्वच्छ पदार्थ न खायचें मी आणि मास्तरांनीं ठरवलें आणि या प्रवासांत फक्त तळलेले पदार्थ आणि फळें यावर गुजराण केली. मास्तर पुण्याला उतरला आणि आम्हीं दोघे मुंबईला आलों.



क्रमश:



http://www.manogat.com/node/18827

No comments:

Post a Comment